Saturday, 20 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.10.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20  October 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑक्टोबर  २०१ दुपारी १.०० वा.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांच्याशी चर्चा करणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही नेते भारताच्या मदतीनं श्रीलंकेतल्या जाफनामध्ये राबवण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. तसंच गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज हे देखील विक्रमसिंघे यांची भेट घेणार आहेत.

****



 नैऋत्य मोसमी पाऊस आजपासून संपण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या प्रमुख सथी देवी यांनी काल नवी दिल्लीत याबाबतची माहिती दिली. मान्सूनला देशभरात अधिकृतरित्या एक जूनला सुरुवात होते आणि ३० सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा हंगाम असतो. मात्र, त्यानंतरही देशाच्या काही भागात मान्सून सक्रीय राहातो, असं सथी देवी यांनी सांगितलं. २० ऑक्टोबर रोजी मान्सून देशातून पुर्णपणे नाहीसा होण्याची अपेक्षा असते. यंदा देशात सरासरीच्या ९१ टक्के पाऊस पडला असून, हा पाऊस सरासरीपेक्षा कमी असल्याचं सथी देवी यांनी सांगितलं. यंदा बिहार, पश्चिम बंगाल आणि इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वात कमी राहील्याचं त्यांनी म्हटलं आहे.  

****



 मुंबई ते गोवा या भारतातल्या पहिल्या प्रवासी क्रूझसेवेचं आज केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, माझगाव याठिकाणी हा कार्यक्रम होईल. यावेळी जवाहर द्वीप इथं एका विकास प्रकल्पाचं भूमीपूजन, नवीन बंकरिंग टर्मिनलचं उद्घाटन आणि ड्राय डॉकचं, कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरण आदी कार्यक्रमही होणार आहेत.

****



 सौदी राजकारभारावर टिका करणारे पत्रकार जमाल खाशोज्जी यांची सौदी दुतावासात हत्या झाल्याचं सौदी अरेबियानं मान्य केलं आहे. या प्रकरणी सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी हेरगिरी विभागाचे उपप्रमुख अहमद अल-अस्सिरी आणि न्यायालयाचे माध्यम सल्लागार सऊद अल कहतानी यांना पदावरून हटवलं आहे. तुर्कस्थानची राजधानी असलेल्या इस्तंबूलमधल्या सौदी दूतावासात वॉशिंग्टन पोस्टचे प्रतिनिधी खोशोज्जी यांची हत्या झाल्याचं सौदी अरेबियाच्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे.

****



 केंद्र सरकारनं दिल्लीच्या बाजारांमध्ये कांद्याचा पुरवठा सध्याच्या पुरवठ्यापेक्षा दोन ते तीन पटीनं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी सरकारनं राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ – नाफेडला कांद्याच्या पुरवठ्यात वाढ करण्यास सांगितलं आहे. ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव अविनाश के श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कांद्याचे दर आणि उपलब्धता याबाबतचा आढावा घेण्यात आला.

****



 दरम्यान, गेल्या काही दिवसात सातत्यानं वाढलेल्या कांद्याच्या भावात काल नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत ६०६ रूपयांची घसरण होऊन हा भाव, एक हजार नऊशे एकोणीस रुपये प्रति क्विंटल असा पूर्वपदावर आला. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्यानं अडीच हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. चढ्या भावामुळे बाजार समित्यांमध्ये मोठया प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं हे भाव घसरल्याचं, समितीच्या सूत्रांनी सांगितलं. 

****



 नांदेड इथं काल जलसंधारण, रोहयो विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दुष्काळी परिस्थितीसंबंधी आढावा बैठक घेतली. नांदेड जिल्ह्यात आगामी काळात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यास यशस्वी मुकाबला करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर डवले यांनी मुखेड तालुक्यातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी केली.

****



 डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी आपापल्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतनं पुरुष एकेरीत भारताच्याच समीर वर्माचा २२ – २०, १९ – २१, २३ – २१ अशा फरकानं पराभव केला, तर सायनानं महिला एकेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराचा १७ -२१, २१ – १६, २१ – १२ असा पराभव केला.

****



 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला आज हंगेरीत बुडापेस्ट इथं सुरुवात होत आहे. भारतानं या स्पर्धेसाठी ३० खेळाडूंचा संघ पाठवला असून, आशियाई स्पर्धेतला सुवर्णपदक विजेता बजंरग पुनिया याच्या कामगिरीकडे क्रीडारसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे. आशियाई स्पर्धेतली सुवर्णपदकांची मानकरी विनेश फोगट दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. मात्र ऋतु फोगट, साक्षी मलिक, संदीप तोमर, मौसम खत्री या स्पर्धेत खेळणार आहेत.

****



 ओमांनमधे सुरु असलेल्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज पाकिस्तानबरोबर होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री १० वाजून ४० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.

*****

***

No comments: