Tuesday, 16 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.10.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16  October 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ ऑक्टोबर  २०१ दुपारी १.०० वा.

****



 भ्रष्टाचाराची माहिती देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही, असं वातावरण देशात निर्माण झालं पाहिजे, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ - ॲसोचॅमच्या ९८व्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. संस्था आणि नागरिकांनी भ्रष्टाचार, लाचखोरी आणि फसवणूक सहन न करता नैतिकतेला चालना दिली पाहिजे, असं ते म्हणाले. कर भरणं हा प्रत्येक कंपनीचा सिद्धांत असला पाहिजे आणि ॲसोचॅम सारख्या महासंघांनी यासाठी आपल्या सदस्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं उपराष्ट्रपती म्हणाले. अर्थमंत्री अरुण जेटली दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते. सरकारनं व्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी विमुद्रीकरण, जीएसटी यासारख्या उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं. 

****



 छत्‍तीसगढ, मध्‍यप्रदेश आणि मिझोराम या राज्यमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांकरता राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसाठी दूरचित्रवाणी आणि नभोवाणी प्रसारणाचा कालावधी निवडणूक आयोगानं निश्चित केला आहे. प्रत्येक राष्ट्रीय आणि मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांना ४५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल, असं याबाबत आयोगानं काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. या आदेशाप्रमाणे दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रादेशिक आणि तीनही राज्यांमधल्या मुख्य केंद्रांतून प्रसारणाची सोय उपलब्ध असेल. या राज्यांमधल्या विविध स्थानिक केंद्रांवरूनही हे प्रसारण केलं जाईल. प्रसारणाचा कोणताही एक टप्पा १५ मिनिटांपेक्षा अधिक नसावा असंही या आदेशात म्हटलं आहे. पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून ते प्रत्येक टप्प्यातल्या मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत या सुविधेचा वापर करता येणार आहे.

****



 आधारच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं जगातडिजीटल क्रांतीकेली असल्याचं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडेय यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं कालशासनात डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते. आधारमुळे शासकीय योजनांचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मधले टप्पे गाळले गेले, गॅस अनुदान, शिष्यवृत्ती, मनरेगा आदींचे लाभ थेट लाभार्थींच्या खात्यात दिले गेल्यामुळे भ्रष्टाचारावर खूप मोठा अंकुश आला असल्याचं ते म्हणाले.

****



 सौभाग्य योजनेअंतर्गत, प्रत्येक घराला वीज जोडणी देण्याचं उद्दीष्ट जे राज्य सर्वात आधी पूर्ण करेल, त्या राज्याला १०० कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. याशिवाय हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मिळून ५० लाखांचा विशेष पुरस्कारही दिला जाणार आहे. नवी दिल्ली इथं काल केंद्रीय उर्जा मंत्री आर. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सौभाग्य योजनेच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधीच ज्या राज्यांनी ९९ टक्के वीज जोडणीचं लक्ष्य गाठलं आहे, अशा राज्यांना या पुरस्कारासाठी गृहीत न धरण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

****



 राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज लातूर इथल्या विवेकानंद कर्करोग रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी या रुग्णालयात असलेल्या अद्ययावत यंत्रसामुग्रीची पाहणी केली. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते.

****

 महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरण - महारेरानं विकासकांना त्यांच्या प्रकल्प स्थळांवर इमारतींचे मंजूर आराखडे प्रदर्शित करण्यास सांगितलं आहे. सक्षम अधिकाऱ्यानं मंजूर केलेल्या निकषांसह मान्य आराखडा सर्व प्रवर्तकांनी संबंधित स्थळांवर ठळकपणे लावावा असे निर्देश महारेराने काल जारी केलेल्या एका पत्रकातून दिले आहेत. प्रकल्प स्थळांवर इमारतींचा मंजूर आराखडा गृहनिर्माण व्यावसायिकांनी प्रदर्शित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर हे निर्देश देण्यात आले.

****



 ब्यूनस आयर्स इथं सुरु असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सुरज पवारनं पुरुषांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. ॲथलेटिक्स मध्ये भारताचं या स्पर्धेतलं हे पहिलं पदक आहे.

****



 डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा ओडेन्स इथं आजपासून सुरू होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ऑलिंपिक पदक विजेत्या पी.व्ही सिंधूचा सामना अमेरिकेच्या बिवेन झांगशी, तर सायना नेहवालचा सामना हाँगकाँगच्या च्युंग नानई शी होणार आहे. पुरुष एकेरीत, किदंबी श्रीकांत डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्टियन विटिंगसशी, तर बी. साईप्रणित चीनच्या हुआंग युचियांगशी लढत देईल.

*****

***

No comments: