Monday, 8 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.10.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 086 October 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



vकेंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर राज्यात दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त

vलातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शंभर कोटी रुपये निधीची घोषणा

vअकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभाग येत्या २० ऑक्टोबरपर्यंत चौथी प्रवेश फेरी राबवणार

आणि

vभारतीय युवा संघानं आशिया चषक पटकावला; युवा ऑलिंपिकमध्ये दोन रौप्य पदकांची कमाई 

****



 केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर राज्यात दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल लातूर इथं, अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत विविध आजारांवरच्या उपचारांसाठी राज्यातल्या ९० टक्के नागरिकांना आरोग्य कवच उपलब्ध झालं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. खासदार डॉ. सुनील गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यात यंदा कमी पाऊस झाल्यानं दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे, या परिस्थितीमध्ये शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.



 लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला येत्या तीन वर्षात टप्प्याटप्प्यानं शंभर कोटी रुपये, देण्यात येतील, तर सामान्य रुग्णालयासाठी महिनाभरात जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.



 दरम्यान, हे महाआरोग्य शिबीर आणखी आठ दिवस सुरु राहणार असून, लोकसहभागातून हे शिबीर यशस्वी करत असल्याचं, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. तर या शिबीरात रोग निदान होणाऱ्या गरजू रुग्णांवर लातूरसह पुणे, मुंबई, नांदेड या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती शिबिराचे सहसंयोजक आणि मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी दिली. सुमारे एक लाखांहून अधिक लोकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घेतल्याची माहिती,  शिबीराचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी दिली. 

****



 देशात वाढती धर्मांधता आणि जातीयवाद रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील असून, आता होऊ घातलेल्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं काल काँग्रेस पक्षाच्या संघर्ष यात्रेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गोर गरीबांचा कोणताही विचार केला नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

****



 अकरावी प्रवेशासाठी तिसऱ्या प्राधान्य फेरीनंतरही शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यामुळे प्रवेश प्रक्रिया समितीनं आता चौथी आणि शेवटची प्राधान्य फेरी जाहीर केली आहे. ही फेरी येत्या २० ऑक्टोबरपर्यंत चालणार असून त्यानंतर मात्र ही प्रक्रिया बंद केली जाईल, असं शिक्षण उपसंचालक कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. आत्तापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, महाविद्यालयांनी काही कारणांमुळे प्रवेश नाकारलेले विद्यार्थी, एटीकेटी, प्रवेश रद्द केलेले, तसंच नव्यानं नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या चौथ्या फेरीचा लाभ मिळणार आहे.

****



 राज्य सरकारने ग्रामीण भागातल्या गावकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या बांधकामांसाठी प्रचलित दरानं स्वामित्व-धन भरून पाच ब्रासपर्यंत वाळू उत्खननास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. लिलाव झालेल्या वाळू घाटांवरून हा वाळू उपसा करता येणार नाही. घर किंवा शेतातल्या विहीर बांधकामांसाठी ही वाळू वापरता येणार आहे. शासनाच्या गृहनिर्माण योजनेचा लाभ घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना यासाठी कोणतेही शुल्क किंवा स्वामित्व धन भरण्याची आवश्यकता नाही. वाळू उत्खननासाठी ग्रामस्थांनी अर्ज केल्यानंतर १५ दिवसात परवानगी देण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात आले आहेत, याबाबतचा शासन आदेश नुकताच जारी झाला आहे.

****



 सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी मतिमंद विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचेल, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. प्राथमिक शिक्षणात सू-सुत्रता येण्यासाठी सर्व शिक्षा अभियान योजना राबवली जाते. विकलांग व्यक्ती आयोगाच्या आयुक्तांनी न्यायालयाला सादर केलेल्या एका प्रतिज्ञापत्रात शासनाची ही योजना दिव्यांगांनाही लागू व्हावी, असं म्हटलं होतं. त्याची दखल घेत न्यायालयानं हे निर्देश दिले.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 भारतानं १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत आशिया चषक पटकावला आहे. ढाका इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेला १४४ धावांनी हरवत हा चषक जिंकला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत, तीन बाद ३०४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना, श्रीलंकेचा संघ १६० धावांतच गारद झाला. भारतातर्फे हर्ष त्यागीनं दहा षटकांत ३८ धावा देत सर्वाधिक सहा गडी बाद केले. भारतीय युवा संघानं सहाव्यांदा अशिया चषक पटकावला आहे.

****



 अर्जेंटिनात ब्युनास आयर्स इथं आयोजित युवा ऑलंपिक स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारतानं दोन रौप्य पदकं पटकावली. शाहू तुषार माने यानं दहा मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात आणि तबाबी देवी थंजम हीनं ज्युदोच्या ४४ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं.

****



 महाशिबीरांच्या माध्यमातून शासनाच्या विविध घटकांना एकत्र आणून त्याद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी असं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटलं आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या साक्षाळपिंप्री इथं आयोजित विधीसेवा मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. तळागळातील सामान्य माणसाला असलेला अधिकार आणि त्यांना सेवा मिळवून देणं ही विधी सेवा प्राधिकरणाची मूळ संकल्पना असल्याचं न्यायमूर्ती ओक यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.एम.बोर्डेही यावेळी उपस्थित होते.

****



 बालविवाह रोखण्यासंबंधी अनेक शिफारसी येत असून, शासन स्तरावर याविषयी ठोस पावलं उचलली जातील, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. राज्य महिला आयोग आणि पुष्कराज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे काल औरंगाबाद इथं, आयोजित ‘लिंगभाव - जाणीवजागृती आणि महिला बाल अत्याचार प्रतिबंधक कायदे’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत रहाटकरांनी मार्गदर्शन केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या.



 महिला आणि बाल संरक्षणासाठीच्या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र, तसंच राज्य शासन विशेष प्रयत्न करत असल्याचं त्या म्हणाल्या. स्त्रीभ्रूण हत्या, तसंच लैंगिक अत्याचार प्रतिबंधासाठी जनजागृतीसह विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 सुरक्षित वाहतुकीचे नियम डावलणाऱ्या शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय लातूरचे पोलिस अधीक्षक डॉ.राजेंद्र माने यांनी घेतला आहे. याशिवाय, सर्व शाळांनी शालेय परिवहन समिती स्थापन कराव्यात, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं संयुक्त मोहिम राबवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. औसा तालुक्यात एका शालेय विद्यार्थिनीवर बस चालक आणि मदतनिसानं अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आल्यानं हा निर्णय घेण्यात आला.

****



 हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या बागलपार्डी इथल्या भाविकांच्या गाडीला उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद इथं अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. काल पहाटे हा अपघात झाला. जखमींवर अलाहाबाद इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

****



 नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या झरी इथं शाश्वत स्वच्छतेसाठी आजपासून दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात उघड्यावर शौचमुक्त गाव संकल्पनेसह विविध विषयांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

****



 मुदखेद-नांदेड-परभणी रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचं काम सुरु असल्यानं परवा दहा ऑक्टोबरपासून सतरा ऑक्टोबरपर्यंत, आठ दिवस मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या अंशत: तर काही पूर्णत: रद्द करण्यात आल्या आहेत. काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात काही बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं

****



 औरंगाबादनजीक पडेगाव पथकर नाक्याजवळ कार आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात एका पोलिस हवालदाराचा मृत्यू झाला. काल सकाळी ही दुर्घटना घडली. देवीचंद कुऱ्हाडे असं मृत हवालदाराचं नाव आहे.

*****

***

No comments: