Tuesday, 30 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.10.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30  October 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑक्टोबर  २०१ दुपारी १.०० वा.

****



 दिवाळीच्या काळात पर्यावरण पूरक, आणि रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास परवानगी देण्याच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं बदल केला आहे. पर्यावरण पूरक फटाके वापरण्याचा आदेश फक्त राष्ट्रीय राजधानी क्षेत्र - दिल्ली पुरताच मर्यादित असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. बाकी देशभरात सामान्य फटाके फोडता येतील, असंही न्यायालयानं सांगितलं आहे. फटाके फोडण्याची वेळ तामिळनाडू तसंच पुद्दुचेरी सारख्या राज्यात बदलून दिली जाईल, मात्र दिवसभरात ती दोन तासांपेक्षा अधिक नसेल, असं न्यायालयानं नमूद केलं आहे. दिवाळीत आपल्या प्रथेप्रमाणे, सकाळी फटाके फोडण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाची मागणी तामिळनाडू राज्य सरकारनं, एका याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली होती, त्यावर न्यायालयानं हे स्पष्ट केलं.

****



 दिल्लीतल्या वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं १५ वर्ष जुनी पेट्रोल वाहनं आणि १० वर्ष जुन्या डिझेल वाहनांवर बंदी घातली आहे. अशी वाहनं रस्तात आढळल्यास ती जप्त करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. अशा वाहनांची यादी केंद्रीय प्रदूषण नियामक बोर्डाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी करून, याबाबत जनजागृती करावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****



 केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला प्रवासी भारतीयांच्या विवाहाशी संबंधित प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी एक कक्ष स्थापन करण्यास सांगितलं आहे. प्रवासी भारतीय परित्यक्त्या महिलांनी दाखल केलेल्या तक्रारींवर काय निर्णय घेण्यात आले, याचा गांधी यांनी आढावा घेतला, या महिलांकडून खटला चालवणाऱ्या वकीलांनी राष्ट्रीय महिला आयोगासोबत साप्ताहिक समिक्षा बैठका घ्याव्यात, असंही त्यांनी सांगितलं.

****



 पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याताला मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदीनं त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या सक्तवसुली संचालनालयाच्या अर्जाविरोधात विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्थिक गैरव्यवहार कायद्याअंतर्गत, नीरव मोदीतर्फे काल १० याचिका दाखल करण्यात आल्या.

****



 आसाममधे काझीरंगा इथं आजपासून सार्वजनिक आरोग्य देखभाल व्यवस्थेसंदर्भात तीन दिवसांची पाचवी राष्ट्रीय परिषद सुरु होत आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होईल. विविध राज्यं आणि संघटनांद्वारे आरोग्य क्षेत्रात राबवल्या जात असलेल्या कौशल्यपूर्ण कार्यप्रणाली आणि नवोन्मेषी तंत्रज्ञानाचं आदान प्रदान करणं हा या परिषदेचा उद्देश आहे.

****



 थोर अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांची आज जयंती. त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. भारताच्या परमाणू कार्यक्रमाचे जनक असलेले डॉ. भाभा यांनी देशातल्या अनेक महत्त्वपूर्ण संस्थानांचा पाया रचला, त्यांनी दिलेल्या या वारशाचा देशाला अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****



 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती इथं, नियोजित रा. सू. गवई स्मारक संकुलाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी गवई यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.



ऐ चालता- फिरता येनसायक्डो पिडीया, जमिनीवरचा प्रचंड अनूभव. अनेक वेळा आपल्याला दोन प्रकारचे लोक भेटतात. एक जमिनीवर काम करणारे, जमिनीवरचा अनूभव असलेले आणि दुसरे प्रचंड त्यांना ज्ञान असणं पण या दोन्ही गोष्टीचा संगम होतो. सामान्य माणसाच्या अपेक्षा काय आहे.? त्यांची दु्‌:ख काय आहे. ही माहिती असलेले दादासाहेब होते.  



****



 औरंगाबाद शहरातल्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सर्व जलकुंभांवर संरक्षण देण्याची मागणी बहुजन शक्ती कामगार संघटनेनं महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. पाणी पुरवठ्यासंबंधी कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आल्यास कर्मचाऱ्यांनाच नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं, काल सिडको एन पाच इथल्या जलकुंभावर एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केल्याचं संघटनेनं आयुक्तांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****



बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर बी. अधिबान यानं इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयल ऑफ मॅन आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेच्या नवव्या आणि अंतिम फेरीत इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडॅम्सचा पराभव करुन तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. या विजयामुळे साडे सहा गुण मिळवत तो सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा भारतीय बुद्धीबळपटू ठरला आहे.

 *****

***

No comments: