Tuesday, 9 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.10.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09  October 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



vव्याजाची हमी शासनानं घेतल्यानंतरही कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरूद्ध कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

vयंदाचा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' चित्रपट- नाट्य दिग्दर्शक, चंद्रकांत कुलकर्णी यांना जाहीर

vकपात करूनही भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगारांच्या खात्यात न भरणाऱ्या औरंगाबादचा दोन कंपन्यांविरूद्ध गुन्हा दाखल

आणि

vप्लास्टिक वस्तुंचं उत्पादन करणाऱ्या औरंगाबाद पॉलिकंटेनरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं लावलं सील

****



 शासनान कर्जावरच्या व्याजाची हमी घेऊनही ज्या बँका लाभार्थ्याना कर्ज द्यायला टाळाटाळ करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव इथं आढावा बैठकीकाल ते बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते.

     

 महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पीक पेऱ्यांची पाहणी करुन वस्तुस्थितीची सात बारावर नोंद घ्यावी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत मोठ्या प्रमाणावर गाव समाविष्ट असतील तर त्या योजना सौ उर्जेवर करायला प्राधान्य द्यावं, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.



 तीस कोटी रुपये खर्च करुन जळगाव शहरात बांधण्यात आलेल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिराचं लोकार्पणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.

****



 प्रधानमंत्री आवास, अस्मिता,  आणि अतिक्रमण नियमानुकूल करण्यात येणाऱ्या योजनांचे उद्दिष्ट तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. काल मुंबईत त्यांनी या योजनांचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. राज्यात अस्मिता योजनांची कामं प्रगतीपथावर आहेत असं सांगून प्रधानमंत्री आवास योजनेतल्या अडीच लाख घरांचा गृहप्रवेश कार्यक्रम येत्या १९ ऑक्टोबर रोजी प्रतपंधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी इथं होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 नागपूर जिल्ह्यातले काटोलचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी स्वीकारला आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात देशमुख यांचं सदस्यत्व ६ ऑक्टोबरपासून संपुष्टात आलं असल्याचं म्हटलं आहे. स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते असलेले देशमुख भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून नाराज होते.

****



 यंदाचा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' चित्रपट- नाट्य दिग्दर्शक, रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी यांना घोषित झाला आहे. औरंगाबाद इथं येत्या २८ तारखेला विशेष समारंभामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. रोख ५० हजार रूपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****



 पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे देण्यात येणारा, उत्कृष्ट मराठी बाल कुमार वाङ्मय निर्मिती क्षेत्रातल्या विज्ञान विषयक उत्कृष्ट बाल साहित्यासाठीचा २०१७-१८ या वर्षासाठीचा श्री. बा. रानडे पुरस्कार, नांदेडचे ज्येष्ठ बाल कवी माधव चुकेवाड यांना जाहीर झाला आहे. चुकेवाड यांना ‘ज्ञान-विज्ञान‘ या बाल कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचं वितरण येत्या अकरा तारखेला पुण्यात होणार आहे.

****



 नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शक्तीपीठांना आणि प्रेरणा केंद्रांना अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाची ‘जागर आदिशक्तीचा, सन्मान नारीशक्तीचा' ही बावीसशे किलोमीटरची यात्रा उद्यापासून नाशिक इथून सुरू होत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत सुरू होणारी ही यात्रा नाशिक, अहमदनगर, बुलढाणा, परभणी, नांदेड जिल्ह्यातलं माहूर, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि सातारा असं मार्गक्रमण करणार  आहे. या यात्रेदरम्यान शेतकरी महिला संमेलन, महिला लोकप्रतिनिधी संमेलन, सैनिकांच्या विधवांचा सत्कार आणि विद्यार्थिनींचा मेळावा तसंच विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 कामगारांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची कपात करूनही ती भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा न करणाऱ्या औरंगाबाद - वाळूज औद्योगिक परिसरातल्या दोन कंपन्यांविरूद्ध काल वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धी इंजिनिअरिंग आणि नारगोलकर प्रेस कॅम्पस अशी या दोन  कंपन्यांची नावे आहेत. या दोन्ही कंपन्यांमध्यल्या एकूण ५९ कामगारांच्या वेतनातून कपात केलेले २७ लाख ५६ हजार ४५२ रूपये, कंपनीच्या व्यवस्थापनानं भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा केले नसल्याचं आढळून आल्यामुळे या कंपन्यांविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.



 दरम्यान, प्लास्टिक वस्तुंचं उत्पादन करणाऱ्या औरंगाबाद पॉलिकंटेनर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून ६० टन प्लास्टिक जप्त करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महसूल पथकानं काल टाळं ठोकलं. बंदीनंतरही कंपनीमध्ये प्लॉस्टिकपासून उत्पादन निर्मिती सुरू असल्याचं आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

****



 परभणी जिल्ह्यात आतापर्यंत अत्यंत कमी पाऊस झाला असल्यामुळे पिकं वाया जात असून भीषण पाणीटंचाई जाणवत असल्यानं  जिल्ह्यात दुष्क़ाळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार मोहन फड आणि भाजप जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

****



 परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या  शेतकरी आणि नागरिकांची कर्ज प्रकरणं येत्या आठ दिवसात निकाली काढावीत, अशा सूचना आमदार विजय भांबळे यांनी काल दिल्या. यासंदर्भात जिंतूरच्या तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

****



 हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या हट्टा इथं  महापुरुषाच्या  पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ काल सकाळी हिंगोली-परभणी राष्ट्रीय महामार्गावर  रस्तारोको आंदोलन करण्यात आलं. सकाळी  १० वाजल्यापासून  दिड तास हे आंदोलन सुरू होतं. आंदोलनादरम्यान, टायर जाळण्यात आली. यामुळे या महामार्गावरची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

****



 बीड इथल्या जिल्हा उद्योग केंद्रात बीज भांडवल योजनेच्या प्रस्तावाला मंजूरी देऊन बँकेला शिफारस करण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच स्वीकारतांना उद्योग निरीक्षकास काल बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं. शरद राठोड असं या उद्योग निरीक्षकाचं नाव आहे.



 औरंगाबाद इथल्या महावितरण कार्यालयातला लिपिक शंकर आलेवाड यालाही नवीन विद्युत ठेकेदारास कामाचा प्रस्ताव मंजूर करून घेऊन ऑर्डर देण्यासाठी बावीशे रूपयांची लाच घेतांना काल दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. 

****



 केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुद्रा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाला चालना मिळत आहे. या योजनेमुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी होण्यास मदत होत आहे. नवी मुंबई इथल्या नेरूळच्या फुलन शिंदे यांनी आपल्याला या योजनेचा चांगला फायदा झाल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या …..

मुद्राच्या माध्यमातून मी ब्युटीपार्लर चालू केलं आणि त्याचा मला खूप फायदा झाला. आणि ते लोन मी माझ्या बिझनेसमधूनचं एक वर्षापर्यंतचं मी ते फेडू शकले. कारण गोव्हरमेंन्टनी चालू केलेली आहे ही मुद्रा योजना. हि खरंच गरजू पर्यंत पोचतेय. आणि या माध्यमातून बिजनेस वाढिला लागल्यामुळे मुद्राची जे चालू केलेली योजना आहे. त्यामाध्यमातंन आज आपण पाहतो की, आपल्याला रोज नोकऱ्या नाहिये. परंतू ह्या योजनेमधून बऱ्याश्या गरजू महिला किंवा उद्योजक यांना याचा चांगला फायदा होत आहे.

****



 बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव घाट इथं महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात येत्या १८ तारखेला दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या संयोजन समितीचे सदस्य डॉ.भागवत कराड यांनी आज औरंगाबाद इथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याठिकाणी संत भगवान बाबा यांचं स्मारक उभारण्यात आलं असून या मेळाव्यात, या स्मारकाचं लोकार्पण होणार असल्याचं कराड यांनी सांगितलं.

****



 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या संबिधान बचाव-देश बचाव या अभियानांतर्गत आज औरंगाबाद इथं संविधान बचाव मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असून शहरातल्या जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहात सकाळी साडेअकरा वाजता मेळाव्याला सुरूवात होणार आहे.

****



 आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी करणारं एक निवेदन काल शिवसेनेच्यावतीनं औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना देण्यात आलं. यावेळी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

****



 दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेत नांदेड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या योजने अंतर्गत राज्य शासनानं नांदेड जिल्ह्यास विविध प्रशिक्षणासाठी ८६३ लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच उद्दिष्ट दिलं होतं. त्यापैकी ७५६ लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असल्याचं जिल्हा परीषदेच्यावतीनं सांगण्यात आलं.

******

***

No comments: