Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 October 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००
****
केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय महत्वाचं पाऊल
असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी
होईल आणि खरं समोर येईल, असं ते म्हणाले. सरकार सीबीआयची विश्वासार्हता कायम राखण्यास
कटीबद्ध असून, कोण्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही, असं त्यांनी नमूद केलं. सीबीआयचे
सक्तीच्या रजेवर पाठवलेले संचालक आलोक वर्मा यांच्या विरोधातली चौकशी दोन आठवड्यात
पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय दक्षता आयोगाला दिले आहेत.
****
दरम्यान,
सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस
पक्षानं आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला
होता. सीबीआय मुख्यालयाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर गांधी आणि इतर कार्यकर्त्यांना
अटक करण्यात आली. देशातली प्रत्येक संस्था ही पंतप्रधानांच्या इच्छेनुसार चालत असून,
राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात पंतप्रधानांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप गांधी यांनी
यावेळी केला.
****
नक्षलवाद्यांशी
संबंध असल्याच्या आरोपावरून स्थानबद्धतेत असणाऱ्या सुधा भारद्वाज, वर्नन गोन्सालवीस
आणि अरुण परेरा यांचा जामीन अर्ज पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयानं आज फेटाळला. यामुळे
या तिघांना अटक करण्याचा पुणे पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आरोपींचे वकील
या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचार
प्रकरणात या तिघांसह वरवरा राव आणि गौतम नवलाखा यांनाही अटक केली आहे.
****
खरीप
हंगामात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
व्यक्त केला आहे. ते आज लखनौ इथल्या कृषी कुंभ २०१८ चं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून उद्धाटन करताना बोलत होते. पेरणीपासून विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यांवर
देशातल्या धान्य उत्पादकांना मदत मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सरकारनं २१ रब्बी
आणि खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी
वाढीव दर मिळेल, असं ते म्हणाले.
****
राज्यातल्या
‘पंचायत राज संस्था’ या राज्याच्या ग्रामीण, निमशहरी तसंच शहरी भागाच्या विकासात महत्वपूर्ण
योगदान देत असल्याचं राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आज यशवंत
पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि गुणवंत अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांचा गौरव राज्यपाल आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते
करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता, त्यामुळे
राज्याच्या पंचायत राज संस्थांमध्ये महिला प्रतिनिधींचं प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
ही लोकशाहीच्या दृष्टीनं तसंच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं खूप महत्वाची गोष्ट असल्याचं
राज्यपाल म्हणाले. यावेळी सांगली जिल्हा परिषद आणि भंडारा पंचायत समितीला यशवंत पंचायतराज
पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
शेतकऱ्यांना
सरसकट पीक विमा लागू करावा, तसंच नुकसानग्रस्त शेतीपीक आणि सोयाबीनला एकरी ५० हजाराचं
अनुदान द्यावं अशी मागणी लातूरचे माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी केली आहे.
लातूर तालुक्यातल्या सारसा इथं आज जननायक जनसंघटनेच्या वतीनं आयोजित जनसंवाद यात्रेचा
शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी
लातूर तालुक्यातल्या ५४ गावात ही यात्रा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड
जिल्हा परिषदेच्या वतीनं सुरु असलेल्या कार्यालयीन स्वच्छता पंधरवड्यात आज जिल्ह्यातल्या
सर्व कार्यालय तसंच परिसराची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अशोक काकडे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या अभियानात सहभाग नोंदवला. २८
तारखेपर्यंत चालणाऱ्या या पंधरवड्यात अनेक उपक्रम राबवण्यात आले.
****
बुलेट
ट्रेन प्रकल्पाविरोधात आज पालघर इथं भूमी सेना - आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी
कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढण्यात आला. वेळोवेळी आम्ही जमीन मोजणीला विरोध केला,
जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बुलेट ट्रेन संदर्भातल्या जनसुनावणीला आदिवासी बांधवांनी
विरोध केल्यानं जनसुनावणी होऊ शकल्या नाहीत. तरी अधिकाऱ्यांकडून जनसुनावणी झाल्याचं
खोटं सांगण्यात येतं असल्याचं मोर्चेकऱ्यांनी यावेळी सांगितलं.
****
भारत
आणि वेस्ट इंडिज दरम्यान पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना
उद्या पुणे इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment