Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date –
21 October 2018
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२१ ऑक्टोबर २०१८
दुपारी
१.०० वा.
****
देशाच्या सजग पोलिस बलानं देशाला
अस्थिर करणाऱ्या किंवा भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांना अयशस्वी ठरवलं असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय पोलिस स्मारक देशाला समर्पित केल्यानंतर ते बोलत होते. स्वातंत्र्य
मिळाल्यापासून देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्मारक उभारण्यात आलं आहे. नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी भागात सहा एकर जागेत या ३०
फूट उंच स्मारकाची निर्मिती करण्यात आली असून, या
शौर्यभिंतीवर ३४ हजार ८४४ शहीद पोलिसांची नावं कोरण्यात आली आहेत. दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस ‘पोलिस स्मारक दिन’ म्हणून
साजरा केला जातो. १९५९ साली याच दिवशी चीनी सैन्याच्या आक्रमणामध्ये लडाख इथं अनेक
पोलिस जवान शहीद झाले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यातच पोलिसांनी योगदान दिलं
नाही, तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळेसही अनेकांचा जीव वाचवला असल्याचं पंतप्रधानांनी
नमूद केलं. पोलिस संग्रहालयाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं.
मुंबईत पोलिस स्मारक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र
अर्पण करून अभिवादन केलं.
****
औरंगाबाद
इथल्या पोलिस मुख्यालयात आयोजित पोलिस स्मारक दिनाच्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांनी वीरमरण आलेल्या पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली. कर्तव्यदक्ष
पोलिसांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही, असं ते म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यावेळी उपस्थित होते.
****
जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातल्या लारु भागात
सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले.
आज सकाळी ही चकमक झाली. एका घरात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी
या परिसराला वेढा घातला, त्यानंतर ही चकमक सुरू झाली.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी घसरण
झाली. पेट्रोल २५ पैशांनी, तर डिझेल १७ पैशांनी स्वस्त झाल्याचं पीटीआयचं वृत्त आहे.
इंधन तेलाचे भाव जागतिक बाजारपेठेत कमी झाल्यामुळं ग्राहकांना काहीसा
दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर ८७ रुपये
२१ पैसे, तर डिझेलचा दर ७८ रुपये ८२ पैसे प्रतिलिटर झाला आहे.
****
माता आणि बाल आरोग्यासंदर्भातल्या जागतिक परिषदेचं यजमानपद
भारताकडे असून, येत्या डिसेंबर महिन्यात नवी दिल्ली इथं ही परिषद होणार असल्याचं
युनिसेफनं जाहीर केलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि माता, नवजात
आणि बालआरोग्य मंचाच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद होणार असून, शंभर
देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. भारतानं माता आणि बाल आरोग्य क्षेत्रात
खूप सुधारणा केल्या असून, त्याचे परिणाम जगाला दाखवण्याची संधी या परिषदेनं भारताला
मिळेल, असं युनिसेफचे आरोग्य विभाग प्रमुख गगन गुप्ता यांनी पीटीआय
या वृत्तसंस्थेला सांगितलं.
****
दहशतवादी गट आणि त्यांना मदत करणाऱ्या गटांविरोधात कारवाई
करण्यात हयगय केली जाणार नाही, असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
दहशतवादी, त्यांची संरचना आणि शेजारी राष्ट्राकडून त्यांना मिळणारी मदत
भारताच्या संयमाची परिक्षा पाहत असल्याचं, संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात
त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी रशिया, चीन, थायलंड, लाओस
आणि म्यानमारच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर चर्चा केल्याचंही सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षानं छत्तीसगड, तेलंगणा
आणि मिझोराम विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे.
नवी दिल्लीत काल भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या सूचीला अंतिम रुप
देण्यात आलं. छत्तीसगड विधानसभेच्या ९० पैकी ७७ जागांवर उमेदवार घोषित केले असून, तेलंगणामधल्या
११९ पैकी ३८, तसंच मिझोराममधल्या ४० पैकी १३ जागांवरचे उमेदवार पहिल्या यादीत
जाहीर केल्याचं भाजपाचे नेते जे. पी. नड्डा सांगितलं.
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या रोहटेक गावात दुर्गोत्सवाच्या
महाप्रसादातून ३० जणांना विषबाधा झाली. विषबाधितांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असून,
सर्वांवर यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
भारताची मानांकित बॅडमिंटनपटू
सायना नेहवाल आज डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत तैवानच्या ताई
त्जू यिंग हिच्याशी लढणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात सायना
नेहवालनं इंडोनेशियाच्या जॉर्जिया मरिस्का हिचा पराभव केला.
*****
***
No comments:
Post a Comment