Sunday, 28 October 2018

Text - AIR News Bulletin Aurangabad 28.10.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 October 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००

****

यवतमाळ इथं होणाऱ्या ब्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, लेखिका, समीक्षक डॉ.अरुणा ढेरे यांची सार्वमतानं निवड करण्यात आली. यवतमाळ इथं आज झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे संमेलन ११ ते १३ जानेवारी दरम्यान होणार आहे. अरुणा ढेरे या मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या पाचव्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानानं निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावं, संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून प्रत्येकी एक आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून एक अशी नावं मागवण्यात आली होती. यवतमाळमध्ये आयोजित हे साहित्य संमेलन चिरकाळ स्मरणात राहील, असा विश्वास पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला. 

****

समाजातल्या गरीब आणि गरजू लोकांपर्यंत प्रभावी आणि परिणामकारक आरोग्य सुविधेचा लाभ अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून पोहचवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज अटल महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत राज्यातल्या अत्यंत गरजू आणि गरिबांना तातडीच्या उपचारासाठी ४५० कोटी रुपये उपलब्ध केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचवू शकलो, असं ते म्हणाले. केवळ उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून गरजू नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

अयोध्या मंदीर-मशीद प्रकरणी संबंधित विवादित जमिनीची तीन भागात विभागणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून सुनावणी सुरू होण्याची अपेक्षा आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती संजय किशन आणि न्यायमूर्ती के.एम.जोसेफ यांचं खंडपीठ या याचिकांवर सुनावणी घेणार आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आज सकाळी एक धमकी देणारं पत्र मिळालं आहे. मनुस्मृतीचा विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी या निनावी पत्रात देण्यात आली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दिव्यांग व्यक्ती समान संधी समान हक्क - आरपीडी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती केली पाहिजे, असं मत सामाजिक न्याय मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सल्लागार डॉ.सुकुमारजी यांनी व्यक्त केलं आहे. लातूर इथं आरपीडी कायदा या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा आज समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग हे कर्तृत्ववान असतात, फक्त त्यांच्या क्षमता ओळखण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. देशभरातल्या विविध दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते.

****

जालना जिल्ह्यात मागील वर्षी बोंड अळीमुळे कापूस पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तिसऱ्या टप्प्यात ९१ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नुकसान भरपाईची ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. बोंडअळीनं नुकसान झालेल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यापूर्वी १८६ कोटी रुपयांची मदत देण्यात आली.

****

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील, अशी ग्वाही कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव आणि बीड तालुक्यात पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांची निलंगेकर यांनी आज पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व परिस्थितीचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र्य निर्णय घेण्यासाठी कृषीमूल्य आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात यावा, अशी मागणी लातूरचे माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी केली आहे. लातूर तालुक्यातल्या वाजरखेडा इथं आज जननायक संघटनेच्या वतीनं आयोजित जनसंवाद यात्रेत ते बोलत होते. मराठवाडा आणि लातूर जिल्ह्याच्या हक्काचं २३ दशलक्ष घनफूट पाणी मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मोठं जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

****

नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी आज नांदेड तालुक्यातल्या काकांडी आणि धर्माबाद तालुक्यातल्या जारीकोट इथल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या विंधन विहिरींची पाहणी केली. जवाहर नगर आणि जारीकोट इथल्या पाणी पुरवठा योजनांची कामं गतीनं करुन गावकऱ्यांना त्वरीत पाणी पुरवठा करावा, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.

****

No comments: