Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 15 October 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
१५ ऑक्टोबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या औचित्यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
आज त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कलाम यांना अभिवादन केलं.
थोर शिक्षक, महान शास्त्रज्ञ आणि उत्कृष्ट राष्ट्रपती राहिलेले डॉक्टर कलाम यांचं,
प्रत्येक भारतीयाच्या मनात अढळ स्थान राहील, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी नागपूर इथं, डॉ कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.
****
देशात होणाऱ्या आगामी
विधानसभा निवडणुकी दरम्यान सी व्हिजिल या मोबाईल ॲपचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्याचा
निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. निवडणूक काळातल्या गैरप्रकारांचं चित्रण करून किंवा
छायाचित्र काढून, नागरिक या ॲपवर अपलोड करू शकतील किंवा त्याबद्दलची माहिती निवडणूक
अधिकाऱ्यांना या ॲपच्या माध्यमातून कळवू शकतील.
****
पश्चिम बंगाल आणि
आसाममध्ये आज दुर्गापूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. कोलकता आणि गौहत्ती यासह
या राज्यांतल्या बहुतेक सगळ्या शहरांमध्ये मोठे मंडप उभारून दुर्गापूजा केली जाते.
विजया दशमी अर्थात
दसरा येत्या गुरुवारी साजरा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यंदाचा दसरा
राजस्थानमधल्या बिकानेर इथे, सीमा सुरक्षा दलासोबत साजरा करणार आहेत. अशा संवेदनशील
भागात दसरा साजरा करणारे सिंह हे पहिले गृहमंत्री असल्याचं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाचे
नेते आणि उद्योजक नवीन जिंदाल यांना दिल्लीच्या एका न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.
कोळसा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणातल्या मनी लाँड्रिंगच्या आरोपासाठी हा जामीन देण्यात
आला आहे. जिंदाल यांच्यासोबतच या प्रकरणातल्या अन्य चौदा आरोपींनाही न्यायालयानं जामीन
दिला आहे.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना
दिवसाही वीज पुरवण्यासाठीची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि विद्युत भारीत वाहनांसाठी
महावितरणनं उभारलेली चार्जिंग स्टेशन्स, यांचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते उद्घाटन होणार आहे. शेतकऱ्यांना पुरेशा दाबानं विद्युत पुरवठा करण्यासाठीच्या
एचव्हीडीएस अर्थात उच्चदाब वितरण प्रणाली, या योजनेचंही यावेळी उद्घाटन होणार आहे.
या योजनांचा राज्यातल्या सवादोन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तर, विद्युत भारीत
वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या केंद्र आणि राज्यशासनाच्या धोरणानुसार, महावितरणतर्फे
राज्यात पाचशे चार्जिंग स्टेशन्स
उभारण्यात येणार असून, त्यापैकी पन्नास स्टेशन्सचं काम सुरू झालं
आहे.
****
येत्या चार वर्षात
राज्यात नवीन दोनशे सोळा सिंचन योजना पूर्ण होणार असून, त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत
तीन हजार दशलक्ष घनमीटरनं वाढ होईल, असा विश्वास राज्याच्या जलसंपदा विभागानं वर्तवला
आहे. २०१४ पर्यंतच्या सिंचन क्षमतेच्या तुलनेत २०१६-१७ या वर्षात राज्याची सिंचन क्षमता
पंचवीस टक्क्यांनी वाढून ती एक्केचाळीस लाख हेक्टरपर्यंत पोचल्याचंही या विभागानं म्हटलं
आहे. धरणांलगतच्या जमिनीचा वापर करून, २०२२ पर्यंत सुमारे सहाशे मेगावॅट सौर ऊर्जा
निर्मिती करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती, जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव इक्बाल
सिंह चहल यांनी दिली.
****
नागपूरच्या दीक्षाभूमी
इथे आजपासून बासष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन समारंभाची सुरुवात होत आहे. या समारंभाचं
आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनं केलं आहे. चार दिवस चालणाऱ्या या समारंभाच्या
सुरुवातीला आज महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून, चर्चासत्रं, बौद्ध भिक्खू धम्म
परिषद, सांस्कृतिक कार्यक्रम यासह विविध अन्य कार्यक्रम या समारंभात होणार आहेत.
****
परभणीचे माजी खासदार
गणेश दूधगावकर यांना परभणी पोलिसांनी अटक केली आहे. तत्कालीन तलाठी डी एस कदम यांच्याशी
संगनमत करून, दूधगावकर यांनी, ज्ञानोपासक गृहनिर्माण संस्थेची जागा बळकावल्याचा आरोप
त्यांच्यावर करण्यात आला होता, यासंदर्भात दाखल तक्रारीनंतर नानलपेठ पोलिसांनी दूधगावकर
यांच्यासह निवृत्त तलाठी डी एस कदम यानाही अटक केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
युवा ऑलिंपिक क्रीडा
स्पर्धांच्या हॉकी क्रीडाप्रकारात भारताच्या महिला आणि पुरुष संघांना रौप्यपदकावर समाधान
मानावं लागलं. ब्यूनोस आयर्स इथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुषांचा
संघ काल मलेशियाकडून तर महिलांचा संघ यजमान अर्जेंटिनाकडून पराभूत झाला.
*****
***
No comments:
Post a Comment