Monday, 15 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.10.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15  October 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



§  नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणीविसर्गाचे जलसंपदा मंत्र्यांचे संकेत

§  प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टीने तपासून पाहण्याचं प्रसिध्द अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचं आवाहन

§  प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु राहणार

आणि

§  वेस्ट इंडीज विरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका भारतानं दोन शून्यनं जिंकली; पृथ्वी शॉ मालिकावीर

****



 मराठवाड्यात परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं, नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडावं लागेल, अशी शक्यता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. आज १५ ऑक्टोबरनंतर पाण्याच्या शिल्लक साठ्याचा आढावा घेऊन नियमानुसार पाणी सोडलं जाईल, असं ते म्हणाले. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे या भागाचा विचार करून, योग्य तो निर्णय घेतला जाईल असं, महाजन यांनी नमूद केलं.

****



 मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नियुक्त समितीचा अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त होणार असून, त्यानंतर आरक्षण देण्यासंदर्भात विधी मंडळात कायदा केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते नाशिक इथं काल बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत, याची राज्य सरकार खबरदारी घेत असल्याचं ते म्हणाले. मराठा समाजातल्या युवक युवतींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जात असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****



 केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांच्यावर होत असलेले लैंगिक शोषणाचे आरोप बिनबुडाचे असून ते राजकीय हेतूने जाणीवपूर्वक केले जात असल्याचं म्हटलं आहे. असे आरोप करणाऱ्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करणार असून, माध्यमांतल्या बातम्यांच्या आधारावर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****



 लोकसभेची आगामी निवडणूक आपण दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लढवणार असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल जाहीर केलं. पुण्यात वार्ताहरांशी बोलतांना आठवले यांनी दक्षिण मध्य मुंबई आणि साताऱ्याची जागा रिपाइंसाठी सोडण्याची मागणी केली आहे.

****



 प्रत्येकाने नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवून विज्ञानन्निष्ठ होत, वैज्ञानिक दृष्टीने सर्व गोष्टी तपासून पहाव्या, असं आवाहन प्रसिध्द अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर केलं आहे. काल सातारा इथं, सातारा नगरपालिकेचा 'डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्कार' डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते काकोडकर यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक लाख रुपये, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि सातारी कंदी पेढे असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****



 माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती, हा दिवस सर्वत्र वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगानं आज सर्वत्र, विशेषत: शैक्षणिक संस्थांमध्ये वाचन उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेद्वारे प्रत्येक पात्र शेतकऱ्यास लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु राहणार असून, पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शासन खबरदारी घेत असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. सरकारनं शेतमालासाठी निर्धारित केलेला हमीभाव, बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना द्यायला हवा असं त्यांनी नमूद केलं. देशमुख यांनी काल परांडा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. खासगाव इथं पीक पाहणी करुन देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

****



 सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातल्या पिकांच्या पाहणीनंतर बोलत होते. पाणी टंचाई तसंच जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत असून, सिंचन तसंच पाणी पुरवठ्यासाठी गावनिहाय अहवाल तयार करुन मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यानचा हैदराबाद इथला दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं दहा गडी राखून जिंकत मालिका दोन - शून्यनं जिंकली आहे. दुसऱ्या कसोटीत भारतानं पहिल्या डावात तीनशे सदुसष्ठ धावा करत, ५६ धावांची आघाडी घेतली होती. वेस्ट इंडीज संघाचा दुसरा डाव अवघ्या १२७ धावांतच संपुष्टात आला. भारताना दुसऱ्या डावात सामना जिंकण्यासाठी असलेलं अवघं ७२ धावांचं लक्ष्य सतराव्या षटकातच पूर्ण केलं. उमेश यादवनं चार, रविंद्र जडेजानं तीन, रविचंद्रन अश्विननं दोन, तर कुलदीप यादवनं एक गडी बाद केला. सामन्यात दोन्ही डावांत एकूण दहा बळी घेणारा उमेश यादव सामनावीर, तर पदार्पणातच शतक झळकावणारा पृथ्वी शॉ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****



 नेदरलँड्स इथं झालेल्या डच खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या सौरभ वर्मानं पटकावलं आहे. अंतिम फेरीत त्यानं, मलेशियाच्या जून वेई चिम याला २१-१९, २१-१३ असं दोन सरळ गेम्समध्ये हरवलं. सौरभचं हे सहावं आंतरराष्ट्रीय विजेतेपद असून चालू हंगामातलं दुसरं विजेतेपद आहे. यावर्षी त्यानं रशियन खुली बॅडमिंटन स्पर्धाही जिंकली आहे.

****



 गोंदिया जिल्ह्यात केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत ५९ हजार ९४३ गृहिणींना गॅस जोडणी मिळाली आहे. यामुळे या चुलीवर स्वयंपाक, तसंच जळणासाठी सरपण गोळा करणं आणि त्यामुळे होणाऱ्या धुराच्या त्रासापासून सुटका झाल्याचं गोंदियाच्या रहिवाशी किरण उके या महिलेनं सांगितलं. त्या म्हणाल्या...



आधी माझ्या घरी मातीची चुल होते. मातीच्या चुलामुळे मला खूप त्रास होत होता. वेळेवर काड्या मिळत नवत्या. वेळेवर कामही होत नव्हते. उज्ज्वला गॅस मिळल्यामुळे माझे वेळेवर कामही होत आहे. आणि कामाची  बचतही होत आहे. मला बाहेर काढा काढायला जायला नाही  लागे. आणि रॉकेल साठी रागेत राहावे नाही लागे. आणि वेळेची बचतही होत. आणि मला वेळेवर कॉलेजलाही जायला मिळते. त्यामुळे उज्ज्वला योजनेचा लाभ घेतला. आणि इतर लोकांनाही उज्ज्वला योजनेचा लाभ घ्या.

****



 शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबरोबरच महाआरोग्य शिबिरातून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या जवरला इथं आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन डोंगरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामस्थांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****



 आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार अपेक्षित असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही रुग्णालयांनी, रुग्णांकडून पैसे घेतल्याचं निदर्शनास आलं, त्यामुळे या  रुग्णालयांची या योजनेतली नोंदणी शासनानं रद्द केली आहे. जिल्ह्यातल्या एकूण ३४ रुग्णालयांवर दिल्ली आणि मुंबईच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. जिल्ह्यातली बहुतांश रुग्णालयं वेगवेगळी कारणं दाखवून रुग्णांकडून पैशांची लूट करत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे आल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

****



 परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात, तसंच जिंतूर तालुक्यातल्या कौसडी इथं काल रोगनिदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी मोफत औषधांचं वाटपही करण्यात आलं. जिल्ह्यातला कोणताही रुग्ण उपचाराअभावी वंचित राहू नये, असं आवाहन आमदार विजय भांबळे यांनी यावेळी केलं.

****



 औरंगाबाद इथं, चिकलठाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात काल चार चित्रकला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर भित्तीपत्रक प्रदर्शन भरवलं होतं. यामध्ये ८० चित्रांचा समावेश होता. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि प्रेरणा प्रकल्पात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आलं. 

****



 सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं काल महात्मा गांधी स्वच्छता संवाद सेवा पदयात्रा काढण्यात आली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या यात्रेला सुरुवात केली. या पदयात्रेच्या माध्यमातून चांगल्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जनतेला आपण देत आहोत, असं सांगून खोत यांनी, संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार पुढे जायचं असल्याचं नमूद केलं.

****



 अहमदनगर सोलापूर रस्त्यावर काल ट्रक आणि आराम बस च्या अपघातात एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले. या अपघातामुळे दोन्ही बाजूनी सहा ते आठ किलोमीटर अंतरापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती.

*****

***

No comments: