Monday, 8 October 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 08.10.2018 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 8 October 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ८ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००

****

राफेल लढाऊ विमानं तसंच एस चारशे या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र संरक्षक प्रणालीच्या खरेदीनंतर भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धानुआ यांनी व्यक्त केला आहे. हवाई दलाच्या शहाऐंशीव्या  स्थापनादिनानिमित्त गाझियाबाद इथल्या हिंडन तळावर आयोजित विशेष संचलन आणि अलंकरण सोहळ्यात ते आज बोलत होते. या वेळी हवाई दलाच्या जवानांनी प्रेक्षणीय हवाई कसरतींचं प्रदर्शन केलं.

****

वाढत्या इंधन दराकरता अनेक घटक जबाबदार असल्याचं प्रतिपादन भारतीय जनता पक्षानं केलं आहे. आखाती देशांनी तेलाच्या उत्पादनात केलेली घट, डॉलर - रुपया परिवर्तन दर यासारखे घटक इंधनाच्या दरावर परिणाम करतात, असं नमूद करत बिगर भाजप राज्य सरकारांनीही व्हॅट मध्ये कपात करावी, असं आवाहन भाजपनं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे.

****

जम्मू काश्मीरमध्ये आज शहरी भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे पंचावन्न टक्के मतदान झालं असल्याचं पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पीक पेऱ्याची पाहणी करुन सात बारावर वस्तुस्थितीची नोंद घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. पोलिस अधिकाऱ्यांसोबतच्या एका अन्य बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था संबंधी आढावा घेतला. जळगाव शहरात एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास कार्यक्रमातून १० हजार घरं बांधण्याचं नियोजन करून प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

****

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीनं देशभरात राबवण्यात आलेल्या ‘पोषण महिना कार्यक्रमामध्ये’ उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला एकूण चौदा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात सर्वाधिक पाच पुरस्कार कोल्हापूर जिल्हयानं पटकावले आहेत. येत्या दहा तारखेला दिल्लीमध्ये  या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

यंदाचा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' चित्रपट- नाट्य दिग्दर्शक आणि रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी यांना घोषित झाला आहे. औरंगाबाद इथं विशेष समारंभामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात येत्या २८ तारखेला संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रोख ५० हजार रूपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे देण्यात येणारा, उत्कृष्ट मराठी बाल कुमार वाड्मय निर्मिती क्षेत्रातल्या विज्ञान विषयक उत्कृष्ट बालसाहित्यासाठीचा २०१७-१८ या वर्षासाठीचा श्री. बा. रानडे पुरस्कार, नांदेडचे ज्येष्ठ बालकवी माधव चुकेवाड यांना जाहीर झाला आहे. चुकेवाड यांना ‘ज्ञान-विज्ञान’ या बाल कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचं वितरण येत्या अकरा तारखेला पुण्यात होणार आहे.

****

बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव घाट इथं महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात येत्या १८ तारखेला दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या संयोजन समितीचे सदस्य डॉ.भागवत कराड यांनी आज औरंगाबाद इथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याठिकाणी संत भगवान बाबा यांचं स्मारक उभारण्यात आलं असून या मेळाव्यात, या स्मारकाचं लोकार्पण होणार असल्याचं कराड यांनी सांगितलं.

****

ऑक्टोबर महिन्यातला दुसरा शनिवार हा जगभर जागतिक ‘होस्पाईस आणि पॅलीएटीव केअर’ दिवस म्हणून पाळला जातो. यानिमित्तानं औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालय यांच्या वतीनं ‘मायेची फुंकर’ हा सांस्कृतिक कार्यक्रम कर्करुग्णांसाठी आयोजित करण्यात आल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत दिली. येत्या १५ तारखेला घाटी रुग्णालयाच्या महात्मा गांधी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. “कारण माझं असणं महत्वाचं आहे” हे या वर्षीचं या दिनाचं घोषवाक्य आहे.

//***********//






No comments: