Thursday, 1 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.08.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०१ ऑगस्ट  २०१ सकाळी ७.१० मि.
****

v मोटार वाहन सुधारणा विधेयकाला काही दुरूस्त्यांसह राज्यसभेची मंजुरी
v विधानसभा निवडणूक शिवसेना आणि मित्र पक्षांसोबतच युती करून लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
v भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला आजपासून वर्धा जिल्ह्यातून प्रारंभ
आणि
v साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीटाचं आज विमोचन
****

 मोटार वाहन सुधारणा विधेयकाला काही दुरूस्त्यांसह राज्यसभेनं काल मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजूनं १०८ तर विरोधात १२ मते पडली. या विधेयकात राज्यसभेनं काही दुरूस्त्या सुचवल्यामुळे मंजुरीसाठी हे विधेयक पुन्हा लोकसभेत मांडलं जाणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास किमान चार पट तर कमाल दहापट दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात आहे. दारू पिऊन गाडी चालवल्यास १० हजार रूपये, हेल्मेट नसल्यास १ हजार रूपये तसंच वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास ५ हजार रूपये दंड, अल्पवयीन मुलाने गाडी चालवल्यास गाडी मालकास २५ हजार रूपये दंडासह ३ वर्षे कारावासाची शिक्षा यासह अनेक तरतुदी या विधेयकात करण्यात आल्या आहेत.
****

 ओला आणि उबेर सारख्या मोबाईल ॲपद्वारे संचलित टॅक्सी सेवांच्या नियमनासाठी ठोस पावलं उचलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं, केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती एस ए बोबडे, न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या पीठानं, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, सरकारला हे निर्देश दिले. यासाठी आवश्यक असल्यास, कायद्यात सुधारणा करण्याची सूचनाही न्यायालयानं केली. या टॅक्सी सेवेच्या नियमनासंदर्भात काय करता येईल, याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं याचिकाकर्त्याना दिले आहेत.
****

 आगामी विधानसभा निवडणूक आम्ही शिवसेना आणि मित्र पक्षांसोबतच युती करून लढणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, तसंच काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत एका छोटेखानी समारंभात या सर्वांचं स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात काही जागांची अदलाबदल केली जाईल. त्याचा निर्णय पुढच्या ८ ते १० दिवसांत होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****

 गावांसाठी आवश्यक योजना पूर्ण करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शिर्डी इथं झालेल्या राज्यस्तरीय सरपंच आणि उपसरपंच कार्यशाळा तसंच परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. राज्यातल्या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीच्या शिफारशीनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****

 भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला आजपासून वर्धा जिल्ह्यातल्या गुरूकुंज मोझरी इथून सुरूवात होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या विजय संकल्प जाहीर सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा सुरू होईल. ही यात्रा राज्यातल्या ३२ जिल्ह्यातल्या १५२ मतदारसंघांमधून प्रवास करणार आहे.
****

 ईलेक्टॉनिक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्याच्या निर्णयाबाबत निवडणूक आयोग तसंच सर्वोच्च न्यायालयाकडून कोणतीही आशा नसल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ईलेक्टॉनिक मतदान यंत्रविरोधात येत्या ९ ऑगस्ट रोजी मनसेच्यावतीनं आंदोलन करण्यात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी काल तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांची भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बँनर्जी यांना ईव्हीएमविरोधी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं असल्याचंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
****

 राज्यातल्या दोन्ही काँग्रेसमधलं पक्षांतर बघता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलीनीकरण होण्याची गरज असल्याचं मत काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. भाजपला खऱ्या अर्थानं निवडणुका जिंकायच्या असतील तर त्यांनी मतदान यंत्राचा वापर करण्याऐवजी मत पत्रिकांचा वापर करून निवडणुका लढवून दाखवाव्यात असं आव्हानही जगताप यांनी यावेळी बोलतांना दिलं.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****

 शाश्वत विकासाचं लक्ष्य आणि सार्वजनिक आरोग्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पंतप्रधान जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत आणि आयुष सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचं, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशनच्या आरोग्य विज्ञान संस्थेच्या ११व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी बोलत होते. अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटीक्समुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होत असून डॉक्टरांची अनेक कामं या माध्यमातून होतील, असं त्यांनी सांगितलं. 
****

 साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्म शताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे. या निमित्तानं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचं छायाचित्र असलेल्या एका टपाल तिकीटाचं प्रकाशन केलं जाणार आहे. राज्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वतीनं आज ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री चित्रण’ या विषयावर साहित्यिक डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या व्याख्यानाचं  आयोजन करण्यात आलं आहे.

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९९ वी पुण्यतिथी. या निमित्त आज ठिकठिकाणी  अभिवादन सभांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****

औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना - भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आज उमेदवारी दाखल करणार असल्याचं शिवसेना जिल्हा कार्यालयातून सांगण्यात आलं.
****

 जवळपास असलेल्या जलस्त्रोतांचा वापर करून बीड जिल्ह्यातली ३०० गावं कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या गेवराईमध्ये विविध योजनांचा आढावा घेताना काल ते बोलत होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमार्फत नियोजन आराखड्यामध्ये याचा समावेश करून सदर योजना नोव्हेंबर अखेर पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
****

 पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर रेल्वे स्थानकावरील यार्ड नूतनीकरणाच्या कामामुळे पूर्णा पाटणा पूर्णा आणि  कोल्हापूर – धनबाद – कोल्हापूर या साप्ताहिक रेल्वे गाडीच्या येत्या २६ ऑगस्ट पर्यंतच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.
****

 सातारा तालुक्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. पुणे- बंगळुरू महामार्गावर काशीळ गावानजिक हा अपघात झाला. कर्नाटकातून मुंबईकडे जाणारी भरधाव गाडी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं, रस्त्यालगतच्या एका झाडावर आदळून हा अपघात झाला. काल मध्यरात्रीनंतर ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण कर्नाटकातल्या मदिहोळ देहरी इथले रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 परभणी जिल्ह्यात येत्या आठ आणि सोळा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. एक वर्ष ते १९ वर्ष वयोगटातल्या सर्व मुला-मुलींना या दिवशी जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात दोन लाख ९३ हजार ८२६ तर शहरी भागात ९१ हजार पाचशे सत्तर मुलामुलींना या गोळ्या देण्याचे उद्दिष्ट आहे.
****

 सोलापूर जिल्ह्यात करमाळा इथं, महाराष्ट्र बँकेच्या शाखेचं छत कोसळून एक जण ठार झाला, तर सुमारे बावीस लोक जखमी झाले. काल दुपारी कामकाजाच्या वेळेत ही दुर्घटना घडली.  जखमींपैकी दहा जणांना सोलापूर इथं उपचारांसाठी हलवण्यात आलं असून, सात जणांवर करमाळा इथं कुटीर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पाच किरकोळ जखमींवर उपचार करून, त्यांना घरी सोडण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातली आळंदी, वालदेवी आणि भावली ही तीन मध्यम धरणे शंभर टक्के भरली आहेत. गंगापूर आणि दारणा धरणांचा साठा सुमारे ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गंगापूर धरणातून सध्या पाच हजार तीनशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
*****
***

No comments: