Sunday, 14 October 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.10.2018....18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 October 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००

****

मराठवाड्यात परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं जायकवाडी धरणात नाशिक मधल्या धरणातून पाणी सोडावं लागण्याची शक्यता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. १५ ऑक्टोबरनंतर पाण्याच्या साठ्याचा आढावा घेऊन नियमानुसार पाणी सोडलं जाईल, असं ते म्हणाले. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला जाईल असं त्यांनी नमूद केलं.

****

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त होणार असून, त्यानंतर आरक्षण देण्यासंदर्भात विधी मंडळात कायदा केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. नाशिक इथं आज मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत, याची राज्य सरकार खबरदारी घेत असल्याचं ते म्हणाले. मराठा समाजातल्या युवक युवतींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जात असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, तसंच युनिसेफच्या सहकार्यानं युवा माहितीदूत उपक्रम राज्यात राबवला जाणार आहे. या उपक्रमात युवा माहितीदूताला प्रत्येकी ५० व्यक्तींना शासनाच्या योजनांची माहिती द्यायची असल्याचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.केशव वाळके यांनी सांगितलं. ते आज भंडारा इथं एका कार्यशाळेत बोलत होते.

****

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर उद्या राज्यात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त नांदेड जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीनं “ग्रंथ प्रदर्शन, वाचनध्यास उपक्रम आणि ई-पुस्तकांचं वाचन” असे उपक्रम आयोजित केले आहेत. राज्यात इतरत्रही वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

****

शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबरोबरच महाआरोग्य शिबिरातून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या जवरला इथं आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन डोंगरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामस्थांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या देवळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात, तसंच जिंतूर तालुक्यातल्या कौसडी इथं आज रोगनिदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी मोफत औषधांचं वाटपही करण्यात आलं. जिल्ह्यातला कोणताही रुग्ण उपचाराअभावी राहू नये, असं आवाहन आमदार विजय भांबळे यांनी यावेळी केलं.

****

सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं आज महात्मा गांधी स्वच्छता संवाद सेवा पदयात्रा काढण्यात आली. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या यात्रेला सुरुवात केली. या पदयात्रेच्या माध्यमातून चांगल्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जनतेला आपण देत आहोत, असं सांगून खोत यांनी, संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार आपल्याला पुढे जायचं असल्याचं नमूद केलं.

****

औरंगाबाद नजिक चिकलठाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आज चार चित्रकला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर पोस्टर्स प्रदर्शन भरवलं होतं. यात पाहणाऱ्याला अंतर्मुख करणाऱ्या ८० चित्रांचा समावेश होता. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि प्रेरणा प्रकल्पात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आलं. 

****

विजयादशमीनिमित्त औरंगाबाद शहरातल्या बुद्ध लेणी परिसरातल्या महाविहारात दहा दिवसीय श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हे श्रामणेर शिबिर सुरु असून, अनेक विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.

****

भारत आणि वेस्ट इंडीज् दरम्यानचा हैदराबाद इथला दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं दहा गडी राखून जिंकत मालिका दोन - शून्यनं जिंकली आहे. भारताचा पहिला डाव तीनशे सदुसष्ठ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या १२७ धावाच करु शकला. उमेश यादवनं चार, रविंद्र जडेजानं तीन, रविचंद्रन अश्विननं दोन, तर कुलदीप यादवनं एक गडी बाद केला. दुसऱ्या डावात सामना जिंकण्यासाठी असलेलं अवघं ७२ धावांचं लक्ष्य भारतीय संघानं सतराव्या षटकातच पूर्ण केलं. सामन्यात एकूण दहा बळी घेणारा उमेश यादव सामनावीर, तर पदार्पणातच शतक झळकावणारा पृथ्वी शॉ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

No comments: