Monday, 29 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.10.2018 07.10AM




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29  October 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



vपर्यावरण रक्षणावर तोडगा काढण्यासाठी संस्कृतीचा अंतर्शोध घेण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त

v अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून आज सकाळपासून पाच दिवस जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग होणार

v ब्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची सार्वमतानं निवड

v ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप

आणि

v आशियाई अजिंक्यपद हॉकी करंडक स्पर्धे भारत आणि पाकिस्तान संयुक्त विजेते

*****



 पर्यावरण रक्षणावर तोडगा काढण्यासाठी आपल्या संस्कृतीचा अंतर्शोध घेण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा काल ४९वा भाग प्रसारित झाला. यावेळी पंतप्रधानांनी विविध संस्कृती आणि त्यांचा निसर्गाशी असलेला संबंध, याचा आढावा घेतला. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मरण करुन त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. सरदार पटेल यांची वैचारिक परिपक्वता आणि धोरणात्मक कौशल्य यामुळेच आज आपण एकसंध भारत पाहू शकत आहोत, परवा ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रन फॉर युनिटी - एकता दौड मध्ये सगळ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं स्मरण   करत, ३१ ऑक्टोबर या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं पंतप्रधानांनी, त्यांना अभिवादन केलं.



 यंदाच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. पुढच्या महिन्यात भुवनेश्वर इथं ही स्पर्धा होणार असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, या स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. आगामी दिवाळी तसंच छटपूजा या सणांच्या पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.   

****



 समाजातल्या गरीब आणि गरजू लोकांपर्यंत प्रभावी आणि परिणामकारक आरोग्य सुविधेचा लाभ अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून पोहचवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अटल महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत गरजू रुग्णांवर तातडीच्या उपचारासाठी ४५० कोटी रुपये उपलब्ध केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचवू शकलो, असं ते म्हणाले. पैशाअभावी गरजू नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****



 अयोध्येत राम मंदीर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. संबंधित विवादित जागेची तीन भागात विभागणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकावर, सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती संजय किशन आणि न्यायमूर्ती के.एम.जोसेफ यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे.

****



 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काल एक धमकीपत्र मिळालं. मनुस्मृतीचा विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी या निनावी पत्रात देण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून आज सकाळी ११ वाजेपासून जायकवाडीसाठी पाणी विसर्ग करण्यात येणार आहे. हे आवर्तन ५ दिवस सुरु राहणार असून एक हजार ९०० दशलक्ष घनफूट पाणी या धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांचा या विसर्गाला होणारा विरोध पाहता, मुळा धरण परिसरात १०० पोलिसांसह  राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आलं आहे.



 दरम्यान, अकोले तालुक्यातल्या निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणीविसर्गाला विरोध म्हणून अकोले तालुका संघर्ष समितीसह स्थानिक शेतकऱ्यांनी काल रात्री प्रवरा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 यवतमाळ इथं होणाऱ्या ब्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, लेखिका, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची सार्वमतानं निवड करण्यात आली. यवतमाळ इथं काल झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या ११ ते १३ जानेवारी दरम्यान हे संमेलन होणार आहे. डॉक्टर ढेरे या मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या पाचव्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानानं निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावं, संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून प्रत्येकी एक आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून एक अशी नावं मागवण्यात आली होती. यवतमाळमध्ये आयोजित हे साहित्य संमेलन चिरकाळ स्मरणात राहील, असा विश्वास पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला. 

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 जातीधर्माचं वर्तुळ छेदून समग्र परिवर्तनासाठी साहित्यिकांनी लिखाण करावं, असं आवाहन डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केलं आहे. जालना इथं पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे नगरीत आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते काल बोलत होते.



 संमेलनाध्यक्ष डी.पी. जगत्पुरीया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद इथं पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे साहित्य संशोधन केंद्राची स्थापना करावी, उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश करावा, अजिंठा लेणी परिसरात नियोजित पाली विद्यापीठाची स्थापना तातडीनं करण्यात यावी या आणि इतर मागण्यांचे ठराव या संमेलनात संमत करण्यात आले.

****



 ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ सुप्रसिद्ध चित्रपट -नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. औरंगाबादचा परिसर आणि सहकाऱ्यांनी आपल्याला घडवलं, मराठवाड्यानं जे भरभरुन दिलं ते नाट्यकृतीद्वारे सादर करत असल्याचं, कुलकर्णी म्हणाले. या कार्यक्रमात पर्यावरण पत्रकारितेसाठीचा पुरस्कार जितेंद्र विसपुते यांना देण्यात आला.

****



 आशियाई अजिंक्यपद हॉकी करंडक स्पर्धेचं विजेतेपद भारत आणि पाकिस्तान संघांना विभागून देण्यात आलं आहे. ओमानच्या मस्कत इथं काल नियोजित हा अंतिम सामना, खराब हवामानामुळे रद्द करावा लागल्यानं, उभय संघ संयुक्तपणे विजयी घोषीत करण्यात आले.

****



 भारत - वेस्ट इंडिज एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला, चौथा सामना आज मुंबईत ब्रेबॉर्न क्रीडा संकुलावर होणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत, उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून, एक सामना बरोबरीत सुटला आहे.

****



 बुलडाणा जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हजार जणांना घरं मिळाली आहेत. जिल्ह्यातल्या गोंधनापूर इथल्या लाभार्थी सविता बोके यांनी याबद्दल आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या -



घर म्हणजे आमचं हे स्वप्न होतं. मी आणि कुंटूंब याच्या आगोदर कुडाच्या घरात होते. आणि आता जे हे घर मिळाल्या मुळे आम्हाला खूप आनंदात आहे. पंतप्रधान योजनेअंतर्गत जे स्वप्नातील घरकूल आम्हा साक्ष्यात झालं. त्यामुळे मोदीजीनां खूप धन्यवाद.

****



 दिव्यांग व्यक्ती- समान संधी समान हक्क - आरपीडी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती केली पाहिजे, असं मत सामाजिक न्याय मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सल्लागार डॉ. सुकुमारजी यांनी व्यक्त केलं आहे. लातूर इथं यासंदर्भात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांगांच्या क्षमता ओळखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****



 मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील, अशी ग्वाही कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव आणि बीड तालुक्यात पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांची निलंगेकर यांनी काल पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

****



 गेल्या वर्षी बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसान भरपाईपोटी जालना जिल्ह्याला ९१ कोटी ७९ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. नुकसान भरपाईची ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

****



 परभणी जिल्ह्यात पाथरी इथं राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडच्या हमीभाव केंद्राचं उद्घाटन काल आमदार मोहन फड यांच्या हस्ते झालं. शासनमान्य स्वस्तिक सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेतर्फे केंद्र सुरु करण्यात आलं, शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****



 समकालीन आव्हानं आणि आधुनिक शोषण व्यवस्था इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो, असं प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, डॉक्टर अशोक पळवेकर यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैश्विक तत्वज्ञानाशी कायम प्रामाणिक राहणं अत्यंत आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

****



 निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र्य निर्णय घेण्यासाठी कृषीमूल्य आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात यावा, अशी मागणी लातूरचे माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी केली आहे. ते काल लातूर तालुक्यात वाजरखेडा इथं जनसंवाद यात्रेत ते बोलत होते. मराठवाडा आणि लातूर जिल्ह्याच्या हक्काचं २३ दशलक्ष घनफूट पाणी मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मोठं जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.



*****

***

No comments: