Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 October 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००
****
ग्रामीण
भागातल्या आशा कार्यकर्त्यांच्या प्रतिदिन भेट भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय
मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं घेतला आहे. २५० रुपयांवरुन हा भत्ता आता ३००
रुपये करण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा देशातल्या आरोग्य विभागाशी संबंधित जवळपास
एक कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली.
सात
हजार ५०० कोटी रुपयांच्या मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधीलाही आजच्या बैठकीत
मंजुरी देण्यात आली. यामुळे देशात मत्स्योद्योगाला चालना मिळेल, असं प्रसाद यांनी सांगितलं.
बेनामी
व्यवहार प्रतिबंध अधिनियमातर्गंत निर्णय घेण्यासाठी प्राधिकरण तसंच अपिल प्राधिकरण
स्थापन करण्याला आज केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली.
****
केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआय देशातली प्रमुख तपास यंत्रणा असून, या संस्थेची विश्वासार्हता
जपण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.
ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा
आरोप झाल्याच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी, केंद्रीय दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार
विशेष तपास पथक योग्य ती चौकशी करेल, असं सांगितलं.
****
हवामान
आधारित शेतीसाठी, उपग्रह आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन दुप्पट करण्याचा
खर्च कमी झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू
यांनी म्हटलं आहे. पवई इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटीच्या हिरक महोत्सवी
वर्षानिमित्त आयोजित शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय
परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. डिजीटल उपाययोजना
शेतीसाठी वरदान ठरू शकतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
****
सौर
वीज प्रकल्पामुळे राज्याचा कायापालट होणार असून २०२२ पर्यंत संपूर्ण कृषी पंपांना सौर
ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावबकुळे यांनी
सांगितलं. पुणे इथं आज महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण - महाऊर्जा मुख्यालयाच्या नवीन
इमारतीचं भूमिपूजन बावबकुळे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सौर ऊर्जेच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री सौर
कृषी वाहिनी योजना सुरु झालेली आहे. येत्या वर्षभरात सुमारे सात लाख ५० हजार कृषी पंपांना
या योजनेद्वारे वीज पुरवठा सुरु होणार आहे, त्याचप्रमाणे राज्यातल्या एक हजार ५०० नळपाणी
पुरवठा योजना सौर ऊर्जेवर सुरु असून, यंदा आणखी दोन हजार योजना सौर ऊर्जेवर आणणार असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यासाठी
नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात
आलेल्या याचिकांवर तात्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. मराठवाड्यातल्या
जायकवाडी धरणात ६५ टक्के उपयुक्त जलसाठा करण्यासाठी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणानं
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार
नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा आणि पालखेड या तीन धरणांमधून जवळपास साडेतीन दशलक्ष
घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यास नाशिक जिल्ह्यातून विरोध होत आहे, त्या
पार्श्वभूमीवर नाशिकमधले भाजपाचे कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात
जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या विचार करण्यात येईल, असं न्यायालयानं
सांगितलं.
दरम्यान,
नाशिक मधून पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी भाजप वगळता आज अन्य विरोधी पक्षांच्या वतीनं
नाशिक शहरातल्या रामकुंड इथं गोदावरी नदीत उतरून आंदोलन करण्यात आलं.
****
मराठवाड्यात
सरकारनं तात्काळ दुष्काळ जाहीर करुन उपाययोजना सुरु करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
अशोक चव्हाण यांनी केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं आज काँग्रेस पक्षाच्या
जनसंघर्ष यात्रेला सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी - मनरेगा योजनेमधून मागेल त्याला काम द्यावं, चारा छावण्या, पाणीपुरवठ्यासाठी
टॅंकर सुरु करावेत, कर्ज माफी वेगानं व्हावी, मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना
प्रत्येकी २५ कोटी रुपये तात्काळ देऊन उपाययोजनांना गती द्यावी आदी मागण्या चव्हाण
यांनी यावेळी केल्या. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर
टीका केली.
****
औरंगाबाद
इथल्या उस्मानपुरा भागात अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं एक महाविद्यालयीन तरूणी जागीच
ठार झाली आहे. वैभवी खिरड असं मृत तरूणीचं नावं असून ती आपल्या दुचाकीवरून महाविद्यालयात
जात असतांना आज सकाळी हा अपघात झाल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment