आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२ ऑक्टोबर
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज एकशे एकोणपन्नासावी
जयंती. यानिमित्त देशभरात अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी
दिल्लीतल्या राजघाट इथं गांधीजींच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. संयुक्त
पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही महात्मा गांधीजींना अभिवादन केलं. गांधी
जयंती हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं अहिंसा दिवस म्हणून पाळण्यात येतो.
माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती गांधीजी आणि शास्त्रीजींना
अभिवादन केलं आहे. गांधीजींचा संदेश देशाला सदैव मार्गदर्शक राहील असं राष्ट्रपतींनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे. सत्य, अहिंसा आणि धार्मिक सहिष्णुता ही गांधीजींची शिकवण
भारतीय लोकशाही व्यवस्थेचं मूळ असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
शास्त्रीजींची निष्ठा, कठिण काळातलं नेतृत्व आणि
हरित क्रांती मध्ये त्यांची भुमिका देशासाठी प्रेरणा स्रोत असल्याचं सांगून राष्ट्रपतींनी
शास्त्रीजींना आदरांजली वाहिली आहे. शास्त्रीजींनी देशाला साहसी नेतृत्व दिल्याचं उपराष्ट्रपतींनी
म्हटलं आहे.
****
महात्मा गांधी यांनी दाखवून दिलेला मार्ग अनुसरणं
आणि त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेणं ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं प्रतिपादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं गांधी जयंती निमित्त
आयोजित पदयात्रेत बोलत होते. नागरिकांनी स्वच्छ भारत अभियान यशस्वी करावं कारण स्वच्छता
ही महात्मा गांधी यांना अतिशय प्रिय होती, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
आजचा दिवस ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणूनही पाळण्यात
येत आहे. यामध्ये प्रभात फेरी, विविध शाळा-महाविद्यालयांच्या वतीनं स्वच्छता रथ, तसंच
विविध पक्ष संघटनांच्या वतीनं स्वच्छतेसंबंधी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून
आज सकाळी स्वच्छता संदेश फेरीला सुरुवात झाली. विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, राषट्रीय
सेवा योजनेचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले आहेत. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी
नाटीका सादर करुन स्वच्छतेचा संदेश दिला.
*****
***
No comments:
Post a Comment