आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ ऑक्टोबर
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
इज ऑफ डुईंग
बिजनेसला आपलं प्राधान्य असल्याचं, प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
ते आज टोक्यो इथे भारत आणि जपानच्या उद्योजकांशी बोलत होते. जपानच्या सहकार्यानं भारतात
दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका, तसचं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम होत
असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. तेराव्या भारत जपान वार्षिक बैठकीसाठी पंतप्रधान
शनिवारपासून जपानमध्ये आहेत. भारत आणि जापानच्या उद्योजकांच्या बैठकीत सहभागी झालेल्या
उद्योजकांनी, आर्थिक सुधारणांसाठी भारत सरकारनं सुरू केलेल्या उपायांची प्रशंसा केली.
जपानी उद्योजकांनी भारतात अधिक गुंतवणूक करावी, असं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत
केलं.
****
इंडोनेशियाच्या
लायन एअर विमान कंपनीचं जेटी ६१० हे प्रवासी विमान आज जकार्ताहून उड्डाण केल्यानंतर
काही वेळातच समुद्रात कोसळल्याचं वृत्त आहे. या विमानात कर्मचारी आणि प्रवासी मिळून
एकशे अट्ठ्याऐंशी जण होते. हे विमान जकार्ताहून पंगकल पिनांग इथे जात होतं.
****
अयोध्येत
राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी विवादित जमिनीची तीन भागात वाटणी करण्याच्या अलाहाबाद
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकासमूहावर सर्वोच्च न्यायालयात आज
सुनावणी होण्याची शक्यता आहे. मशीद हे इस्लामचं अभिन्न अंग नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं
१९९४ साली एका निकालात म्हटलं होतं. या निकालाचा फेरविचार पाच न्यायमूर्तींच्या पीठात
व्हावा, या मागणीला न्यायालयानं गेल्या महिन्यात नकार दिला होता.
****
अहमदनगर जिल्ह्यात
अकोले, श्रीरामपूर, संगमनेर तालुक्यांचा भाग दुष्काळी जाहीर करावा अन्यथा निळवंडे धरणातून
जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत, अकोले तालुका शेतकरी संघर्ष समितीनं
नदीपात्रात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. खासदार
सदाशिव लोखंडे, संघर्ष समितीचे डॉ अजित नवले हे आंदोलनात सहभागी झाले असल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भ्रष्टाचारमुक्त
समाज निर्मितीच्या उद्देशानं देशभरात आजपासून दक्षता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
भ्रष्टाचाराचं निर्मूलन, नवभारताची निर्मिती, अशी या सप्ताहाची संकल्पना आहे.
*****
***
No comments:
Post a Comment