Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 October 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००
****
राज्यातल्या
१८० तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज
जाहीर केलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी
वार्ताहर परिषदेत सांगितलं. या तालुक्यात दुष्काळ निवारणासंदर्भातल्या आठ योजना लागू
होणार आहेत, यामध्ये टँकर, चारा छावण्या, फी माफी, कृषी पंपाच्या वीज बिलात सूट, अशा
योजनांचा समावेश आहे. राज्यात यावर्षी सरासरी फक्त ७७ टक्के इतकाच पाऊस झाल्याचं ते
म्हणाले.
दरम्यान,
केंद्र सरकारचं पथकही महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार
आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्राच्या पथकानं राज्यातल्या परिस्थितीची
पाहणी केल्यानंतर केंद्र सरकार राज्याला मदत जाहीर करेल असं ते म्हणाले.
****
प्रधानमंत्री
आवास योजनेतून घर निर्मितीला वेग देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची
स्थापना करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या ३८३ स्थानिक
नागरी स्वराज्य संस्थांध्ये १९ लाख ४० हजार घर निर्मितीचं उद्दिष्ट असून, या महामंडळाच्या
माध्यमातून ते साध्य केलं जाणार आहे.
मराठवाडा
आणि विदर्भातली सातत्याची दुष्काळी परिस्थिती पाहून मत्स्य व्यवसायासाठी फिरते वाहन
ही योजना राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. मासळी विक्रीसाठी या फिरत्या
वाहनाचा उपयोग करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य सरकारचा ९० टक्के आणि जिल्हा नियोजन
आणि विकास परिषदेचा १० टक्के वाटा राहणार आहे. १० जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात
येणार असून, ४४ शेतकरी गटांचा यामध्ये सहभाग असेल.
पुणे
जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या मौजे बावधन इथं २२ एकर क्षेत्रावर वन्य प्राण्यांसाठी
उपचार केंद्र सुरु करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. यासाठी ४७ कोटी रुपये
खर्च अपेक्षित असून, वन्य प्राण्यांना तीस दिवसांपर्यंत उपचारार्थ ठेवण्याची सुविधा
उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणासाठी आठ पूर्णांक ९९ दशलक्ष घन फूट पाणी सोडण्याचे आदेश
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर यांनी संबंधितांना
दिले आहेत. या आदेशानुसार नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून जायकवाडी धरणात
कुठल्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल. मुंबईत काल झालेल्या राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या
बैठकीत प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी.बक्षी यांनी गोदावरी पाटबंधारे विभागाला जायकवाडी
धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.
****
विद्यार्थ्यांनी
परस्परांमधलं सौहार्द कायम राखत समाजासाठी कार्य केलं पाहिजे, असं आवाहन राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सिम्बॉयसिस संस्थेच्या सतराव्या दीक्षांत
समारंभात बोलत होते. या समारंभात नऊ सुवर्ण पदकांपैकी सहा पदकं मुलींनी मिळवल्याबद्दल
त्यांनी समाधान व्यक्त केलं. भारतात शिकणारे परदेशी तरुण इथं विद्यार्थी म्हणून येतात
पण जाताना देशाचे चांगले मित्र आणि सदिच्छादूत म्हणून जातात, असंही राष्ट्रपतींनी नमूद
केलं.
****
सरकार
अडचणीचे विषय न्यायालयाकडे ढकलून वेळकाढूपणा करत असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लातूर इथं आज शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. संपूर्ण
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असताना सरकार दुष्काळ जाहीर करत नसल्याचंही ते म्हणाले.
शिवसेना सत्तेत राहून जनतेची कामं करुन घेत असल्याचं सांगून ठाकरे यांनी, जनतेसोबत
रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला. लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा झाला, याचं श्रेय
शिवसेनेचंच असल्याचं खासदार चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले.
****
साखर
कारखान्यांनी पारदर्शक कारभार करून शेतकऱ्यांचं हित जोपासावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. जालना जिल्ह्यातल्या समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या
३५ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते आज बोलत होते. मराठवाड्यात अत्यल्प पावसामुळे
खरीप हंगाम वाया गेला असून, रबी अशा मावळल्या आहेत. त्यामुळे शासनानं तत्काळ दुष्काळ
जाहीर करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असंही पवार यावेळी म्हणाले.
****
काँग्रेस
पक्षाच्या वतीनं उद्यापासून राज्यभरात दुष्काळासह विविध प्रश्नांसाठी संघर्ष यात्रा
काढली जाणार आहे. ही यात्रा परभणीत २८ सप्टेंबर रोजी दाखल होणार असल्याचं जिल्हाध्यक्ष
सुरेश वरपुडकर यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. यावेळी जिल्ह्यात विविध ठिकाणी
सभा होणार असल्याचं ते म्हणाले.
****
No comments:
Post a Comment