Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date –
25 October 2018
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२५ ऑक्टोबर २०१८
दुपारी
१.०० वा.
****
पुणे जिल्ह्यातल्या भिमा कोरेगाव
हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांना तपास करण्यासाठी आणखी वेळ न देण्याच्या मुंबई उच्च
न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली
आहे. या प्रकरणी तपास पूर्ण करून, आरोप पत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना सत्र न्यायालयानं
मुदत वाढवून दिली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयानं काल ही मुदतवाढ अमान्य केली.
या प्रकरणात अनेक जणांना अटक करण्यात
आलेली आहे. उच्च न्यायालयानं मुदत वाढवून दिली नाही तर हे आरोपी जामीन मंजूर करण्यासाठी
पात्र होतील, असं राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. याप्रकरणी आता सर्वोच्च
न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे.
****
जम्मू काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यातल्या क्रिरी
परिसरात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या परिसरात काही
दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांचं विशेष अभियान
दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी परिसराला घेराव घातला. त्यावेळी ही चकमक
झाली. सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरातली मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
****
कामाच्या ठिकाणी, महिलांच्या
लैंगिक शोषणाच्या प्रकरणांसंदर्भात सध्याच्या कायदेशीर आणि संस्थात्मक व्यवस्थेची तपासणी
करण्यासाठी केंद्र सरकारनं एक मंत्रिगट स्थापन केला आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह या
मंत्रिगटाचे अध्यक्ष असतील, तर परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, संरक्षण
मंत्री निर्मला सीतारामन, महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी हे सदस्य असतील.
हा गट येत्या तीन महिन्यात महिलांच्या सुरक्षेच्या सध्याच्या तरतुदींचा आढावा
घेईल आणि इतर अपेक्षित उपाययोजनांची शिफारस करेल, असं
सरकारी प्रसिद्धीपत्रकात
म्हटलं आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयानं एक इलेक्ट्रॉनिक तक्रारपेटी सुरु केली
आहे. त्याद्वारे सर्व महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत तक्रार करता येईल.
****
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किफायतशीर आणि रास्त दर एफ
आर पी नुसार साखर कारखानदारांकडून किंमत मिळवून दिली जाईल, यामध्ये कोणतीही तडजोड केली
जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या
पन्हाळा तालुक्यातल्या कोडोली इथं आयोजित कष्टकरी शेतकरी परिषदेत ते काल बोलत होते,
या परिषदेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी, यंदाच्या गळीत हंगामात एफआरपी सोबत
दोनशे रुपये दर द्यावा अशी मागणी केली. साखरेचा किमान हमी भाव दर २९ रुपये वरून ३१
रुपये करण्यासाठी तसंच साखर निर्यातीच्या धोरणांमध्ये बदल करण्यासंबंधी केंद्र सरकारकडे
मागणी करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबईत काल शिवस्मारक पायाभरणी आणि भूमिपूजन
प्रसंगी झालेल्या बोट दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर
इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं.
****
मानवतावाद हाच तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या तत्वज्ञानाचा पाया असल्याचं, प्रसिद्ध साहित्यिक डॉ हृषीकेश कांबळे यांनी म्हटलं
आहे. ६२ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त ओमानची राजधानी मस्कत इथं आयोजित कार्यक्रमात
ते बोलत होते. डॉ आंबेडकर यांनी जागतिक लोकशाहीला दिलेलं सामाजिक न्यायाचं तत्व जगभरातल्या
वंचितांच्या हक्काची पताका फडकावत असल्याचं, डॉ कांबळे यांनी नमूद केलं.
****
ओमान इथं सुरु असलेल्या अशिया चषक हॉकी सामन्यातल्या अखेरच्या
साखळी सामन्यात काल भारतानं दक्षिण कोरियाचा चार - एक असा पराभव करुन १३ गुणांसह गटात
अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. हरमनप्रीत सिंग यानं सलग तीन गोल नोंदवून भारताच्या
विजयात मोठं योगदान दिलं, तर गुरजंत सिंग यानं अन्य गोल केला. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, मलेशिया
आणि जपान हे चार संघ उपान्त्य फेरीसाठी निश्चित झाले आहेत. उपान्त्य सामने येत्या शनिवारी
तर अंतिम सामना रविवारी होणार आहे.
****
पॅरिस इथं सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन
स्पर्धेत पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, किदंबी श्रीकांत यांच्यासह दहा भारतीय बॅडमिंटनपटू
उपान्त्य पूर्व फेरीचे सामने आज खेळणार आहेत. सायनाचा सामना जपानच्या नोजोमी ओकुहारासोबत,
तर सिंधूचा सामना जपानच्याच सायका साटो बरोबर होणार आहे. पुरुष एकेरीत श्रीकांतचा सामना
दक्षिण कोरियाच्या ली डोंग क्यू बरोबर, तर बी साई प्रणितचा सामना इंडोनेशियाच्या जोनाथन
क्रिस्टी बरोबर होणार आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज - चिराग शेट्टी आणि मनु अत्री
- बी सुमीत रेड्डी यांची जोडी, तर महिला दुहेरीत मेघना जक्कामपुडी आणि पूर्विषा एस
राम यांची जोडी खेळणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४९वा भाग
असेल.
*****
***
No comments:
Post a Comment