Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date –
24 October 2018
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२४ ऑक्टोबर २०१८
दुपारी
१.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा
सेऊल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. दक्षिण कोरियातल्या द सेऊल पीस प्राइझ कमिटीनं
आज ही घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांची स्वदेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कामगिरीची
दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न,
जागतिक अर्थ व्यवस्थेच्या वाढीमध्ये योगदान, त्याचबरोबर भारतीयांच्या विकासाला चालना
दिल्याबद्दल पंतप्रधानांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचं द सेऊल शांतता पुरस्कार
समितीनं म्हटलं आहे. भ्रष्टाचाराविरोधात पावलं उचलल्यानं आणि समाजाच्या एकत्रीकरणाच्या
प्रयत्नांद्वारे पंतप्रधानांनी भारताच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले आहेत, याचीही
या पुरस्कार निवडीसाठी नोंद घेण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं
आहे. सेऊल शांतता पुरस्काराचे पंतप्रधान १४वे मानकरी असून, त्यांचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय
पुरस्कार आहे.
****
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआय प्रमुख आलोक
वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात
वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायालय येत्या
२६ तारखेला सुनावणी घेणार आहे. वर्मा यांच्या जागी सहसंचालक एम नागेश्वर राव यांच्याकडे
तत्काळ प्रभावानं, सीबीआय प्रभारी संचालकपद सोपवण्यात आलं असून, याविरोधातही वर्मा
यांनी याचिका दाखल केली आहे. आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावर
भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं ही कारवाई करण्यात आली.
****
देशभरात एक एप्रिल २०२० पासून भारत स्टेज बी एस फोर
श्रेणीतल्या वाहनांची विक्री होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. वाहनांमधून
होणारं वायू प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी बी एस अर्थात भारत स्टेज हे सरकारद्वारे
निश्चित केलेलं मानक आहे. बी एस सहा हे उत्सर्जन मानक एक एप्रिल २०२० पासून देशभरात
लागू होणार आहे.
****
महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत
आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. महर्षी वाल्मिकी हे सामाजिक एकता आणि सौहार्दाचं प्रतीक असून,
त्यांचं आदर्श जीवन आणि त्यांची रचलेलं महाकाव्य रामायण यापासून आपल्याला नेमही प्रेरणा
मिळत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. महर्षी वाल्मिकी
यांचे महान आदर्श, विशेषत: समानता, सामाजिक न्याय आणि बंधुभाव यावरचा त्यांचा संदेश
नेहमी स्मरणात ठेवला पाहिजे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर शहरातल्या नौगाम परिसरात
सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले.
या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी मध्यरात्री शोधमोहीम सुरु
केली, त्यानंतर ही चकमक झाली. दहशतवाद्यांची ओळख पटवली असून, शोधमोहीम संपल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
सरकार
कर सवलत देण्यासाठी कटिबद्ध असून, करदात्यांची संख्या गतीनं वाढली, तर आणखीन कर कपात शक्य
असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला
दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. करदात्यांना अधिक सुविधा देण्याकडे सरकारचं लक्ष असून,
कर चुकवणाऱ्यांना माफ केलं
जाणार नाही असं ते म्हणाले. आयकराची ई-मूल्यांकन प्रणाली अ आणि ब दर्जाच्या ३०० शहरापर्यंत विस्तारल्याची
माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
प्रत्येक
ग्राहकाला त्याच्या अधिकाराची जाणीव असणं आवश्यक असून, त्यासाठी त्याचं सातत्यानं प्रबोधन
करण्याची गरज असल्याचं ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांनी
म्हटलं आहे. मुंबई इथं काल ‘जागो ग्राहक जागो’ या
मोहिमेंतर्गत अशासकीय सदस्य आणि अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत ते
बोलत होते. ग्राहकांना तक्रार नोंदवता यावी यासाठी प्रत्येक विभागात नि:शुल्क क्रमांक
उपलब्ध असून, ग्राहकांचं हे जनजागृतीचं काम शासकीय तथा अशासकीय सदस्यांनी सातत्यानं
करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
****
ओमानमधे
सुरु असलेल्या अशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात
भारत आणि मलेशिया यांच्यात बरोबरी झाल्यानं सामना अनिर्णित राहिला. या स्पर्धेत एकदाही
पराभव न पत्करता भारत आणि मलेशिया या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीतलं स्थान पक्कं केलं
आहे. राऊंड रॉबिन सामन्यात आज भारताची लढत दक्षिण कोरियाशी होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment