Wednesday, 31 October 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.10.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 October 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००

****

नवभारताच्या निर्माणासाठी भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज दक्षता सप्ताहाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारी कामकाजात अनावश्यक विलंब होत असल्यामुळे सर्व संस्थांची विश्वासार्हता कमी होत असल्याचं ते म्हणाले. पारदर्शक व्यवहारासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होत असून, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं.

****

नक्षलवाद्यांचे प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले म्हणजे वैफल्यग्रस्तातून होत असल्याचं मत लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केलं आहे. कोल्हापूर इथं आज माजी सैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. भारतीय सैनिक प्रत्येकवेळी नक्षलवाद्यांचे हल्ले चोखपणे परतवून लावत असल्याचं ते म्हणाले. मराठा लाईट इन्फंट्री ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालते, कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याची क्षमता फक्त मराठा इन्फंट्रीमध्ये असल्याचं त्यांनी नमूद केलं. माजी सैनिकांनी भारतीय लष्कराचा जास्तीत जास्त प्रसार करावा, असं आवाहन रावत यांनी यावेळी केलं.

****

सर्वोच्च न्यायालयानं अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार, उद्या सकाळी आठ वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली आहे. निळवंडे धरणातून तीन पूर्णांक ८५ आणि मुळा धरणातून एक पूर्णांक ९० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यानं कुणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये, तसंच नदीतील प्रवाह जास्त असल्यानं कुणीही नदीपात्रात उतरू नये, असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे. 

****

नागरिकांना शिधापत्रिकेवर आता धान्याबरोबरच रास्तभाव दुकानातून लोह आणि आयोडिनयुक्त शुद्ध मीठाचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर राज्यातल्या सामान्य नागरिकांना सुद्धा शिधापत्रिकेशिवाय शिधावाटप दुकानातून हे मीठ मिळणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. मुंबईमधल्या गिरगाव इथं आज नागरिकांना आयोडिनयुक्त मीठाचं प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या आरोग्य सर्वेक्षणानुसार सहा महिने ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यामुळेच लोह आणि आयोडिनयुक्त शुद्ध मीठ प्रति किलो १४ रुपये दरानं उपलब्ध करुन देण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य शासन मराठवाड्याच्या विकासासाठी करत असलेल्या उपाय योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी मागेल त्याला काम, पाण्याचे साठे पिण्यासाठी राखीव ठेवणं, चाऱ्याचं नियोजन, शेतीसाठी सुक्ष्म सिंचन वाढवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

****

देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आज संकल्प दिन म्हणून पाळण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बीड इथं आयोजित एकता दौडला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवला. नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.

****

परभणी इथं वीज वितरण कंपनीच्या निराशाजनक कामकाजाविरोधात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन आंदोलन केलं. वीज गळतीच्या नावाखाली ग्राहकांना देण्यात येणारी जादा रकमेची बिलं रद्द करावी, शेतीला नियमित वीज पुरवठा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

राज्य सरकारच्या चार वर्षपूर्ती निमित्त सरकारच्या विविध धोरणांचा निषेध करण्यासाठी औरंगाबाद इथं प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं विडंबनात्मक आसनं करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांची यावेळेस प्रमुख उपस्थिती होती.

****

शासनमान्य अनुदानित शाळांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि पदभरतीपासून शाळांना मिळणाऱ्या अनुदानापर्यंतचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं एल्गार पुकारला असून दोन नोव्हेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पश्चिम विदर्भातल्या तीन हजारांहून अधिक शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण संस्था महामंडळानं दिली आहे.

****

No comments: