Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 16 October 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
§
प्रधानमंत्री
आवास योजनेच्या अडीच लाख घरकुलांचा गुरुवारी शिर्डी इथं पंतप्रधानांच्या
उपस्थितीत ई - गृहप्रवेश
§
पीओएस
यंत्रामुळे स्वस्त धान्य दुकानांमधून होणाऱ्या घोटाळ्यावर नियंत्रण - अन्न आणि नागरी
पुरवठा मंत्री गिरीश बापट
§
वाचन
प्रेरणा दिन काल राज्यभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा
आणि
§
गृहनिर्माण
संस्थेची जागा बळकावल्याच्या आरोपावरून परभणीचे माजी खासदार गणेश दूधगावकर यांना अटक
****
प्रधानमंत्री आवास योजनेच्या दोन लाख ५० हजार
घरकुलांचा ई - गृहप्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या
गुरूवारी अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं होणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. या योजनेच्या लाभार्थींशी, पंतप्रधान व्हिडीओ
कॉन्फरन्सिंग दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधणार असल्याचं मुंडे यांनी
सांगितलं.
२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरं धोरणाअंतर्गत
राज्यात १० लाख ५१ हजार पात्र लाभार्थींना हक्काची पक्की घरं सरकार देणार आहे.
यापैकी दोन लाख ५० हजार घरकुलांचं काम पूर्ण झालं असून, त्यासाठी तीन हजार ४७२
कोटी रूपये निधी खर्च झाल्याची माहिती
ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी दिली.
****
बुलडाणा
जिल्ह्यातल्या जिगांव सिंचन प्रकल्पासाठी एक हजार पाचशे कोटी रूपये देण्यात येतील
तसंच जिल्ह्यात आणखी दोन हजार शेततळ्यांची निर्मिती केली जाईल,
असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातली पीक-
पाणी परिस्थिती, शासनाच्या प्राधान्यक्रम योजनांची अंमलबजावणी, कायदा
आणि सुव्यवस्था या बाबींचा मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत
होते.
जिल्ह्यात बीज उत्पादन कार्यक्रमासाठी २०० शेडनेट उभारण्यास मान्यता
देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी, खडकपूर्णा प्रकल्पासह
अन्य प्रकल्पांत उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेशही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जालना-खामगाव
रेल्वे मार्गाला केंद्र सरकार अनुकूल असून यासाठीच्या खर्चातला पन्नास टक्के वाटा राज्य
सरकार उचलणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
पॉईंट ऑफ सेल - पीओएस यंत्रामुळे स्वस्त धान्य दुकानांमधून
होणाऱ्या घोटाळ्यावर नियंत्रण आल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी
म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. या यंत्रामुळे राज्यात जवळपास
अकरा लाख बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले
…..
राज्यात पॉस मशिन
द्वारे अन्नधान्याचं वितरण हि वेवस्था चालू आहे. जवळ-जवळ ७०-७२ तूर कमी-अधिक टक्केवारी
दर महिन्याला होत राहते. पण त्याचा चांगला फायदा आपल्याला झालायं. मागच्या एका रिव्हीव
मध्ये १० ते ११ लाख रेशन कार्ड आपण रद्द केली. आता सेकंन्ड रिव्हीव जेव्हा होईल. कारण,
मी काही वेळेला एखाद्या कुंटूंबानी एक महिना, दोन महिना, तिन महिने, चार महिने रेशन
नेलं नाही तर मग आम्ही ते रेशन कार्ड रद्द करतो. कारण बऱ्याच जणाचे डूब्लीकेट असतात.
आणि आता हे सर्व पॉस मशिन द्वारे आम्हाला पकडता येतं. साधारण पणे पहिल्या राऊंड मध्ये ३ लाख ८० हजार ५६० मेट्रीक टन येवढी
धान्याची बचत झाली. म्हणजे उचलच कमी व्हायला लागली. कारण अंत दिल्याशिवाय उचलच नाही.
****
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल जालना जिल्ह्यात
जालना आणि अंबड तालुक्यातल्या आंतरवाला, गोलापांगरी, शेवगा आणि लालवाडी या गावांना
भेटी देऊन पिकांची पाहणी करून दुष्काळसदृष्य स्थितीचा आढावा घेतला.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद जिल्ह्यातल्या
वैजापूर तालुक्यातल्या हडसपिंपळगाव, शिवराई आणि तिढी गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची
पाहणी केली. वैजापूर इथं त्यांनी तालुक्यातल्या स्थितीचा आढावा घेतला.
पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल उस्मानाबाद
जिल्ह्यात उस्मानाबादसह कळंब, उमरगा आणि वाशी तालुक्यातल्या गावांना भेटी देऊन पिकस्थितीचा
आढावा घेतला. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि
अन्य पदाधिकाऱ्यांनी, गतवर्षीच्या पिकांच्या नुकसानीपोटी त्वरीत नुकसानभरपाई देण्याची
मागणी केली.
****
राज्यात काल वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या औचित्यानं
हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त मुंबईत मंत्रालयात मराठी भाषा मंत्री विनोद तावडे
यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वाचन तास’ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तावडे यांच्या
हस्ते मुंबईतल्या गिरगाव आणि मरिन लाईन्स इथल्या वाहतूक पोलिसांना पुस्तकांचं वाटप
या निमित्तानं करण्यात आलं.
मुंबई पुणे ‘डेक्कन क्वीन’ आणि मुंबई मनमाड ‘पंचवटी
एक्सप्रेस’ या दोन गाड्यांमध्ये काल तावडे यांच्या हस्ते फिरत्या वाचनालयाचा शुभारंभ
झाला. या गाड्यांमधल्या मासिक पासधारकांना ही सेवा नि:शुल्क उपलब्ध होणार आहे.
मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्येही विविध उपक्रम
राबवत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. शैक्षणिक संस्थांमधून वाचन तासासह इतर उपक्रम राबवण्यात आले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
परभणीचे माजी खासदार गणेश दूधगावकर यांना परभणी पोलिसांनी
काल अटक केली. तत्कालीन तलाठी डी एस कदम यांच्याशी संगनमत करून, दूधगावकर यांनी, ज्ञानोपासक
गृहनिर्माण संस्थेची जागा बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता, यासंदर्भात
दाखल तक्रारीनंतर नानलपेठ पोलिसांनी दूधगावकर यांच्यासह निवृत्त तलाठी डी एस कदम यांनाही
अटक केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दूधगावकर यांना काल न्यायालयात हजर करण्यात
आलं, न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
वीज भारनियमनाच्या विरोधात काल बीड जिल्ह्यात परळी
इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला. वीज भारनियमन
रद्द करण्याच्या घोषणा यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिल्या.
****
प्रधानमंत्री सुरक्षित मातृवंदन योजना कोल्हापूर
जिल्ह्यात यशस्वीपणे राबवली जात आहे. या योजनेमुळे गर्भवतींना सकस आहारासाठी आर्थिक
मदत मिळत असल्याचं बामणी इथल्या प्राजक्ता मुगधो यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या.
मला पंतप्रधान
सुरक्षित मातृव योजनेच्या अंतर्गत लाभ. आमच्या
आशाताई उज्ज्वला पाटील मिळवून देण्यासाठी यांनी कागद पत्रांच्या पूर्ततेसाठी खूप मदत
केली. व त्या लाभामुळे मला स्वतः साठी सकस आहार व गरोदरपणासाठी आर्थिक मदत झाली. त्यासाठी
मी त्यांची पूर्णपणे आभारी आहे.
या योजनेच्या प्रसाराविषयी माहिती देतांना आशा कार्यकर्त्या
उज्ज्वला पाटील म्हणाल्या -
आम्ही एन.आर.एचच्या
माध्यमातून जास्तीत-जास्त शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी गावातील लोकांना प्रयत्नशील
राहतो. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना. या योजनेचा भागातील
लाभार्थी परियंन्त प्रसार करून त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत.
****
लातूर जिल्हा परिषदेच्यावतीनं देण्यात येणारा राज्यस्तरीय
देवीसिंह चौहान स्मृती पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक
प्रा. डॉ. नागोराव कुंभार यांना जाहीर झाला आहे. लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र
तिरुके यांनी ही माहिती दिली. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार
देण्यात येतो. पुरस्काराचं हे दुसरं वर्ष आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि ग्रामपंचायतीमध्ये काल जागतिक हात धुवा दिवस साजरा
करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या प्रात्यक्षिकासह स्वच्छतेचे
महत्व पटवून देण्यात आलं. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.
****
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं सुरू
असलेली ‘जागर आदिशक्तीचा, सन्मान नेतृत्वाचा’ ही नवरात्रोत्सव यात्रा काल उस्मानाबाद
इथं पोहचली होती. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या महिला सरपंच, नगरसेविका आणि सामाजिक
कार्यकर्त्या, यांचा महिला मोर्चाच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
****
नाशिक जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांमध्ये पाऊस न झाल्यानं
उद्भवलेल्या स्थितीचा, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल आढावा घेतला. महाजन
यांनी देवळा, मालेगाव, नांदगाव आणि बागलाणला भेट दिली. बागलाण इथं पालकमंत्र्यांना
काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, त्याबद्दल पंधरा कार्यकर्त्यां विराधात
गुन्हा दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर इथल्या राजर्षी शाहू महाविद्यालयात आज, ‘उच्च
शिक्षणातील नवे पैलू’ या विषयावर एका राष्ट्रीय खुल्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात
आलं आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सहयोगानं आयोजित
या चर्चासत्राचं उद्घाटन राज्यपाल सी.विद्यासागर राव, यांच्या हस्ते होणार असून, विविध
विद्यापीठांचे विद्यमान तसंच माजी कुलगुरू या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment