आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर
मधल्या फतेह कदल परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत
तीन दहशतवादी मारले गेले. आज सकाळी ही चकमक झाली, यात एका पोलिसाला वीरमरण आलं. या
परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी पहाटे शोधमोहीम सुरु
केली, त्यावेळी ही चकमक सुरु झाली. या चकमकीत एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला
असून, चकमक अद्याप सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राफेल खरेदी व्यवहाराबाबत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी खोट्या गोष्टी
रचून सांगत आहेत, असा आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. राफेल
विमानं आणि त्यावरची शस्त्रास्त्रं भारतात तयार केली जात नाहीत, तशीच
दसॉल्ट किंवा कोणत्याही अन्य खाजगी कंपनीतही तयार केली जात नाहीत, असं
जेटली यांनी फेसबुकवर म्हटलं आहे. सर्वच्या सर्व ३६ विमानं आणि त्यावरची शस्त्रास्त्रं
उड्डाणासाठी आणि वापरासाठी योग्य स्थितीत भारतात पोचतील, आणि
पुरवठा सुरु झाल्यानंतर ठेकेदारीच्या रकमेच्या ५० टक्के खरेदी दसॉल्ट कंपनी भारतीय कंपन्यांकडून करेल, असं जेटली यांनी म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा कर तसंच कर्जमाफीबाबत राहुल गांधी यांनी केलेले आरोपही जेटली यांनी
फेटाळून लावले आहेत.
****
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये पदकंविजेत्या खेळाडूंचा
केंद्रीय क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांनी काल नवी दिल्ली इथं सत्कार
केला. भारतीय क्रीडापटूंनी यंदा प्रत्येक क्रीडाप्रकारात पदकं मिळवल्यानं, २०१८ हे
वर्ष ऐतिहासिक असल्याचं, राठोड म्हणाले.
****
केंद्र सरकारनं सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात
० पूर्णांक ४ दशांश टक्के वाढ करून तो आता ८ टक्के एवढा केला आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी,
रेल्वे आणि संरक्षण दलांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू असेल.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय-
घाटीच्या निवासी डॉक्टरांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेलं काम बंद आंदोलन काल रात्री
मागे घेतलं. सुरक्षेसंदर्भात
विविध निर्णय घेण्यात आले, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment