Monday, 22 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.10.2018 07.10AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22  October 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø अस्थिर आणि भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांचा सजग पोलिस दलाकडून बिमोड -पंतप्रधानांचे गौरवोद्गार
Ø राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज मांगीतुंगी इथं विश्वशांती अहिंसा संमेलनांचं उद्घाटन
Ø आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार
आणि
Ø भारत - वेस्ट इंडिज एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा आठ गडी राखून विजय
****

 देशात अस्थिर आणि भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांचा सजग पोलिस दलानं बिमोड केला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं उभारलेलं राष्ट्रीय पोलिस स्मारक, काल पोलिस स्मारक दिनी, देशाला समर्पित केल्यानंतर ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत बलिदान देणाऱ्या पोलिसांच्या स्मृतिपित्यर्थ हे स्मारक उभारण्यात आलं आहे. सहा एकर क्षेत्रावर उभारलेल्या या स्मारकाच्या ३० फूट उंच शौर्यभिंतीवर ३४ हजार ८४४ हुतात्मा पोलिसांची नावं कोरण्यात आली आहेत. फक्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यातच नव्हे, तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळेसही पोलिसांनी मोलाचं योगदान दिल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. या परिसरात उभारलेल्या पोलिस संग्रहालयाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं.

 मुंबईत पोलिस स्मारक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद इथं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पोलिस स्मारकाला अभिवादन केलं. कर्तव्यदक्ष पोलिसांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही, असं बागडे यावेळी म्हणाले.
****

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. जैन धर्मीयांचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र - मांगीतुंगी इथं आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनांचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते आज होणार आहे. यावेळी सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा या ग्रंथाचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते होईल, तसंच मुरादाबाद इथल्या तीर्थंकर महावीर विश्व विद्यालयाचे कुलगुरू सुरेश जैन यांना भगवान ऋषभ आंतरराष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
****

 आगामी लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं काल कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना सत्तेत राहून सरकारकडून जनतेची कामं करुन घेत असून, आम्हाला सत्तेची हाव नाही, असं ते म्हणाले. राज्यभरात कार्यकर्ता मेळावे घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
****

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला रास्त आणि किफायतशीर दरानुसारच दर द्यावा, असे निर्देश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. सोलापूर इथं ऊस गाळप परवाना देण्याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये, अशा सूचना उच्च न्यायालयानं दिल्यामुळे या सूचनांचं साखर कारखान्यांनी पालन करावं, असंही त्यांनी सांगितलं.
****

 राज्यातल्या बचत गटांमार्फत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

 राज्य सरकारनं महिलांसाठींच्या वेगवेगळ्या योजनांना आतापर्यंत ४२ हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. बचत गटांना उत्पादन आणि व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****

 बेनामी व्यवहार कायद्याअंतर्गत खटल्यांच्या सुनावणीसाठी ३४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधली सत्र न्यायालयं, विशेष न्यायालयं म्हणून काम करतील, अशी अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. बेनामी संपत्ती देवाणघेवाण प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधशांच्या सल्ल्यानंतर ही अधिसूचना जारी केल्याचं सरकारनं सांगितलं आहे.
****

 वस्तु आणि सेवा करांतर्गत सप्टेंबर महिन्याचं विवरण तीन ब दाखल करण्याची मुदत येत्या २५ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. कराच्या कक्षेत नव्यानं आलेले विशेष करदाते तसंच या संदर्भात व्यापाऱ्यांसह उद्योगांच्या विविध शंका, लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****

 वेस्ट इंडिजविरूद्धच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत, काल गुवाहटी इथं झालेला पहिला एकदिवसीय सामना भारतानं आठ गडी राखून जिंकला. नाणेफेक जिंकून भारतीय संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित ५० षटकात वेस्ट इंडिजच्या संघानं आठ बाद ३२२ धावा केल्या. प्रत्युतरात भारतानं हे आव्हान त्रेचाळीसाव्या षटकांतच दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मानं या सामन्यात शतकं झळकावली.
****

 डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. महिला एकेरीच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात तैवानच्या ताई त्झू यिगनं तिचा २१-१३, १३-२१, २१-६ असा पराभव केला.
****

 केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या तीस हजार ५४ युवकांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे. जिल्ह्यातल्या विविध ३८ बँकांच्या माध्यमातून ३०८ कोटी २५ लाख रुपयांचा या योजनेअंतर्गत कर्जपुरवठा करण्यात आला. यामुळे तरुण उद्योजकांना आपल्या व्यवसायात फायदा होत असल्याचं या योजनेचे लाभार्थी नचिकेत बुरखे यांनी सांगितलं. ते म्हणाले.

या योजनेमुळं मला  सहजासहजी कर्ज उपलब्ध झाल. या कर्जामधून मी माझा व्येवसाय चांगल्या पध्दतीने चालू केला. आणि माझ उत्त्पन्नाचं साधन  त्यामध्ये मला निर्माण झालं. आणि व्येवसाय व्रर्धी करण्यामध्ये  मला या कर्ज योजनेचा अतिशय चांगल्या पध्दतीने उपयोग झाला.
****

 औरंगाबाद इथं आयोजित तीन दिवसीय प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेचा काल समारोप झाला. ‘राफेल: सत्य आणि समीक्षा’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचं व्याख्यान झालं. फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांची भारताकडून खरेदी हा विषय सर्वसामान्य भारतीयांशी थेट निगडीत नाही, हे प्रसार माध्यमांनी लक्षात घ्यायला हवं, असं ते म्हणाले. देशाच्या सुरक्षेसाठी राफेलसारख्या विषयांचे तपशील गोपनीय राहणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.
****

 राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, ग्राम पंचायतींना पाणी पुरवठ्यासाठी आवश्यकता भासल्यास जागा हस्तांतरित करण्याबाबत वन खात्याला निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही ग्राम विकास मंत्री दादा भुसे यांनी दिली. शिवसेनेच्या वतीनं काल नाशिक इथं आयोजित सरपंच परिषदेत ते बोलत होते.
****

 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाचा सहकार भूषण हा २०१६-२०१७ वर्षासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सदृढ आर्थिक परिस्थितीच्या निकषांवर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****

 उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकरी तसंच तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. असं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यात देगलूर तसंच बिलोली तालुक्यातल्या दुष्काळ परिस्थितीचा आढावा जानकर यांनी काल घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावर भेटी घेऊन, शेतकरी तसंच नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.  
****

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी काल पाहणी केली. रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात ११ कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश त्यांनी भोकरदन इथं आयोजित बैठकीत दिले.
****

 अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच योगेश्वरी पॅनल विजयी झालं आहे. काल झालेल्या निवडणुकीत योगेश्वरी पॅनलला ४८८ तर  स्वामी रामानंद तीर्थ पॅनलला १४७ मते मिळाली.
****

 नांदेड इथले सेवानिवृत कृषी विस्तार अधिकारी शंकरराव जोंधळे यांच आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. आज दुपारी सिडको नवीन नांदेड इथल्या स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
****

 २०२५ पर्यंत जगाची २५ टक्के लोकसंख्या ही मानसिक आजारानं ग्रस्त असेल, अशी भीती विज्ञान आणि तंत्रज्ञान लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केली आहे. ते काल बुलडाणा इथं वार्ताहरांशी बोलत होते.
*****
***

No comments: