Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 October 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००
****
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी
एक लाख सौर कृषी पंपाच्या नवीन योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता
देण्यात आली. तीन वर्षात ही योजना राबवण्यात येणार असून, यामुळे एक लाख शेतकऱ्यांना
दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी शासन तीन वर्षात ८५८ कोटी रुपये खर्च करणार
असून, पहिल्या वर्षी २५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार आणि तिसऱ्या वर्षी २५ हजार या
प्रमाणे शेतकऱ्यांना कृषी पंपाचा लाभ दिला जाणार आहे. शाश्वत स्वरुपाचा जलस्रोत असणारे
सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी
योजनेसाठी केंद्रीय अर्थसहाय्य आणि राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक-नाबार्डचं
कर्ज असा एकत्रित निधी थेट पाटबंधारे विकास महामंडळाला देण्यासही मंत्रीमंडळानं मान्यता
दिली आहे. सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे. यामुळे अनावश्यक
प्रशासकीय दिरंगाई टाळता येऊ शकेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी इथल्या अरुणा
मध्यम प्रकल्पासाठी एक हजार ६८९ कोटी रुपये, सातारा जिल्ह्यातल्या जावळीच्या कुडाळी
मध्यम प्रकल्पास ६३५ कोटी रुपये आणि सोलापूर इथं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३०
हजार परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यासाठी १२० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही
मंत्रिमंडळानं घेतला आहे.
****
ऊर्जा विभागानं लोकहिताच्या आणि लोकाभिमुख अशा महत्वाकांक्षी
तीन योजना सुरु केल्या असून, याचा लाभ राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला मोठ्या प्रमाणात
होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री
सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प, विद्युत वाहन चार्जिंग
स्टेशन्स आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला नवीन वीज जोडणी देण्याकरता उच्चदाब वितरण प्रणाली
या तीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. निती
आयोगानं कौतुक केलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना असून, अशा प्रकारची ही
देशातली पहिलीच योजना असल्याचं सांगून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, मागेल
त्याला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी देण्यात येईल, असं आश्वासन दिलं.
****
विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना
कौशल्याभिमुख शिक्षण दिलं गेलं पाहिजे, असं राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटलं
आहे. लातूर इथं आज राजर्षी शाहू महाविद्यालयात आयोजित ‘उच्च शिक्षणातील नवे पैलू’ या
विषयावरच्या राष्ट्रीय खुल्या चर्चासत्रात ते बोलत होते. आपली शिक्षण पद्धती ही भारतीय
संस्कृतीशी निगडीत असली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. माजी केंद्रीय गृहमंत्री
शिवराज पाटील चाकूरकर, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यावेळी उपस्थित होते.
****
राज्य शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये
कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींची
दखल घेत गेले चार दिवस या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या
पथकानं कोल्हापूर आणि इचलकरंजी या शहरात खाजगी रुग्णालयांवर छापे घातले. ३५ रुग्णालयांवर
कारवाई पूर्ण झाली असून, कोल्हापूर शहरातल्या चार रुग्णालयांचा जीवनदायी परवाना रद्द
करण्यात आला आहे, ११ रुग्णालयांवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत
गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं, ते ८६ वर्षांचे
होते. इचलकरंजीच्या सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं. इचलकरंजी
संस्थानचा राजवाडा गोविंदराव यांनी डीकेटीइ या संस्थेस शैक्षणिक कार्यासाठी दिला होता,
आता तिथं आंतरराष्ट्रीय ख्यातीची वस्त्रोद्योगाचं शिक्षण देणारी संस्था उभी आहे.
****
जालना शहरात येत्या २७ आणि २८ ऑक्टोबर दरम्यान ३५
व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे
माजी अध्यक्ष तथा प्रख्यात विचारवंत डॉ.सुखदेव थोरात यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे
उद्घाटन होणार असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली. या दोन दिवसीय साहित्य
संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४९वा भाग
आहे.
****
No comments:
Post a Comment