आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ ऑक्टोबर
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची
सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जलदगतीने आणि कुठल्याही विलंबाविना
घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयए विशेष न्यायालयाला
दिले आहेत. या प्रकरणातल्या मुख्य आरोपींविरोधात दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी परवा
शुक्रवारी २६ ऑक्टोबर रोजी आरोप निश्चित केले जाणार आहेत. या वेळी आपल्याकडून सुनावणी
तहकूब करण्याची विनंती केली जाणार नाही, अशी ग्वाही ‘एनआयए’च्या वतीनं न्यायालयाला
देण्यात आली.
****
केरळमधल्या शबरीमाला अय्यप्पा
मंदिरात सर्व वयोगटांच्या स्त्रियांच्या प्रवेशाला संमती देणाऱ्या सर्वोच्च
न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी घेण्याच्या तारखेबद्दल आज निर्णय घेण्यात
येणार आहे. शबरीमाला प्रवेशाविषयी घटनापीठानं दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या
याचिकेवर तातडीनं सुनावणी व्हावी अशी विनंती याचिकाकर्ते वकील मॅथ्यूज नेदुंपारा यांनी काल केली होती. त्यावेळी सरन्यायाधीश
रंजन गोगाई आणि न्यायमूर्ती
एस.के. कौल यांनी आज यासंबंधीचा निर्णय घेण्याचं जाहीर केलं.
****
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या
दौऱ्यावर येत आहेत. लातूर, बीड तसंच औरंगाबाद इथं ते शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला
मार्गदर्शन करणार आहेत. लातूर इथं दगडोजीराव देशमुख सभागृहात सकाळी, बीड इथं रामकृष्ण
लॉन्सवर दुपारी एक वाजता तर, औरंगाबाद इथं श्रीहरि पॅव्हेलियन परिसरात सायंकाळी चार
वाजेच्या सुमारास हा मेळावा होणार आहे.
****
शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य न देता त्यांच्या
बॅंक खात्यावर थेट सबसीडी हस्तांतरण करण्याच्या शासन निर्णया विरोधात, स्वस्त धान्य
केरोसीन परवाना धारक महासंघाच्या वतीनं काल लातूर इथं एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात
आलं. या निर्णयामुळे राज्यातली सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडकळीस आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा
प्रयत्न असल्याचा आरोप आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २८ तारखेला
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा ४९वा भाग आहे.
*****
***
No comments:
Post a Comment