Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 20 October 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø दुष्काळ निवारणासाठी
राज्याला प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून मदत करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन
Ø पंजाबमध्ये रावण
दहनाचा कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांना रेल्वेनं चिरडल्यामुळे ६१ जणांचा मृत्यू
Ø ऊसतोड कामगार
आणि त्यांच्या कुटुंबियांना लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना
लागू करण्याचा शासन निर्णय जारी
Ø नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यास
सर्व पक्षीय आमदार आणि खासदारांच्या बैठकीत कडाडून विरोध
आणि
Ø माओवाद हा देशातल्या अंतर्गत सुरक्षेला घातक - कॅप्टन
स्मिता गायकवाड
****
दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला
निधी कमी पडू देणार नाही, प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून राज्याला मदत केली जाईल,
असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी
इथं, पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरांचं वाटप केल्यानंतर आयोजित केलेल्या
सभेत ते काल बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अडीच लाख कुटुंबांना
घराच्या चाव्या देतांना ही घरं या कुटुंबांच्या स्वप्नपूर्तीचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान
म्हणाले. गेल्या चार वर्षात केंद्र सरकारनं सव्वा कोटी घरं बांधल्याचा दावा त्यांनी
यावेळी केला.
तत्पूर्वी पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणाली-व्हिडीओ
कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद सांधला. तसंच
साईबाबा यांच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्त एका चांदीच्या नाण्याचं अनावरणही केली.
याचबरोबर दहा मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प, दर्शन दीर्घा परिसरासोबत विविध विकास कामांचा
शुभारंभ केला.
****
पंजाबमध्ये अमृतसरपासून दोन किलो मिटर अंतरावर जोडा
फाटकाजवळ काल दोन रेल्वे रुळांवर उभं राहून रावण दहनाचा कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांना
पठाणकोट- अमृतसर रेल्वे आणि हावडा जलदगती रेल्वेनं चिरडल्यामुळे ६१ जणांचा मृत्यू झाला,
तर ७२ जण जखमी झाले. अपघातानंतर या मार्गावरची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुख्यमंत्री
अमरिंदरसिंग यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
****
राज्यातल्या ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना लागू करण्याचा शासन निर्णय
काल जारी करण्यात आला. या निर्णयानुसार प्राथमिक
टप्प्यामध्ये विविध प्रशासकीय विभागांच्या घरबांधणी, वृद्धाश्रम आणि शैक्षणिक योजनांमार्फत, या कामगारांना निधी उपलब्ध करुन देणं बंधनकारक करण्यात
आलं आहे. याशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अंत्यविधी अर्थसहाय्य योजना, आरोग्य
आणि प्रसूती लाभ, वृद्धापकालीन संरक्षण, भविष्य निर्वाह निधी आदी योजना कामगारांसाठी
लागू करणं प्रस्तावित असल्याचं याबाबतच्या शासन निर्णयात म्हटलं आहे. ऊसतोड कामगारांचं
जीवनमान उंचावण्यासाठी तसंच ते स्थिर आणि सुरक्षित होण्यासाठी ऊसतोड कामगार अभ्यास
गट गठित केला जाणार असल्याचंही या निर्णयात म्हटलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असताना, जिल्ह्यातल्या
धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास नाशिक मधील सर्व पक्षीय आमदार आणि खासदारांच्या
बैठकीत कडाडून विरोध करण्यात आला. काल रात्री
यासंदर्भात नाशिक इथं बैठक घेण्यात आली. तसेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात
शनिवारी याचिका दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मराठवाड्यासाठी १५ ऑक्टोबरच्या
आत नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाणी न सोडण्याच्या शासनाच्या कृतीविरुद्ध
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद इथल्या खंडपीठात दाखल असलेल्या याचिकेत प्रतिवादी
होण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
****
सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावरची बंदी उठवण्याची
मागणी करणारी ‘प्रोफेशनल ऑडिओ अँड लाईटिंग असोसिएशन’ची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं
काल फेटाळून लावत पुन्हा एकदा डीजे वरच्या बंदीवर शिक्कामोर्तब केलं. गणेशोत्सव आणि
नवरात्रोत्सव संपल्यानं ही बंदी मागे घेण्याची मागणी असोशिएशननं याचिकेत केली होती.
राज्य सरकारनंही डीजे वाजवण्यास विरोध कायम असल्याचं न्यायालयात सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
माओवाद हा देशातल्या अंतर्गत सुरक्षेला घातक असून
माओवाद्यांना लोकशाही आणि संविधान संपवावयाचे असल्याचं मत माओवादी चळवळीच्या अभ्यासक
कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केलं. प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेचं
पहिलं पुष्प गुंफतांना ‘शहरी नक्षलवाद- राष्ट्रीय सुरक्षेला धोका’ या विषयावर काल त्या
औरंगाबाद इथं बोलत होत्या. नक्षलवाद्यांना बंदुकीच्या बळावर राजकीय सत्ता मिळवायची
आहे़. माओवाद्यांना अदिवासींच्या प्रश्नाशी काहीही देणंघेणं नाही. त्यांचे नियम आणि
कायदे वेगळे असून त्यांना विकास नको असल्याचं त्यांनी सांगितलं. माओवाद आणि नक्षलवाद
हा एकच असून माओवाद लपवण्यासाठीच त्यांना नक्षलवादी संबोधले जात असल्याचं त्या म्हणाल्या.
****
लातूर जिल्ह्यातल्या सर्व नगरपरिषद आणि नगर पंचायती
तसंच पंचायत समित्यांनी पाणीटंचाईचा आराखडा त्वरित जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असे
निर्देश, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले आहेत. ते काल
लातूर इथं रब्बी हंगाम कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यातल्या
पाणी प्रकल्पातल्या पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते काल २०१८च्या
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचं काल वितरण करण्यात आलं.
****
मानवी
साखळी आंदोलन संघटक समिती, ‘वाढती बेरोजगारी आणि सर्वांना शिक्षणाच्या समान संधी’,
यासह विविध मागण्यांसाठी औरंगाबाद इथं उद्या मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे.
शहरातल्या पैठणगेट ते क्रांतीचौक दरम्यान संध्याकाळी पाच वाजता हे मानवी साखळी आंदोलन
होणार असल्याचं, आंदोलक संघटनेचे अध्यक्ष प्रा.जयदेव डोळे आणि समन्वयक श्रीकांत फोपसे
यांनी कळवलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्याचा
दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्यातल्या टंचाई सदृश्य परिस्थिती
निर्माण झालेल्या गावांमध्ये शासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असून भूम तालुक्यालाही
याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातला उमरगा वगळता अन्य सर्व तालुक्यांचा या यादीत समावेश
झाला आहे.
****
राज्यात
दुष्काळसदृष्य स्थिती असून, शासन शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सर्व ती मदत करेल, अशी
ग्वाही परभणीचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर,
सेलू आणि परभणी तालुक्यांतल्या पीक परिस्थितीची त्यांनी काल पाहणी केली, त्यानंतर ते
बोलत होते. पिकाच्या नुकसानाची नोंद घेऊन अहवाल पाठवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित
अधिकाऱ्यांना दिल्या.
****
रत्नागिरीमध्ये जेनेरिक औषधांची
तीन दुकानं असून, अन्य काही औषधांच्या दुकानातूनही या औषधांची विक्री होत आहे. यामुळे
सामान्य नागरिकांची आर्थिक बचत होत आहे. याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. जन
औषधी योजनेबद्दल रत्नागिरी इथले अब्दुल गफूर सोलकर यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त
केल्या -
मी पूर्वी
जनरल मेडिकल वरून गोळ्या घ्यायचं. चारही जणाचे औषध आमचे चालू होते. मग त्याच्यानंतर
तेथे जास्त बिल व्हायचा. म्हणून मी जेनेरिक मेडिकल कडून दवाई घ्यायला लागलो. तेथे चार
लोकांचे औषध आमचे चालू आहे. रक्त पातळ होण्याची गोळी, बिपीची आणि कॉलोस्टारची अश्या
प्रकारच्या गोळ्या आम्हाला चालू आहेत. आणि ते जनरल मेडिकला घ्यायचो त्यावेळी आमचं बिल
२०२२शे पर्यंत व्हायचा. आता इंथे जेनेरिक मेडिकल मध्ये आमचं बिल १२०० ते १३०० पर्यंत
होत आहे. म्हणजे आम्हा स्वस्तपण औषध मिळत आहे. आणि चांगला फायदापण आहे. आणि कुठलाही साईडईफेक्ट आम्हाला बिलकूल
नाही याच्यातून.
****
नांदेड इथं शिख बांधवांचा हल्लाबोल महोत्सव उत्साहात
साजरा करण्यात आला. मुख्य गुरुद्वारामधून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शस्त्रांचे अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिकं करण्यात आले.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यातल्या
पावसाअभावी वाढ न झालेल्या खरीप पिकांची काल पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी पाहणी केली.
दुष्काळ जाहीर करण्यात यावा, यासह विविध मागण्यांचं निवेदन यावेळी कांबळे यांना देण्यात
आलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या वारंगा
फाट्यावर रॉकेलच्या अवैध टँकरसह ३६ लाख २० हजाराचा मुद्देमाल उपविभागीय अधिकारी प्रशांत
खेडेकर यांनी काल जप्त केला.
*****
***
No comments:
Post a Comment