आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.००
वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र
बोस यांच्या नावाने शौर्य पुरस्कार सुरु करण्याची घोषणा केली आहे. आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत
लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय
सांस्कृतिक कार्यमंत्री महेश शर्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित
होते. अखंड भारतासाठी सुभाषबाबुंनी अथक परिश्रम
केले, असं सांगून पंतप्रधानांनी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण केली. आझाद हिंद
सरकारनं देशाला समृद्ध केलं, तसंच सशस्त्र सेनेत महिलांचा सहभाग असावा यासाठीही नेताजींनी
प्रयत्न केले, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाचं नाव मतदार
यादीत समाविष्ट करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर आज निवडणूक
विभागाकडून मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. सकाळी १० वाजेपासून सायंकाळच्या
पाच वाजेपर्यंत ही मोहिम कार्यरत राहील, असं जिल्हा निवडणूक विभागानं कळवलं आहे.
****
काही विचारवंत नक्षलवादाकडे वळत असल्याची खंत, सरकारी
वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर इथून गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम
भागात संकलित कपडे पाठवण्याच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. नक्षलवाद संपवायचा असेल
तर विचारवंतांनी आपल्या हालचालीकडे लक्ष द्यायला हवं, असं सांगत शहरी भागात नक्षलवाद
वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर
करा, संगमनेर तालुक्यात दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरु कराव्यात, वनजमिनी कसणारांच्या
नावे कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी संगमनेर प्रांत कार्यालयावर काल किसान सभा आणि
सिटू कामगार संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. अकोले तसंच संगमनेर तालुक्यातले
शेतकरी आणि कामगार या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पाच एकदिवसीय क्रिकेट
सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. दिवस- रात्र होणाऱ्या या मालिकेतला
पहिला सामना दुपारी दीड वाजता गुवाहाटी इथं सुरु होईल.
*****
***
No comments:
Post a Comment