Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 October 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००
****
महापालिकांनी
आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करुन शहराच्या शाश्वत विकासावर भर द्यावा, असं आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथं आज अठराव्या महापौर परिषदेचं
उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. २०३० पर्यंत दळणवळण व्यवस्था, इलेक्ट्रीक वाहन किंवा
जैव इंधनावर आणल्यास शहरांचं प्रदूषण कमी होईल. तसंच सांडपाणी आणि दळणवळण व्यवस्थेच्या
अभावी शहरांचं वातावरण दूषित झालं असून, कमी कार्बन उत्सर्जन करणारी व्यवस्था उभी करणं
आवश्यक असल्याचं ते म्हणाले. यापुढे शहरांना डम्पींग ग्राऊंडसाठी जागा मिळणार नाही,
मात्र घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया उभारण्यासाठी जागा मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी
स्पष्ट केलं. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन सांडपाण्याचा पुनर्वापर आणि त्यातून उत्पन्न
हा महापालिकांचा अजेंडा असायला हवा, असं ते म्हणाले.
****
भीमा-कोरेगाव
प्रकरणी २८ सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालाविरोधात दाखल करण्यात आलेली पुनर्विलोकन याचिका
सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. २८ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच कार्यकर्त्यांची सुटका करण्यास नकार देत ती याचिका
फेटाळली होती होती. त्या निकालाविरोधात लेखिका रोमिला थापर यांनी पुनर्विलोकन याचिका
दाखल केली होती.
****
पाकिस्तानी
सैन्यानं घुसखोरी सुरु ठेवली तर भारताकडे प्रत्यूत्तरादाखल अनेक उपाय असल्याचं लष्कर
प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान त्यांच्या अनेक शिबिरांमध्ये दहशतवाद्यांना
प्रशिक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला. नवी दिल्ली इथं आज पायदळाच्या ७२व्या स्थापना
दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दगडफेक करणारे हे दहशतवाद्यांचेच स्थानिक
कार्यकर्ते असून एका सैनिकाचा दगडफेकीत झालेल्या मृत्यू प्रकरणी एका जणाविरोधात खुनाचा
गुन्हा दाखल केला असल्याचं ते म्हणाले.
****
माजी
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशाच्या राजकारणात नवीन विचार आणले, असं केंद्रीय
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज पहिल्या अटल बिहारी स्मृती
व्याख्यानमालेत ते बोलत होते. भारतात मजबूत केंद्र सरकारसोबतच मजबूत राज्यही पाहिजे,
असं ते म्हणाले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक अजूनही निवडून येतात, ही चिंतेची
बाब असून, भ्रष्टाचार हे एक मोठं आव्हान असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ४९वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणातून जायकवाडीत पाणी
सोडण्यासाठी आमचा विरोध नाही, मात्र या भागात दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा निळवंडे
धरणातून जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही, अशी भूमिका आज अकोले तालुका शेतकरी संघर्ष
समितीच्या वतीनं घेण्यात आली. अकोले तहसील कार्यालयात आज संघर्ष समिती, पाटबंधारे विभागाचे
कार्यकारी अभियंता किरण देशमुख, अकोलेचे तहसीलदार, आमदार वैभव पिचड, डॉ अजित नवले यांच्यात
झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, भंडारदरा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये,
या मागणीसाठी आज अकोले तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय बंद असल्यानं
शहरातली सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती.
****
‘राजर्षी
छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजने’त नवीन अभ्यासक्रमांचा समावेश
करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. नवीन आणि मान्यताप्राप्त
अभ्यासक्रमांचा समावेश संदर्भीय शासन निर्णयात व्यावसायीक आणि बिगर व्यावसायीक या दोन्ही
यादीत करण्यात आला नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकातले विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याचं चव्हाण यांनी आपल्या
पत्रात म्हटलं आहे.
****
वेस्टइंडीज
आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध् यावर्षअखेर होणाऱ्या टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी
भारताच्या १६ खेळाडूंच्या संघातून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला वगळण्यात आलं
आहे. तर येत्या चार नोव्हेंबरपासून वेस्टइंडिज विरुद्ध सुरु होणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेतल्या
तीनही सामन्यांमध्ये कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत,
रोहित शर्मा संघाची धुरा सांभाळणार आहे.
****
मस्कत
इथं सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेतल्या उपान्त्य फेरीत आज भारताचा
सामना जपान बरोबर होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजून ४० मिनिटांनी या सामन्याला
सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment