Saturday, 6 October 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 06.10.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 6 October 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००

****

प्रबळ राष्ट्रनिर्मितीसाठी गर्भवती माता आणि नवजात शिशुचं सुदृढ आरोग्य महत्त्वपूर्ण असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज कानपूरमध्ये महिलांचे आरोग्य, निरोगीपणा आणि सबलीकरण या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या औपचारिक उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आपल्या समाजाव्यवस्थेत जरी मुलींवर अधिक बंधने असली तरी मुली दृढनिश्चय आणि कौशल्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये मुलांपेक्षा पुढे असल्याचं राष्ट्रपती कोविंद यावेळी म्हणाले.

****

निवडणूक आयोगानं मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला. छत्तीसगढ मध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान १२ नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबरला, तर तेलंगणा आणि राजस्थानमध्ये सात डिसेंबरला मतदान होणार आहे. या पाचही राज्यांचा निकाल ११ डिसेंबरला जाहीर होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी सांगितलं.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मुलांना बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना महामंडळातर्फे सुरु करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एस.टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. यासंबंधीचं परिपत्रक नुकतंच महामंडळाच्या कर्मचारी विभागामार्फत निर्गमित करण्यात आलं आहे. याचा लाभ महामंडळाच्या सुमारे एक लाख चार हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. या योजनेअंतर्गत एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर दरमहा ७५० रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.

****

लातूर जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामामुळे पाण्याची पातळी फार खोल गेली नसल्यामुळे वर्षभर पाणी पुरवठा व्यवस्थित होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली आहे. लातूर इथं वार्तालाप कार्यक्रमात ते आज बोलत होते. जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त ६४ टक्के पाऊस झाला असून, लघु, मध्यम धरणांत, तलावात पाणी साठा झाला नाही, तरीही जलयुक्त शिवारच्या कामांमुळे पुरेसा साठा असल्याचं ते म्हणाले. कोणत्याही जलसिंचन योजनेतून अवैध पद्धतीनं मोटारी लाऊन पाणी चोरणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

****

लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आज जिल्ह्यातल्या पत्रकारांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवलं. व्हीव्हीपॅट या मतदानाची पावती देणाऱ्या यंत्रामध्ये नोटांसाठी वापरला जाणार विशेष कागदवर थर्मल प्रिटिंग असल्यानं त्यावरची मतदानाची नोंद ही पाच वर्षे टिकून राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. या यंत्रांमधल्या आधुनिकतेमुळे मतदान प्रक्रियेत मोठी पारदर्शकता आली असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.  

****

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पोषण अभियान या कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात आलेल्या ‘पोषण माह’ या योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. या अभियानात राबवण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे जिल्ह्यातली ८० कुपोषित बालकं साधारण श्रेणीत आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून दररोज सकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातमीपत्राच्या प्रसारण वेळेत बदल करण्यात येत आहे. उद्या रविवारपासून हे बातमीपत्र दररोज सकाळी सात वाजून १० मिनिटांनी प्रसारित होईल.

****

परभणी महानगरपालिकेतला लिपिक अनिल देशमुख याला १५० रुपयांची लाच स्वीकारताना आज रंगेहात अटक करण्यात आली. कामगार प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

पाथरी तालुक्यात मू्ग, उडीद, सोयाबीन हमी भावानं खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी सुरु करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसिलदारांकडे केली आहे. नावनोंदणी सुरु करण्यात आल्याचे आदेश काढल्यानंतरही अद्यापही प्रत्यक्षात नोंदणी सुरु करण्यात आली नसल्याचं शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

राजकोट इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर एक डाव आणि २७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतानं पहिल्या डावात उभ्या केलेल्या ६४९ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव १८१ धावांवर संपुष्टात आल्यानं भारतानं त्यांना फॉलोऑन दिला. त्यानंतर दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजचा संघ १९६ धावांवर तंबुत परतला. दुसऱ्या डावात भारताकडून कुलदीप यादवनं पाच, रविंद्र जडेजानं तीन, तर रविचंद्रन अश्विननं दोन बळी घेतले. पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

No comments: