Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 October 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००
****
राष्ट्रीय
सुरक्षेशी संबंधित बाबींमध्ये लोकप्रिय उपायांना प्राधान्य द्यायला नको, असं मत राष्ट्रीय
सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्लीत आज ते प्रतिष्ठेच्या
सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. जोपर्यंत देशातलं खाजगी क्षेत्र मजबूत
होत नाही तोपर्यंत देश समृद्ध होणार नाही, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. भारतानं
जगात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञानाला विशेष महत्व दिलं पाहिजे, असं सांगून
डोभाल यांनी, देशात डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर भर दिला.
****
लैंगिक
शोषण झालेल्या महिलांनी त्यांच्या तक्रारी ‘शी बॉक्स’ या ऑनलाईन तक्रार प्रणालीवर करण्याचं
आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी केलं आहे. कामाच्या ठिकाणी
होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगाकडे थेट पाठवू शकतात किंवा त्या
एनसीडब्ल्यू डॉट मीटू ॲट जीमेल डॉट कॉम या इ-मेल वरही पाठवू शकतात, असं त्यांनी सांगितलं.
या पोर्टलवर महिलांना आपल्या तक्रारीची दखल कशाप्रकारे घेतली गेली, हे सुद्धा कळणार
असल्याचं गांधी यांनी सांगितलं.
****
शिक्षण
संस्थांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या चार
वर्षात अनेक उपाययोजना केल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी
म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सरकार फक्त प्रयोगशाळांवरच
नाही, तर विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावरही लक्ष केंद्रीत करत
असल्याचं ते म्हणाले. संशोधन कार्यामध्ये नवीन कल्पनांच्या माध्यमातूनच देशाला समृद्धी
मिळेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
निवडणुकांचं
गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना
कोणत्याही निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नये, असं आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव
यांनी केलं आहे. मुंबईत आज राज्य निवडणूक आयोगातर्फे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’
या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निवडणुकीतल्या
गैरप्रकारांवर लक्ष ठेवणं हे निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान आहे, असं ते म्हणाले. शासकीय
कारभारात महिलांच्या वाढत्या सहभागाबाबत राज्यपालांनी समाधान व्यक्त केलं. दोन दिवस
चालणाऱ्या या परिषदेत लोकशाहीत सार्वजनिक मालकी, धनसत्तेचा गैरवापर, सोशल मिडिया आणि
खोट्या बातम्याचा धुमाकूळ या विषयावर चर्चा होणार आहे.
****
राज्यात
पाणी वाटपाबाबत राजकारण होऊ नये, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकारच्या जलसंवर्धनाच्या
कोणत्याही कामाला आपला विरोध नाही, मात्र प्रत्यक्षात काम झालेलं दिसत नाही, असं सांगून
त्यांनी सरकारवर टीका केली. संपूर्ण राज्यात दुष्काळ आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी
जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
राज्यात
आज सगळ्यात मोठं आव्हान दुष्काळाचं असून, मराठवाड्यात सध्या पाण्याची टंचाई असून पुढच्या
चार महिन्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते असं मत खासदार सुप्रिया सुळे
यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आज मराठा विकास मंडळाच्या वतीनं आयोजित चार दिवसीय
उद्योग महाएक्सपोचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे
उद्योग क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयांनी डोणगावकर,
माजी आमदार कल्याण काळे, राजेश टोपे यावेळी उपस्थित होते.
****
मराठवाड्यात
जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातल्या
शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. मुळा धरणाच्या जवळ आज माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या
नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केलं. एकीकडे नगर जिल्ह्यात दुष्काळ
असताना दुसऱ्या जिल्ह्याला पाणी देण्यास या शेतकऱ्यांनी विरोध केला. यावेळी मोठा पोलीस
बंदोबस्त धरणाच्या जवळ तैनात करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रं ऑनालाईन पध्दतीनं
सादर केल्यानंतर परीक्षा शुल्काचं एचडीएफसी बॅंकेचं चलनही ऑनलाईन तयार होणार आहे. हे
चलन विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करावयाचं असून, ते शिक्षण मंडळाकडे जमा करायचं आहे. परीक्षा
शुल्काच्या रक्कमेबाबत सुधारीत पध्दतीप्रमाणे कार्यवाही करण्याचं आवाहन महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव शरद खंडागळे यांनी केलं
आहे.
****
No comments:
Post a Comment