Wednesday, 17 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.10.2018 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 October 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००

****



 केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अकबर पत्रकारितेत असतांना लैंगिक छळ केल्याचा आरोप काही महिला पत्रकारांनी मी टू मोहीमेच्या माध्यमातून त्यांच्या विरूद्ध केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या सर्व आरोपांविरूध आपण लढा देणार असल्याचं अकबर यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्यावरचे सर्व आरोप यापूर्वीच फेटाळून लावले असून, याप्रकरणी आपण कायदेशीर करवाई करणार असल्याचं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

****



 २०१९ मध्ये होणारी हज यात्रा शंभर टक्के डिजिटल आणि अनुदानविना असेल, अशी घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. मुंबई इथं आज हज हाऊसच्या बहुमजली इमारतीवर नक्वी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. २० फूट लांब आणि ३० फूट रूंद असा हा राष्ट्रध्वज देशातल्या कोणत्याही इमारतीवर उभारलेला सर्वात उंच राष्ट्रध्वज आहे. हज यात्रेची ऑनलाईन नोंदणी उद्यापासून सुरु होणार असून, ऑफलाईन नोंदणी २२ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर्षीची हज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ पुढच्या वर्षाच्या हज यात्रेची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असं नक्वी म्हणाले. यावर्षी हज अनुदान हटवलं तरीही कोणताही आर्थिक बोजा पडला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****



 नीति आयोगानं असंसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्राच्या भागीदारी विषयी आदर्श दिशा निर्देश जारी केले आहेत. या अंतर्गत खासगी क्षेत्रातले भागीदार मानवी संसाधनं सुधारणं, त्यांना विकसित करणं आणि वापर करण्यासाठी गुंतवणूक करतील. यासंबंधीच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासही ते मदत करतील. असंसर्गजन्य रोगांवरच्या उपचाराची सुविधा राज्य आणि केंद्र सरकार सध्या सुरु असलेल्या आरोग्य विमा योजेनतही देऊ शकतात, असं आयोगानं म्हटलं आहे.

****



 हरियाणा इथल्या सतलोक आश्रमचे प्रमुख रामपाल याला हत्येच्या आणखी एका प्रकरणात हिसारच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २००६ मध्ये एका अनुयायी महिलेच्या हत्या प्रकरणात रामपाल दोषी आढळला असून, त्याच्यासह १४ समर्थकांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कालही न्यायालयानं रामपाल याला २०१४ मध्ये चार महिला आणि एका बालकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

****



 राज्य तंबाखू मुक्त करण्यासाठी सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे, निर्देश गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले आहेत. मुंबईत आज यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातले सर्व हुक्का पार्लर बंद व्हावेत यासाठीही पोलीसांनी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****



 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम आणि उमरगा या तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करुन संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातले हे दोन तालुके वगळता इतर तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्यात आल्याचं आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे. भूम आणि उमरगा ता तालुक्यांमध्येही यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, भूजल पातळीही खालावल्याचं ठाकूर यांनी पत्रात नमूद केलं आहे.

****



 बनावट जात वैधता प्रमाणपत्राद्वारे एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी आदिवासी प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या नऊ डॉक्टर विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे शिष्यवृत्ती घेवून शासनाची तब्बल ७७ लाख ३५ हजार रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार धुळे इथल्या अण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात नऊ विद्यार्थ्यांविरुध्द सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

****



 देशातल्या विविध राज्यांमध्ये कांद्याची आवक घटली असल्यानं नाशिकच्या कांद्याला मागणी असून, कांद्याच्या भावानं अडीच हजार रूपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला दोन हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला तर अन्य बाजार समित्यांमध्ये साधारण असेच भाव असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 सातारा शहर, तालुक्यासह विविध भागात आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. उद्या दसरा असल्यानं झेंडू विकण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात शेतकरी दाखल झाले आहेत. त्या फुलांना ५० ते ७० रुपये असा दर मिळत असतानाच अचानक सुरु झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

*****

***

No comments: