आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२२ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
अहमदनगर-पुणे
महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे साडे
पाच वाजेच्या सुमारास औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या आराम बसने, उभ्या असलेल्या ट्रकला
जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. पारनेर तालुक्यात वाडेगव्हाण फाटा इथं ही दुर्घटना
घडली.
अन्य एका
अपघातात, गुजरातहून औरंगाबादच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव कारनं चिरडल्यामुळे मॉर्निंग
वॉकला गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आज सकाळी पाचच्या सुमाराला दौलताबाद इथे
ही घटना घडली. यामध्ये कार पुढे जाऊन उलटल्यामुळे त्यातले प्रवासी जखमी झाले.
****
देशभरातल्या
प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास खाटांचं आयुर्वेदिक रुग्णालय उभारण्याचा निर्णय केंद्र
सरकारनं घेतला आहे. आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल नागपूरमध्ये एका कार्यक्रमात
बोलताना ही माहिती दिली. याशिवाय गावपातळीवरही आयुर्वेदिक दवाखाने उभारले जाणार असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
‘मागेल त्याला
शेततळे’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी
योजनेत बुलडाणा जिल्ह्यानं बाजी मारली आहे. जिल्ह्याला पाच हजार शेततळ्यांचं उद्दिष्ट
देण्यात आलं होतं. त्यापैकी चार हजार ८०० शेततळ्यांचं काम पूर्ण झालं असून, २०० शेततळ्यांचं
काम प्रगतीपथावर आहे.
****
जम्मूकाश्मीरमध्ये जम्मू जिल्ह्यात नियंत्रण रेषेलगतच्या
सुंदरबनी सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानी घुसखोरांना ठार केलं आहे. या चकमकीत
सैन्याच्या तीन जवानांना वीरमरण आल्याचं वृत्त आहे.
****
हंगेरीमध्ये बुडापेस्ट इथे सुरू असलेल्या जागतिक
कुस्ती स्पर्धेच्या पासष्ट किलो वजन गटात भारताच्या बजरंग पुनियानं अंतिम फेरीत प्रवेश
केला आहे. पुनियानं या आधी राष्ट्रकुल तसंच आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये अजिंक्यपद
पटकावलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment