Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 October 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
v नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा
निर्णय गुरुवारपर्यंत लांबला
v मत विभाजनाची जाणीव असल्यामुळे शिवसेना- भाजप युती कायम- मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
v दुष्काळसदृश ग्रामीण भागातल्या
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाचा मोफत प्रवास सवलत पास
आणि
v चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर २२४
धावांनी दनदनित विजय
*****
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी
सोडण्याचा निर्णय गुरुवारपर्यंत लांबला आहे. पाणी सोडण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात
याचिका दाखल झाली असून या याचिकेवरची सुनावणी पूर्ण होईपर्यंत पाणी न सोडण्याचा निर्णय
प्रशासकीय यंत्रणेनं घेतला. यामुळे गंगापूर- दारणा आणि पालखेड धरणातूल आजपासून पाणी
सोडण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून पाणी
सोडण्याचा निर्णयही प्रशासनानं काल स्थगित केला. या धरणातून एक हजार नऊशे दशलक्ष घनफूट
पाणी काल जायकवाडीसाठी सोडण्यात येणार होतं, मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासन
पाणी सोडू शकलं नाही.
निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडू नये, या
मागणीसाठी अकोले तालुक्यातले शेतकरीही प्रवरा नदीच्या पुलावर दोन दिवसांपासून ठिय्या
आंदोलन करत आहेत. या मागणीसाठी अकोले शहरातही शेतकऱ्यांनी काल मोर्चा काढला.
****
शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती तुटली तर मतं विभाजित
होतील, या वस्तुस्थितीची जाणीव असल्यानं युती कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते काल
बोलत होते. सरकार सकारात्मकतेनं, सर्वांना विश्वासात घेऊन काम करत असताना, सरकारला
पुरेसा वेळ न देता फक्त राजकीय हेतूनं आंदोलनं करणं योग्य होणार नाही, असं त्यांनी
राज्यात सुरू असलेल्या काही आंदोलनांच्या संदर्भात म्हटलं. स्वत:च्या कार्यकाळात कोणतंही
काम न करता, काम करणाऱ्या सरकारला अडवण्याचं, विरोधी पक्षांचं धोरण चुकीचं असल्याचं
ते म्हणाले. धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला अधिकार नसून, तो केंद्र सरकारला आहे,
राज्य सरकार यासंदर्भात योग्य ती शिफारस केंद्राला करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण आणि समन्वयासाठी एक स्वतंत्र
कक्ष निर्माण करण्यात येत असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव
लोणीकर यांनी काल मुंबईत दिली.
राज्यात
यावर्षी काही जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. सध्या काही
जिल्ह्यात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पिण्याच्या
पाण्याच्या टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांसाठी स्थायी आदेशाद्वारे
संबंधित यंत्रणांना सविस्तर सूचना दिलेल्या आहेत, असं लोणीकर यांनी सांगितलं.
****
राज्यात
निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन
महामंडळानं ग्रामीण भागातल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उर्वरीत
शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सवलत पास देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.
दुष्काळसदृश म्हणून घोषित झालेल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ही सवलत असल्याचं, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. ही संपूर्ण सवलत एसटी
महामंडळामार्फत देण्यात येणार असून त्यासाठी महामंडळावर साधारण ८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त
बोजा पडणार आहे. राज्यातल्या साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांना या सवलत योजनेचा लाभ
मिळेल, असे रावते यांनी सांगितलं.
****
राज्य
सरकारचे कर्मचारी तसंच अन्य पात्र कर्मचाऱ्यांचा १ जानेवारीपासून थकित तीन टक्के
महागाई भत्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या वेतनात रोखीने देण्याचा आदेश काल जारी
करण्यात आला. एकूण ९ महिन्याची ही थकबाकी आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती
नरेश पाटील यांनी काल शपथ घेतली. मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी
त्यांना शपथ दिली.
****
राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना काल मुंबईत, प्रसिद्ध पार्श्वगायिका
पुष्पा पागधरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, शाल, मानपत्र, मानचिन्ह
अशा स्वरुपाचा हा पुरस्कार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
काँग्रेस पक्षानं सुरू केलेली जनसंघर्ष यात्रा काल
जालना जिल्ह्यात पोहोचली. मंठा इथं काल झालेल्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण
यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. गेल्या साडेचार वर्षाच्या काळात
दिलेल्या आश्वासनाची सरकारनं अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जालना
जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी परभणी जिल्ह्यात ही जनसंघर्ष यात्रा फिरली. सकाळी परभणीत
तर दुपारी पाथरी इथं जाहीर सभा घेण्यात आल्या. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा,
यासाठी ही यात्रा आयोजित केल्याचं नमूद करत, महागाईनं त्रस्त
झालेल्या जनतेच्या पाठीशी काँग्रेस
पक्ष उभा आहे, असं प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितलं.
****
उन्हाळ्यातला पाणीटंचाईचा कालावधी लक्षात घेऊन नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी, नांदेड जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पांमधला,
पुढच्या पंधरा ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा, पिण्यासाठी आरक्षित केला. कदम यांच्या
अध्यक्षतेखाली पाणी आरक्षणाबाबत जिल्हा नियोजन समितीची काल बैठक झाली, त्यावेळी पालकमंत्र्यांनी
हा निर्णय घेतला.
या बैठकीनंतर पालकमंत्री कदम यांनी बिलोली तालुक्यातल्या केरुर गावाला
भेट देऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
येत्या दोन महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने
पाच हजार शेततळी तयार करण्याचं उद्दीष्ट ठेऊन सर्वांनी अधिक व्यापक प्रमाणात काम करण्याचे
निर्देश विभागीय आयुक्क डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी दिले आहेत.
टंचाईसदृश्य परिस्थिती नियोजनासंदर्भात काल झालेल्या
आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. पाणी पातळी वाढवण्याच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना
राबवण्याकरता तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी समन्वयानं
नियोजनपूर्वक कामं करण्याची सूचनाही डॉ. भापकर यावेळी केली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या
विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींबाबत पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी प्रकुलगुरू
अशोक तेजनकर यांना काल एक निवेदन सादर केलं. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती असून,
विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित काम
देण्यात यावं, वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा पुरवाव्यात, यासह विविध
मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
****
भारत - वेस्ट इंडिज यांच्यात काल मुंबईत झालेला चौथा
एकदिवसीय क्रिकेट भारतानं २२४ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतानं वेस्ट इंडिज
संघासमोर विजयासाठी ३७८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघ
३७ व्या षटकात १५३ धावांवर सर्वबाद झाला. खलील
अहमद आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी तीन तर भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी
एक बळी घेतला. १६२ धावा झळकावणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला. पाच सामन्यांच्या या
मालिकेत, भारतानं दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला पुढचा सामना येत्या गुरुवारी
तिरुवअनंतपुरम इथं होणार आहे
****
राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दर तीन वर्षांनंतर
मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यात या महत्त्वाकांक्षी अभियानाची
अंमलबजावणी अत्यंत परिणामकारकपणे सुरु आहे. अमरावती जिल्ह्यातल्या डावरगावचे या योजनेचे
लाभार्थी एकनाथ भांडे यांनी मृद आरोग्य पत्रिकेद्वारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
केल्यानं त्यांच्या पीक उत्पादकतेत वाढ झाली आहे. ते म्हणाले…
माझ्याकडे
१२ एकर शेती आहे. मी माझ्या शेतातली मातीचे परिक्षण करून घेतले. शेत जमीनीची भौतिक
आणि रासायनिक तपासणी केल्या नंतर पिकांना उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण शोधून काढण्यात
आले. त्यानूसार आवश्यक असणारे शेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खतांचा पूरवठा
एकात्मिक पध्दतीने जमीनस दिल्या मुळे माझ्या शेतमालाचे उत्पादन वाढले आणि माती आरोग्य
तपासणी अभियानांतर्गत जमीनीची प्रतवारी तपासल्यामुळे शेती फायद्याचे होऊ लागली आहे.
यामुळे मी प्रधानमंत्री कृषी पत्रिका अहवाल दिल्या प्रकरणी आभार मानतो.
****
लातूरमधल्या कॉंग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी मृत्यू
प्रकरणातल्या आरोपीला मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी आमदार डॉ निलम गोऱ्हे यांनी
केली आहे. राज्य महिला आयोग आणि स्त्री आधार केंद्राच्यावतीनं महिला विषयक कायद्यांसंबधी
एक दिवसीय कार्यशाळा काल लातूर इथं घेण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोपानंतर त्या
वार्ताहरांशी बोलत होत्या. कल्पना गिरी प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण – सी
बी आय करत असून हा खटला लवकर चालवावा असं, जामीनावर असलेला या खटल्यातल्या आरोपी आपल्याला
दूरध्वनीवरून सांगत असतो, याबाबत आपण पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली असल्याचं डॉ.गोऱ्हे
यांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment