Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
v फटाके फोडण्यासंदर्भात दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाकडून
अंशतः बदल
v २००८ च्या
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय
तपास यंत्रणेकडून आरोप निश्चित
v ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांच्या पार्थिव देहावर
मुंबईत अंत्यसंस्कार
आणि
v औरंगाबाद इथं २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान आखिल भारतीय आंतरविद्यापीठ
महिला कुस्तीस्पर्धांचं आयोजन
*****
दिवाळीत फटाके फोडण्यासंदर्भात दिलेल्या आदेशात सर्वोच्च
न्यायालयाने अंशतः बदल केला आहे. रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास परवानगी
देण्याचा निर्णय हा फक्त राष्ट्रीय राजधानी क्षेत्र - दिल्ली पुरताच मर्यादित असल्याचं
न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. नव्या आदेशानुसार फटाके फोडण्याची वेळ ठरवण्याचे अधिकार
न्यायालयानं राज्यांना दिले आहेत. मात्र फटाके फोडण्याचा कालावधी दोन तासच राहील, असं
स्पष्ट नमूद केलं आहे. दिवाळीत आपल्या प्रथेप्रमाणे, सकाळी फटाके फोडण्याची परवानगी
द्यावी, अशा आशयाची मागणी तामिळनाडू राज्य सरकारनं, एका याचिकेद्वारे न्यायालयाकडे
केली होती, त्यावर न्यायालयानं हे स्पष्ट केलं.
****
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात
सरदार सरोवर प्रकल्पानजिक साधू
बेटावर उभारलेल्या या १८२ फूट उंच पुतळ्याचं काम विक्रमी वेळात पूर्ण झालं आहे.
दरम्यान,
सरदार पटेल यांच्या जयंती निमित्तानं आज देशभर एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद,
उस्मानाबादसह सर्वच ठिकाणी आत्ता सकाळी एकता दौडचं आयोजन करण्यात येत आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आज
देशभर राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून पाळली जात आहे. यानिमित्तानं त्यांना सर्वत्र अभिवादन
करण्यात येत आहे.
****
२००८ च्या मालेगाव
बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास
यंत्रणा - एनआयएच्या विशेष न्यायालयानं कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि इतरांविरोधात
आरोप निश्चित केले आहेत. सातही आरोपींवर दहशतवादाचा कट रचणं, हत्या आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत
आरोप ठेवण्यात आले आहेत. या
प्रकरणाची पुढची सुनावणी दोन नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, आरोप निश्चितीला स्थगिती
देण्याची कर्नल पुरोहितची विनंतीही न्यायालयानं फेटाळून लावली.
****
राष्ट्र
संतांच्या विचारात समाज परिवर्तनाची शक्ती असून, राष्ट्र
संतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमरावतीमधल्या गुरुकुंज मोझरी इथं काल राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथी समारंभात ते बोलत होते.
राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून विश्वरूप दर्शन दिलं असून, स्वच्छ
भारत अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतूनच घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुंबईतल्या अरबी समुद्रावरच्या प्रस्तावित छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची जागा बदलणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी स्पष्ट केलं आहे. २४ तारखेला या स्मारकाचं काम प्रत्यक्ष सुरु करण्यासाठी जात
असलेली बोट समुद्रात उलटून एकाचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर स्मारकाची जागा
बदण्याची मागणी होत होती. या प्रकल्पासाठी सरकारनं जागेसह सर्व प्रकारच्या परवानग्या
मिळवलेल्या असून, कामाला सुरुवातही झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी
विजयप्रकाश दांडेगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणा सहकारी
साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांची साखर संघाचे उपाध्यक्ष म्हणून निवड
करण्यात आली आहे. संघाचे सदस्य माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह
मोहिते पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड
प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
****
राज्यात संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत नोव्हेंबर २०१८ मध्ये राबवण्यात येणाऱ्या वैरण बियाणे
वितरण योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आलं
आहे. सिंचन सुविधा असलेल्या शेतकरी आणि पशुपालकांना वैरणीची बियाणं तसंच खतं शंभर टक्के
अनुदानावर देण्यात येणार असून १० गुंठे क्षेत्राकरता
४६० रुपये तर १ हेक्टर क्षेत्रासाठी ४ हजार ६०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
****
राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीची हंगामी भाडेवाढ
आज मध्यरात्रीपासून लागू होत आहे. १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान सर्व प्रवास
भाड्यात १० टक्के हंगामी वाढ असणार आहे. २१ नोव्हेंबरपासून पुन्हा मूळ प्रवासभाडे लागू
होईल.
****
राज्यातल्या
महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस
देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल केली. वीज कामगार, अभियंते आणि अधिकारी यांना पंधरा हजार रूपये तर
विद्युत आणि इतर सहाय्यक अभियंते तसंच प्रशिक्षणार्थी अभियंत्यांना नऊ हजार रूपये बोनस
मिळाणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांच्या त्यांच्या
पार्थिव देहावर काल सायंकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून
आजारी असलेले देव यांना मुंबईत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, काल पहाटेपूर्वी
त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते.
आकाशवाणीच्या सुगम संगीत विभागातून आपल्या सांगितिक कारकिर्दीला
प्रारंभ करणारे यशवंत देव यांनी, चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत,
लोकगीत, युगुलगीत अशा सर्वच प्रकारच्या गाण्यांवर आपला वेगळा ठसा उमटवला. आकाशवाणीवरून
ते सादर करत असलेला भावसरगम हा कार्यक्रम संगीत रसिकांच्या खास पसंतीस उतरला होता.
शब्दप्रधान गायकी हे संगीत वैशिष्ट्य असलेल्या देव यांना, गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी
लता मंगेशकर पुरस्कार, राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं होतं.
दरम्यान,
देव यांच्या निधनाबद्दल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दु:ख
व्यक्त केलं आहे. शब्द - सुरांवर प्रभूत्व असलेला आणि मराठी भावगीतांचं विश्व
समृध्द करणारा अस्सल कलावंत हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी देव यांना श्रद्धांजली
अर्पण केली.
****
हिंगोली इथले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी प्रतापराव
देशमुख किल्लेवडगावकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर
कळमनुरी तालुक्यात, किल्लेवडगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. हैदराबाद
मुक्तिसंग्रामात देशमुख यांचं मोठं योगदान आहे.
****
येत्या निवडणुकीत काँग्रेसचं सरकार आलं तर पेट्रोलचे दर प्रतिलीटर ६० ते ६५ रुपयांच्या आत आणू, असं आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिलं
आहे. ते काल जालना इथं काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा आणि दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत बोलत होते. काँग्रेस देशाच्या संविधानाचे रक्षण करीत आहे,
असं सांगून शासनानं दुष्काळ जाहीर करुन एकरी ५० हजार रूपयांची मदत देऊन खरीप कर्ज माफ करावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
जालना जिल्ह्यात अनेक तरुण, महिला आणि बचत गटांनी
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य घेवून आपला उद्योग व्यवसाय सुरू
केला आहे. तर काहींनी जुन्या उद्योगात वाढ करण्यासाठी मुद्रा ऋण योजनेचा आधार घेत उद्योग-व्यवसाय
भरभराटीला आणला आहे. जालना जिल्ह्यातल्या संजिवनी जाधव यांनी या विषयी आपला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या….
मी २०१०ला अक्टीव्ह महिला बचत
गटाची स्थापना केली. २०१०लाच मी उद्योगाला सुरूवात केली. ३-४ वर्षांत माझ्या व्यवसायाची
उलाढाल हि लाखोरूपयात येऊ लागली. महाराष्ट्र बँकाने मला प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गतच्या
मला ४लाख रूपये कर्ज उपलब्ध केले आहे. त्याचे रूपांतर क्यॉश, केडीट मध्ये केले असून,
मला त्याचा चांगला लाभ होत आहे. लवकर माझा व्यवसाय जालना एम.आय.डी.सी. उभा राहत आहे.
मुद्रा या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे धन्यवाद.
****
औरंगाबाद इथं येत्या २
ते ५ नोव्हेंबरदरम्यान आखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्तीस्पर्धांचं आयोजन करण्यात
आलं आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण - साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात या स्पर्धा होणार
आहेत. या स्पर्धेत देशभरातील ११२ विद्यापीठांतल्या मल्ल, पंच, संघ, व्यवस्थापक, अधिकारी
अशा एकूण ९०० जणांचा सहभाग असणार आहे.
****
पाचवे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य
संमेलन येत्या २ आणि ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पैठण इथं होणार आहे. प्रसिद्ध कवी इंद्रजित
भालेराव यांची या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात
विविध विषयावर सात परिसंवाद राहणार आहेत.
****
औरंगाबाद इथं येत्या चार नोव्हेंबरला
तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या जबिंदा
इस्टेट इथं सकाळी आठ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, देश विदेशातले प्रमुख
बौध्द भिक्खू संघ, विद्वान साहित्यिक यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं
काल गोवर रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत गोवर रुबेला या आजाराविषयी मार्गदर्शन
शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मन्मथ महाराज यांनी
या आजाराविषयी आणि उपचार, लसीकरणाविषयी मार्गदर्शन केलं.
****
औरंगाबाद शहरातल्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सर्व
जलकुंभांवर संरक्षण देण्याची मागणी बहुजन शक्ती कामगार संघटनेनं महानगरपालिका आयुक्तांकडे
केली आहे. एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केल्याचं संघटनेनं
आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment