आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.००
वाजता
****
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
सर्वोच्च पुतळ्याचं, स्टॅच्यू ऑफ
युनिटीचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते नुकतंच करण्यात आलं आहे. गुजरातच्या
नर्मदा जिल्ह्यात सरदार सरोवरानजिक
साधू बेटावर उभारलेल्या या १८२ मीटर
उंच पुतळ्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण झालं आहे.
दरम्यान, सरदार पटेल यांची जयंती आज देशभरात राष्ट्रीय
एकता दिवस म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं.
नवी दिल्ली इथं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, गृहमंत्री
राजनाथ सिंह, यांनी संसद मार्गावर सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करुन अभिवादन
केलं. गृहमंत्र्यांनी मेजर ध्यानचंद स्टेडियम इथून एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी त्यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली.
देशभरात ही विविध ठिकाणी आयोजित एकता दौडमध्ये नागरिक
मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
माजी
पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आज देशभर राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून पाळली
जात आहे. यानिमित्तानं त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष
राहुल गांधी, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन
सिंग यांनी दिल्लीत शक्तीस्थळ इथं इंदिरा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन
केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इंदिरा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.
****
जम्मू-काश्मीरमधे
पुलवामा जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. त्यात जैश - ए - मोहम्मदचा
कमांडर उस्मान हैदर याचा समावेश आहे. उस्मान हा जैश - ए - मोहम्मदचा म्होरक्या मौलाना
मसूद अजहर याचा निकटवर्तीय होता. चकमक झालेल्या ठिकाणी दुर्बिण जोडलेली एम फोर रायफल सापडली. अफगाणिस्तानातल्या ‘नाटो’
दलांकडे ही रायफल आढळते, असं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय
स्टेट बँकेच्या खातेदारांना, एटीएमद्वारे पैसे काढण्यासाठी नवे नियम आजपासून लागू होत
आहेत. आजपासून क्लासिक आणि मास्ट्रो डेबिट कार्डधारकांना एका दिवसात ४० हजारांऐवजी
२० हजार रुपयेच काढता येतील. ज्या खातेदारांना रोज यापेक्षा अधिक रक्कम
काढणं गरजेचं असतं, त्यांना
वेगळ्या डेबिट कार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment