Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 October 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७
ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
v पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; ११ डिसेंबरला मतमोजणी
v हमी भावापेक्षा कमी दरानं
शेतमाल खरेदी केल्यास, कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना तत्काळ रद्द करण्याचा सहकार
आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांचा इशारा
v लातूर इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
अटल महाआरोग्य शिबीर
v पहिला रानगंध पुरस्कार, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना
प्रदान
आणि
v पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडीजवर एक
डाव आणि २७२ धावांनी दणदणीत विजय
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा
कार्यक्रम जाहीर केला. छत्तीसगढ मध्ये १२ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर असं दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबरला, तर तेलंगणा आणि राजस्थानमध्ये सात डिसेंबरला
मतदान होणार आहे. या पाचही राज्यांचा निकाल ११ डिसेंबरला जाहीर होणार असल्याचं मुख्य
निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी सांगितलं.
****
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
राज्यात राजकीय पक्षांच्या आघाड्यासंदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काल भारतीय
रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघाचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
राजू शेट्टी आणि जनता लोकतांत्रिक दलाचे प्रमुख कपिल पाटील यांची आघाडी उभारण्याच्या
विषयावर मुंबईत बैठक झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही निवडणुकविषयक चर्चेबाबतची
बैठक काल झाली. या बैठकीत पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक
लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं.
****
हमी भावापेक्षा कमी दरानं
शेतमाल खरेदी केल्यास, अशा बाजार समितीचा परवाना तत्काळ रद्द केला जाईल, असा इशारा
राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे. ते काल बुलडाणा इथं बोलत
होते. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल हमी भाव
खरेदी केंद्रांवरही विकावा, असं आवाहनही देशमुख यांनी केलं.
****
लातूर इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
अटल महाआरोग्य शिबीराला प्रारंभ होणार आहे. या शिबीरात किमान एक लाख रुग्णांची तपासणी
होण्याची शक्यता असून, रुग्णांना योग्य सुविधा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,
अधिकाऱ्यांनी शिबीरात “एक स्वयंसेवक” म्हणून प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. या शिबीराच्या अनुषंगानं आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात
निलंगेकर काल बोलत होते.
दरम्यान, महाआरोग्य शिबीरात विविध विभागांसाठी स्वतंत्रपणे
२४ कक्षांची निर्मिती केलेली असून त्या त्या कक्षात संबंधीत तज्ज्ञ डॉक्टर्स आणि त्यांचा
चमू, अद्ययावत सुविधांसह रुग्णांची तपासणी, निदान आणि उपचार करण्यासाठी सज्ज आहेत.
****
कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान आयोजित सभांमध्ये
पोलीसांना पाठवून, आम्ही काय बोललो, याची माहिती रोज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवली
जात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. नंदुरबार
इथं जनसंघर्ष यात्रेच्या सभेत काल ते बोलत होते.
साक्री इथं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे
पाटील यांनी जाहीर सभेला काल संबोधित केलं.
पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या चार वर्षांत झालेल्या वाढीच्या
तुलनेत सरकारनं दोन दिवसांपूर्वी केलेली कपात अतिशय कमी असल्याचं ते म्हणाले. स्वयंपाकाच्या
गॅसमध्येही सरकार जनतेची लूट करत असल्याचं सांगतानाच, शेतीशी संबंधित विविध मुद्यांवरून
विखे पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
****
लातूर
जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस झाला नसला तरी, जलयुक्त
शिवार योजनेअंतर्गत झालेल्या
कामामुळे, भूजल
पातळी फार खालावलेली नाही, त्यामुळे आगामी वर्षभर पाणी पुरवठा व्यवस्थित
होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी व्यक्त केली आहे. लातूर इथं वार्तालाप
कार्यक्रमात काल ते
बोलत होते. जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त ६४
टक्के पावसाची नोंद झाली. कोणत्याही
जलसिंचन योजनेतून अवैध पद्धतीनं मोटर लावून पाणी चोरणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
पहिला रानगंध पुरस्कार, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील
यांना काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातल्या
पळसखेडे इथल्या महात्मा ज्योतिबा फुले ग्रंथालयाच्या वतीनं या वर्षीपासून हा पुरस्कार
सुरु करण्यात आला आहे. हा पहिला पुरस्कार अनुराधा पाटील यांना, निसर्गकवी ना धों महानोर
यांच्या उपस्थितीत, प्रसिद्ध लेखक श्याम मनोहर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक
लाख रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अनेक प्रकारे किंमत चुकवावी
लागते, अशी खंत अनुराधा पाटील यांनी, हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणातून
व्यक्त केली, त्या म्हणाल्या...
कोणतंही लिखाण संपूर्ण मुक्त मनानं करणं गरजेचं असतं हे
खरं.पण समाजिक दबाव, आपली संस्कृती आणि त्यातून तयार होणारी मानसिकता बऱ्याचदा अशा
अनेक गोष्टी लेखनासाठी अडचणीच्या ठरतात. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ही कोणी कुणाला उचलून
देण्याची गोष्ट नाही, पण अनेक प्रकारच्या किंमती त्यासाठी चुकवाव्या लागतात. आजच्या
आपल्या या वर्तमानात तर ही संपूर्ण घुसमट सर्वच कलावंत अनुभवत आहेत.
****
भारत आणि वेस्ट इंडीज क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या
सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजवर एक डाव आणि २७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
भारतानं वेस्ट इंडीजवर मिळवलेला हा आतापर्यंतचा
सर्वात मोठा विजय आहे. भारतानं पहिल्या डावात उभ्या केलेल्या सहाशे एकोणपन्नास धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजचा संघ १८१ धावांवर सर्वबाद झाल्यानं भारतानं त्यांना फॉलोऑन दिला.
दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजचा संघ १९६ धावांवर तंबूत परतला. पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ सामनावीर पुरस्काराचा
मानकरी ठरला. या विजयाबरोबरच भारतानं दोन सामन्यांच्या मालिकेत एक - शून्यनं आघाडी
घेतली आहे. मालिकेतला दुसरा सामना येत्या शुक्रवारपासून
हैदराबाद इथं खेळवला जाणार आहे.
****
केंद्र
सरकारच्या उजाला
योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ७८ हजार ४८१ एलईडी बल्ब बसवण्यात आले
आहेत. यामुळे विजेच्या मासिक देयकात मोठी बचत होत
आहे. या
योजनेचे लाभार्थी योगेश जाधव यांनी आपला अनुभव या शब्दांत व्यक्त केला ...
माझ्या घरात चार खोल्या आहेत.त्यामुळे मला वीजेचं बील
नेहमी आठशे ते हजार रूपये येत असे. दरम्यान मला केंद्र सरकारच्या उन्नती उजाला योजनेची
माहिती मिळाली.त्यानुसार मी महावितरण कंपनीकडून सवलतीच्या दरात चार बल्ब घेतले. त्यामुळे वीजेची बचत तर झालीचं शिवाय मला वीजेचे बील तीनशे
ते चारशे रूपये येत आहे. केंद्र सरकारची उन्नती उजाला चांगली असून माझ्या गावातील अन्य
नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून सगळ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महाविद्यालयीन
शिक्षक संघटना- बामुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेनं विविध मागण्यांसाठी काल औरंगाबादमध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर मोर्चा काढला. प्राध्यापक भरतीवरची
बंदी उठवावी, समस्या निवारण यंत्रणा उभारावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, जुनी निवृत्तीवेतन
योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचं निवेदन यावेळी कुलगुरुंना देण्यात
आलं.
****
केंद्र
शासनाच्या राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात आलेल्या ‘पोषण माह’ या
योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला.
या अभियानात राबवण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे जिल्ह्यातली ८० कुपोषित बालकं
साधारण श्रेणीत आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
//*************//
No comments:
Post a Comment