Monday, 22 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.10.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22  October 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑक्टोबर  २०१ दुपारी १.०० वा.

****



 मी टू या अभियानाद्वारे महिलांनी केलेल्या आरोपांच्या आधारे संबंधित व्यक्तींविरोधात प्राथमिक माहिती  अहवाल नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची तत्काळ सुनावणी घेण्याला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, ही  सुनावणी नियमित क्रमाप्रमाणेच घेण्यात येईल, असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सांगितलं. या याचिकेमध्ये, या मागणीसह, तक्रारकर्त्या महिलेला सुरक्षा आणि मदत देण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाला द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

****



 केरळच्या प्रसिद्ध शबरिमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भातल्या न्यायालयाच्या ताज्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकांच्या सुनावणीची तारीख सर्वोच्च न्यायालय उद्या ठरवणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाबाबत फेरविचाराची मागणी करणाऱ्या एकोणीस याचिका, सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या असून, यांच्या सुनावणीच्या तारखेबाबत उद्या निर्णय घेतला जाईल, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे.

****



 राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. जैन धर्मीयांचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र - मांगीतुंगी इथं आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनांचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुपारी होणार आहे. यावेळी सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा या ग्रंथाचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते होईल, तसंच मुरादाबाद इथल्या तीर्थंकर महावीर विश्व विद्यालयाचे कुलगुरू सुरेश जैन यांना भगवान ऋषभ आंतरराष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

****



 आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू झाल्यापासून एक महिन्याच्या आत गंभीर रोगांनी ग्रस्त असलेल्या एक लाख लाभार्थ्यांनी देशभरातल्या रुग्णालयांतून आरोग्यसेवा प्राप्त केल्या आहेत. मध्यप्रदेशातल्या रीवा इथल्या एका रुग्णालयात इलाज घेणारी शेहेचाळीस वर्षांची एक व्यक्ती या योजनेची एक लाखावी लाभार्थी ठरल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर जे.पी.नड्डा यांनी दिली. देशभरातल्या चौदा हजार शासकीय आणि निवडक खाजगी रुग्णालयांमधून या योजनेचा लाभ घेता येतो, असं नमूद करत, ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आरोग्य सुविधांचा पायाभूत आराखडा तयार केला जात आहे, असं नड्डा यांनी सांगितलं आहे.

****



 वस्तू आणि सेवा करांतर्गत सप्टेंबर महिन्याचं विवरण तीन ब दाखल करण्याची मुदत येत्या २५ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. कराच्या कक्षेत नव्यानं आलेले विशेष करदाते तसंच या संदर्भात व्यापाऱ्यांसह उद्योगांच्या विविध शंका, लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

****



 भाजपचे काही नेते आणि नोकरशहा, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप करत, गोवा प्रदेश काँग्रेस समितीनं पर्रीकर यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. विरोधी पक्ष म्हणून आमची काही जबाबदारी असल्यानं मुख्यमंत्र्यांचं काम कोण सांभाळत आहे, हे कळण्याचा आम्हाला हक्क आहे, आणि त्यासाठी आम्हाला पर्रीकर यांची भेट घ्यायची  आहे, मात्र आम्हाला ती नाकारली जात आहे, असा आरोप गोव्याच्या काँग्रेस प्रवक्त्या स्वाती केरकर यांनी केला आहे.

****



 सामाजिक संपर्क माध्यमावर आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या कारणावरुन मुंबईत घाटकोपर इथं काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली, आज पहाटे ही घटना निदर्शनास आली. मनोज दुबे असं या कार्यकर्त्याचं नाव असून, मध्यरात्री नंतर सुमारे दीड वाजेदरम्यान दोन ते तीन अज्ञात इसमांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. यासंदर्भात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****



 परतीच्या पावसानं आता निरोप घेतला असून, तापमानात वाढ होत असल्याचं दिसत आहे. राज्यातही ऑक्टोबर महिन्यातली उष्णता जाणवत असून, अनेक ठिकाणी तापमान ३५ अंश सेल्सियसच्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे. येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहणार असून, तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

*****

***

No comments: