Thursday, 1 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****

 दुष्काळी भागातील १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण परीक्षा शूल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनान घेतला आहे. प्रात्यक्षिक, गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण परीक्षा शूल्क आता माफ होणार आहे.  शूल्क माफीची प्रतिपूर्ती RTGS मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज दिली आहे. शूल्क माफी माफीबाबतच्या सध्याच्या कार्य पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. राज्य मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेचा अर्ज दाखल करतानाच विद्यार्थ्यांच्या महसूल मंडळं, गाव, तालुका,  जिल्हा तसंच विद्यार्थी किंवा पालकांच्या बँक खात्यांची माहिती घ्यावी. जी गावं दुष्काळी म्हणून घोषित केलेली असतील अशा विद्यार्थ्यांना शुल्क भरताना कोणतंही शुल्क भरावं लागू नये याची दक्षता राज्य मंडळानं घ्यावी, असेही निर्देश देण्यात आल्याचं शेलार यांनी नमुद केलं आहे.
****

 साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्म शताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे. या निमित्तानं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचं छायाचित्र असलेल्या एका टपाल तिकीटाचं प्रकाशन केलं जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात विविध अभिवादन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबादमधील देवळाई चौक, वाळूज महानगर तसंच फुलंब्री आणि गंगापूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं.

 लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त औरंगाबादमध्ये पैठण गेट जवळील त्यांच्या पुतळ्याला सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्यावतीनं अभिवादन करण्यात आलं.
****

 एलपीजी अर्थात स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवर घट झाली असल्यानं विनाअनुदानित एलपीजी सिंलेडरचे दर प्रति सिंलेडर ६२ रुपये ५० पैशांनी कमी झाले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं काल ही घोषणा केली. त्यामुळे आता १४ पूर्णांक २ दशांश किलोच्या सिंलेडरसाठी 574 रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी गेल्या महिन्यात या सिंलेडरच्या दरात १०० रुपये ५० पैशांची कपात झाली होती, त्यामुळे या दोन महिन्यात विनाअनुदानित एलपीजी सिंलेडरच्या दरात एकूण 163 रुपयांची घट झाली असल्याचं, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या निवेदनात म्हटलं आहे.
****

 लोकसभेत पुढच्या अधिवेशनापासून कागदाचा वापर केला जाणार नाही, अशी घोषणा लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे.  यामुळे कोटयावधी रुपयांची बचत होईल, असं त्यांनी काल सभागृहाला सांगितलं.  मात्र एखाद्या सदस्याला गरज असेल, तर कागदही पुरवला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
****

 भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला आजपासून वर्धा जिल्ह्यातल्या गुरूकुंज मोझरी इथून सुरूवात होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या विजय संकल्प जाहीर सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा सुरू होईल. ही यात्रा राज्यातल्या ३२ जिल्ह्यातल्या १५२ मतदारसंघांमधून प्रवास करणार आहे.
****

 गावांसाठी आवश्यक योजना पूर्ण करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल शिर्डी इथं आयोजित राज्यस्तरीय सरपंच आणि उपसरपंच कार्यशाळा तसंच परिषदेच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
****

 राज्यातल्या  प्रत्येक नागरिकासाठी शिवसेना काम करत असल्याचं प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. काल उस्मानाबाद इथं जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते लोकसभा निवडणूकीत मतदारांनी शिवसेनेला केलेल्या भरभरून मतदानाबद्दल आभार मानण्यासाठी  आपण आलो असल्याचं ते म्हणाले. या जनआशीर्वाद यात्रेचं उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा तालुक्यातल्या हिंगणगाव आणि उस्मानाबाद तालुक्यातल्या येडशी इथं शिवसैनिकांनी स्वागत केलं असल्याचं आमच्य वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्यानं देशाच्या अनेक भागांना दिलासा मिळाला असून, एकंदर पाणीटंचाई कमी झाली आहे. येत्या दोन आठवडयात असाच चांगला पाऊस अपेक्षित असल्यानं पाणीटंचाईची स्थिती आणखी सुधारेल, असं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट  केलं आहे. जुलैमधे, २८५ मिलिमीटरच्या सरासरीपेक्षा जास्त, म्हणजे २९८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. महाराष्ट्रासह बिहार, असमच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

 दरम्यान, सातारा जिल्ह्यात रात्रभर संततधार सुरू होती. कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. 
****

 थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सायना नेहवाल आणि किदम्‍बी श्रीकांत आपले दुसऱ्या फेरीतले सामने खेळतील. सायनाचा मुकाबला जापानच्या  साइका ताकाहाशी बरोबर होईल, तर श्रीकांतची गाठ थायंलंडच्या खोषित फेतप्रदबशी पडणार आहे.
*****
***

No comments: