Sunday, 21 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.10.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21  October 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø समन्यायी पाण्याचं वाटप करून संघर्ष टाळण्याचं मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींचं आवाहन

Ø देशातली पहिली सागरी प्रवासी क्रूझ सेवा मुंबई ते गोवा दरम्यान कालपासून सुरू

Ø दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं रस्ता रोको आंदोलन

आणि

Ø डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल अंतिम फेरीत

****



 कायद्यानुसार समन्यायी पाण्याचं वाटप करून संघर्ष टाळण्याचं आवाहन मराठवाड्यातल्या लोक प्रतिनिधींनी केलं आहे. पावसा अभावी सध्या मराठवाड्यात पाणी टंचाई निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या लोक प्रतिनिधींनी समन्यायी पाणी  वाटपास विरोध करू नये असं आवाहन या लोक प्रतिनिधींनी काल औरंगाबादमध्ये वार्ताहरांशी बोलतांना केलं. सद्य:स्थितीत मराठवाड्यातल्या पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडीमध्ये १२ दशलक्ष घनफूट पाणी सोडणं आवश्यक असल्याचं आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी सांगितलं. यावेळी आमदार अतुल सावे, अब्दुल सत्तार, सतीश चव्हाण, इम्तियाज जलील, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भागवत कराड,  जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर उपस्थित होते.



 मराठवाड्याच्या पाण्याची तूट भरून काढण्यासंदर्भात मराठवाड्यातल्या लोक प्रतिनिधींची उद्या सोमवारी औरंगाबाद इथं बैठक होणार असल्याचंही आमदार बंब यांनी यावेळी सांगितलं.

****



 मुंबई ते गोवा दरम्यान, देशातल्या पहिली सागरी प्रवासी क्रूझ सेवा कालपासून सुरू झाली. केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत या सेवेचं उदघाटन केलं. मुंबई पोर्ट ट्रस्ट इथं आंग्रीया या क्रूझ अर्थात आलिशान प्रवासी जहाजाला हिरवा झेंडा दाखवल्यावनंतर हे क्रूझ गोव्याच्या दिशेनं रवाना झालं. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पाअंतर्गत ही क्रूझ सेवा सुरु झाली आहे. सहा मजली असणारं हे क्रूझ मुंबई ते गोवा हे अंतर १६ तासात पूर्ण करणार आहे. या क्रूझ मध्ये १०४ खोल्या असून ४०० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात.

****



 मराठवाड्यासह राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर रस्ता रोको आंदोलन केलं. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद-जळगाव रोडवर पालोद गावाजवळ तसंच औरंगाबाद- पुणे रस्त्यावर हे आंदोलन झालं. या आंदोलनामुळे काही काळ या रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. दुष्काळ जाहीर न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारूती वरदे आणि तालुकाध्यक्ष सुनिल सनासे यांनी दिली.

 जालना, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातही काल संघटनेच्यावतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 काँग्रेस पक्षाचे  अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या निवडक पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असतांना काही वेळाकरता ते नांदेड इथं थांबले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शक्ती ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या काँगेस कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.

****



 जाती अंताची चळवळ निर्माण करणं, हा आपल्या चळवळीचा भाग झाला पाहिजे असं मत हैदराबादच्या इंजिनिअरींग इन्स्टिट्युटचे उपप्राचार्य जयंत कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी काल औरंगाबाद इथं तीन दिवसीय प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यान मालेचं दुसरं पुष्प गुंफलं.   ‘राष्ट्रवादाची वैचारिक लढाई’ या विषयावर बोलताना जयंत कुलकर्णी म्हणाले की, समाजात द्वेष वाढणार नाहीत याची काळजी प्रत्यकानं घेणं गरजेचं आहे. देशाच्या सार्वभौमत्वापुढे आपला धर्म, भाषा, जात या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांनी विसरण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या व्याख्यानमालेत आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सांबित पात्रा हे ‘राफेल - सच्चाई एवम् समिक्षा’ या विषयावर शेवटचं पुष्प गुंफणार आहेत.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 टंचाईग्रस्त भागात कायमस्वरुपी उपाय योजनांसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आश्वासन  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी काल नांदेड इथं दिलं.



 नांदेड जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. एकात्मिक शेतीसह दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन, मत्स्यव्यवसाय यांची एकत्रीत जोड करुन वर्षभर रोजगार आणि उत्पन्न मिळेल अशी व्यवस्था ग्रामीण स्तरावर करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

****



 लातूर जिल्ह्यातल्या मांजरा प्रकल्पात सध्या ४५ दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा उपलब्ध असल्यानं लातूर शहराला जून २०१९ पर्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा होईल, असं आश्वासन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलं आहे. लातूर इथं काल रब्बी हंगाम कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या इतर प्रकल्पातल्या पाण्याचही सूक्ष्म नियोजन करण्यात आलं असून, नागरिकांनी पाणीटंचाईची काळजी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****



 केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्यात शौचालयाची कामं होत असून नागरिक शौचालयाचा वापर करत आहेत. यामुळे त्रास कमी झाल्याची भावना या योजनेच्या लाभार्थी संगीता साळवे यांनी व्यक्त केल्या -



शौचालय नसल्यामूळे बाहेर उघड्यावर जावे लागत होते. मात्र, स्वच्छ भारत अभियानामुळे घरात शौचालय बांधले. त्यामुळे रात्री-बेरात्री बाहेर न जाता घरातच शौचालयास सर्वजण जातोत. प्रधानमंत्र्यांनी ही योजना आणल्यामुळे आता होणारा त्रास वाचला. धन्यवाद प्रधानमंत्री.



 अन्य एक लाभार्थी आरती वाकुळे यांनीही आपल्या घरी शौचालय बांधून मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या -



शौचालय नसल्यामुळे बाहेर उघड्यावर जावे लागत होते. मात्र, आता शौचालय भारत अभियानामुळे घरात शौचालय बांधले. त्यामुळे रात्री-बेरात्री बाहेर न जाता घरातचं शौचास सर्वजण जातात. पंतप्रधान यांनी ही योजना आपल्यामुळे आता होणारा त्रास वाचला. धन्यवाद.

****



 डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिनं काल इंडोनेशियाच्या ग्रेगोरीया मारिस्का तुंगजुंग हिला २१-११, २१-१२ असं पराभूत केलं. अंतिम फेरीत तिची तैवानच्या ताई झू यिंग हिच्याशी लढत होईल.



 मात्र, पुरुष एकेरीत गतविजेता भारताचा किदांबी श्रीकांत आणि महिलांच्या दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सीप्पी रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला.

****



 भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. दिवस- रात्र होणाऱ्या या मालिकेतला पहिला सामना दुपारी दीड वाजता गुवाहाटी इथं सुरु होईल. दोन कसोटी सामन्यांची मालिका भारतानं याआधीच दोन-शून्यनं जिंकली आहे.

****



 परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात जिंतूर - येलदरी मार्गावरील शेवडी गावाजवळ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक जीप उलटून झालेल्या अपघातात सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना काल दुपारी तीन वाजेदरम्यान घडली. जखमींना जिंतूर इथं प्राथमिक उपचार करुन परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****



 उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हा कक्ष २४ तास सुरु राहणार आहे.

****



 हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी काल हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यातल्या पावसाअभावी वाढ न झालेल्या खरीप पिकांची पाहणी केली. यावेळी खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, डॉ.संतोष टारफे, आणि रामराव वडकुते त्यांच्या समवेत होते.

****



 वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाचं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर आज निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. सकाळी १० वाजेपासून सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत ही मोहिम कार्यरत राहील, असं जिल्हा निवडणूक विभागानं कळवलं आहे.

*****

***

No comments: