आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ ऑगस्ट २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
एलपीजी अर्थात स्वयंपाकाच्या
गॅसच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवर घट झाली असल्यानं विनाअनुदानित एलपीजी सिंलेडरचे
दर प्रति सिंलेडर ६२ रुपये ५० पैशांनी कमी झाले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं काल
ही घोषणा केली. त्यामुळे आता १४ पूर्णांक २ दशांश किलोच्या सिंलेडरसाठी ५७४ रुपये ५०
पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी गेल्या महिन्यात या सिंलेडरच्या दरात १०० रुपये ५०
पैशांची कपात झाली होती, त्यामुळे या दोन महिन्यात विनाअनुदानित एलपीजी सिंलेडरच्या
दरात एकूण १६३ रुपयांची घट झाली असल्याचं, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या निवेदनात म्हटलं
आहे.
****
मुस्लीम महिला वैवाहिक
हक्क संरक्षण विधेयक -२०१९ ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे. झटपट
तलाक पद्धत मोडीत काढणारा हा कायदा १९ सप्टेंबर २०१८ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावानं
लागू असून, त्याबाबतची राजपत्र अधिसूचना कालच जारी करण्यात आली आहे. ससंदेनं मंगळवारी
हे विधेयक मंजूर केलं. त्यात झटपट त्रिवार पद्घती बेकायदेशीर ठरवली असून, यापुढं तसं
करणं दखलपात्र गुन्हा ठरणार आहे.
****
साहित्य रत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांचं जन्म शताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे. या निमित्तानं मुंबईत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचं छायाचित्र असलेल्या एका टपाल तिकीटाचं
प्रकाशन केलं जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे अध्यासन केंद्राच्या वतीनं आज ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील
स्त्री चित्रण’ या विषयावर साहित्यिक डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जुलै महिन्यात सरासरीपेक्षा
जास्त पाऊस झाला असल्यानं देशाच्या अनेक भागांना दिलासा मिळाला असून, एकंदर पाणीटंचाई
कमी झाली आहे. येत्या दोन आठवडयात असाच चांगला पाऊस अपेक्षित असल्यानं पाणीटंचाईची
स्थिती आणखी सुधारेल, असं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. जुलैमधे, २८५ मिलिमीटरच्या सरासरीपेक्षा
जास्त, म्हणजे २९८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. महाराष्ट्रासह बिहार, असमच्या काही भागात
पूरस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात रात्रभर संततधार सुरू होती. कोल्हापूरमधील
राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment