Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 03 October 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३
ऑक्टोबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§
नेतृत्व, सार्वजनिक निधी, लोकसहभाग आणि भागीदारी हा चतु:सूत्री
मंत्र आजच्या काळाची गरज - पंतप्रधानांचं प्रतिपादन.
§
राफेल
लढाऊ विमान खरेदी करारात सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा काँग्रेस अध्यक्षांचा पुनरुच्चार.
§
मुस्लिम
आणि बहुजनांनी एकत्र येण्याचं वंचित बहुजन आघाडीचं आवाहन.
आणि
§
राष्ट्रपिता
महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती काल सर्वत्र विविध
कार्यक्रमांनी साजरी.
****
नेतृत्व, सार्वजनिक निधी, लोकसहभाग आणि भागीदारी
हा चतु:सूत्री मंत्र आजच्या काळाची गरज असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित चार दिवसीय महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता
संमेलनाच्या समारोप समारंभात ते काल बोलत होते. स्वच्छता आणि पोषण यावर सरकारचा भर
असून स्वच्छ भारत अभियानामुळं लोकांच्या वागणुकीत बदल झाला असल्याचंही मोदी म्हणाले.
ग्रामीण स्वच्छतेचं प्रमाण गेल्या चार वर्षांत ३८ टक्क्यांवरुन ९४ टक्के झालं असून
पाच लाख खेडी उघड्यावर शौचापासून मुक्त झाली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
दहशतवाद हे जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे, असं
मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातल्या एमआयटी विश्व
शांती विद्यापीठाच्यावतीनं विश्व शांती सभागृह आणि विश्व शांती ग्रंथालयाचं उद्घाटन
काल उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांनी जगाला शांतता, अहिंसा आणि साधेपणाचा दिलेला विचार हा आजच्या काळातही उपयुक्त
असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते.
****
विद्यापीठांच्या पदवी प्रदान समारंभात ब्रिटीश पद्धतीच्या
पोशाखाऐवजी पारंपरिक पोशाख परिधान करावा, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश
जावडेकर यांनी म्हटलं आहे. विद्यापीठांसाठी एका दृकश्राव्य संदेशात जावडेकर यांनी,
मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नमुन्यांमधून किंवा विद्यार्थ्यांकडून
पर्याय मागवून असे पोशाख निवडावे, असं म्हटलं आहे.
****
राफेल लढाऊ विमान खरेदी करारात सरकारनं भ्रष्टाचार
केल्याचा पुनरुच्चार काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. वर्धा इथं
काल आयोजित काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी सेवाग्राम इथल्या जाहीर सभेत ते बोलत
होते. या करारावर पंतप्रधानांनी उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पंतप्रधानांनी
निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासनं दिली, शेतकरी कर्जमाफी केली नाही, शेतमालाला हमीभाव दिला
नाही, देशात बेरोजगारी वाढली अशी टीका त्यांनी केली. सरकार देशात जातीय आणि धार्मिक
तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही गांधी यांनी यावेळी केला.
****
भारतीय रिपब्लिकन पक्ष- बहुजन महासंघ आणि मजलिस ए
इत्तेहादुल मुसलमिन - एमआयएम या दोन राजकीय पक्षांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीनं
मुस्लिम आणि बहुजनांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
औरंगाबाद इथं काल झालेल्या आघाडीच्या पहिल्या सभेत
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरूद्ध जोरदार टीका
केली. यावेळी एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी, महाराष्ट्रात एमआयएम पक्ष
भारीप बहुजन महासंघाला पाठिंबा देईल, अशी घोषणा केली. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस
पक्षानं मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या हितासाठी कोणतंही कार्य केलं नाही, असा आरोप त्यांनी
यावेळी केला. भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी सरकारमधला भ्रष्टाचार, इंधन
दरवाढ, सामुहिक हत्यांचे प्रकार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजप सरकारवर कडाडून
टीका केली.
****
लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रस्तावित उपोषण राज्य सरकारच्या आश्वासनामुळे
स्थगित केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात राळेगणसिद्धी इथं अण्णांचं उपोषण काल गांधी जयंतीपासून
सुरु होणार होतं, मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल राळेगणसिद्धी इथं जाऊन
सरकारच्या वतीनं अण्णांशी चर्चा केली. त्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा
केली. काही मागण्यांवर सरकारनं सकारात्मक पावलं उचलली, तर काही मागण्या मान्य झाल्या,
काही आश्वासनं अद्याप कागदावरच आहेत, परंतु सरकारवर विश्वास ठेवावा लागेल, असं अण्णा
हजारे यावेळी म्हणाले.
****
नागपूर जिल्ह्यातल्या काटोलचे भारतीय जनता पक्षाचे
आमदार आशिष देशमुख यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवला
आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर नाराज होते.
राज्य सरकारच्या विरोधात त्यांनी नागपूरात ठिय्या आंदोलनही केलं होतं. ते काँग्रेसच्या
वाटेवर असल्याची चर्चाही बऱ्याच महिन्यांपासून सुरू आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल
बहादूर शास्त्री यांची जयंती काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. विधानभवनात
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुंबईत मणिभवन
इथं गांधी स्मारकाला भेट देऊन गांधीजींच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. स्वच्छ भारताचं
स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातल्या शासकीय, बिगर शासकीय, खाजगी संस्था तसंच शाळा,
महाविद्यालयं आणि विद्यापीठांनी हे अभियान नेटानं राबवावं, असं आवाहन राज्यपालांनी
केलं. राजभवनात आयोजित विचारसत्रात ते बोलत होते.
****
औरंगाबाद इथं विविध शैक्षणिक संस्थांनी एकत्र येत,
गांधीजींना अभिवादन करून शहरातून स्वच्छता संदेश फेरी काढली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह
ज्येष्ठ नागरिकही या संदेश फेरीत सहभागी झाले होते. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीनं
स्वच्छ औरंगाबाद स्वस्थ औरंगाबाद हा उपक्रम राबवण्यात येत आहे, या अंतर्गत स्वच्छता
जनजागृती आणि सर्वेक्षण अभियानाचं काल उद्घाटन करण्यात आलं.
शहरात शहागंज परिसरात गांधीजींच्या पुतळ्याला आदरांजली
वाहण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून गर्दी केली होती. आमदार सतीश चव्हाण यांच्यासह अनेक
मान्यवरांनी गांधीजींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
लातूर शहरात खासदार सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत
लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांनी स्वच्छता करुन महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली. यावेळी
गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं स्वच्छता ही सेवा
अभियानांतर्गत स्वच्छता दिंडी काढण्यात आली. हिंगोली शहरात भारतीय जनता पक्षातर्फे
स्वच्छता सेवा संवाद फेरी काढण्यात आली. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय
अधिकारी महेंद्र कांबळे यांनी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केलं.
औरंगाबाद जिल्हा पेन्शनर्स संघटनेच्या वतीनं काल
गांधी जयंतीनिमित्तानं आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात
आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते विजेत्या
स्पर्धकांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य
साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
औरंगाबाद शहर राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीनं शहागंज परिसरातल्या
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत धारण करून तसंच तोंडाला काळ्या पट्या लावून
आंदोलन करण्यात आलं.
हिंगोली शहरातही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी
तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून शासनाचा निषेध केला. लातूर इथं पक्षाचे शहराध्यक्ष मकरंद
सावे यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.
****
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट व्हावी यासाठी
ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं हाती घेण्यात आली
असल्याचं सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद
जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात विविध रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन काल पाटील यांच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातल्या जवळपास एक लाख किलोमीटर रस्त्यांची
कामं प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं.
जालना - अंबड - वडीगोद्री या राष्ट्रीय महामार्गाच्या
कामाचं भूमिपूजन काल अंबड इथं चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. ३७७ कोटी रुपये
खर्च करुन हा सिमेंट रस्ता करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सर्वसामान्य कुटुंबांचं घराचं स्वप्न साकारण्यासाठी
जालन्यात काही बांधकाम व्यावसायिक, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प उभारत
आहेत. जालन्यातल्या लहू गाढे यांचं घराचं स्वप्न या योजनेच्या माध्यमातून पूर्ण झालं
आहे़. त्यांनी याविषयी व्यक्त केलेल्या भावना आपण ऐकुयात….
मी लहू राम गाढे. राहणार जालना. मी दोन वर्षांपूर्वी इंथ 2 BHK फ्लॉट घेतला होता. त्यासाठी मी प्रधानमंत्री आवास
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर मला २ लाख ६७ हजार ३८० रूपये
यांचे अनुदान मिळाले आहे. यामुळे २४० महिन्यांचे गृहकर्ज
१०८ महिन्यांनी वर आलेले आहे. प्रधानमंत्री
आवास योजनेमुळेच, माझे घराचे स्वप्न पुर्ण झाले. त्यामुळे मी शासनाचा आभारी आहे.
****
तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवपूर्व
मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला. ही मंचकी निद्रा १० ऑक्टोबरपर्यंत चालणार असणार
असून १० ऑक्टोबरला पहाटे घटस्थापनेनं शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
******
***
No comments:
Post a Comment