Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०१ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø जळगाव घरकुल घोटाळ्यातल्या ४८ आरोपींना शिक्षा; माजी मंत्री सुरेश
जैन आणि गुलाबराव देवकर यांना तुरुंगवासाची शिक्षा
Ø
धुळे जिल्ह्यात वाघाडी इथल्या रसायन कारखान्यात
स्फोट; सहा महिलांसह तेरा
जण ठार तर ६४
जण जखमी
Ø
आजपासून नवीन वाहतूक
नियम लागू; दंडाच्या
रकमेत मोठी वाढ; हेल्मेट नसल्यास दोन हजार रुपये
दंड
Ø उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राणा
जगजीतसिंह पाटील यांची भारतीय
जनता पक्षात जाण्याची तर अहमदनगर जिल्ह्यातले काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांची शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा
आणि
Ø वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात
भारत ३२९ धावांनी आघाडीवर
****
राज्यभर गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री
सुरेश जैन यांना सात वर्ष तुरुंगवास आणि शंभर कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. धुळे
विशेष न्यायालयाने या प्रकरणात काल सर्व ४८ आरोपींना शिक्षा सुनावली. राजेंद्र मयूर,
जगन्नाथ वाणी यांना ७ वर्षे तुरुंगवास आणि ४० कोटी रुपये दंड, प्रदीप रायसोनी यांना
सात वर्षे शिक्षा आणि १० लाख रुपये दंड, तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षे
तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने
दिले आहेत. ५२ आरोपी असलेल्या या प्रकरणातल्या तीन आरोपींचा मृत्यू झाला आहे तर एक
आरोपी अजूनही फरार आहे.
दरम्यान, या निकालाबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत, उशीरा का होईना,
पण न्याय हा मिळतोच हे या निकालावरून सिद्ध झालं, यामुळे जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा
विश्वास अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया हजारे यांनी व्यक्त केली.
****
धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या वाघाडी इथल्या
रसायन कारखान्यात स्फोट होऊन, तेरा जण ठार झाले. काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा
स्फोट झाला. यामध्ये सुमारे ६४ जण जखमी झाल्याची माहिती पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे
यांनी दिली. जखमींमध्ये सहा महिलांचाही समावेश आहे. पंधरा गंभीर जखमींना धुळे जिल्हा
रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. धुळ्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळाची पाहणी
करून, जखमींची चौकशी केली.
दरम्यान या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांना
पाच लाख रुपयांची मदत शासनानं जाहीर केली आहे. जखमींचा उपचाराचा सर्व खर्च शासन करणार
असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
****
जनतेची इच्छा असल्यास आगामी विधानसभा निवडणूक लढवणार
असल्याचं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं जनआशीर्वाद यात्रेनिमित्त पत्रकार
परिषदेत बोलत होते. वरळी, दिग्रस आणि मालेगावमधून आगामी निवडणूक लढवण्यासंदर्भात शिवसैनिकांनी आपल्याला आग्रह केला असल्याची
माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सत्ता असो किंवा नसो शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त झाला
पाहिजे, ही आमची भूमिका असून त्यासाठी लढा सुरूच राहणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी
म्हटलं आहे. ते काल जालन्यात दोन दिवसीय महारेशीम महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत
होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यावेळी उपस्थित होते. रेशीम कोष उत्पादनात जालना जिल्ह्यानं
मोठी प्रगती केली असून, देशाच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन जिल्ह्यात होत
असल्याचं खोतकर यांनी सांगितलं.
****
मोटार वाहन कायद्यातील सुधारीत तरतुदी लागू झाल्या
असून, आजपासून नवीन वाहतूक नियम लागू होत आहेत. रुग्णवाहिकेला मार्ग न दिल्यास १० हजार
रुपये दंड, हेल्मेट नसल्यास दोन हजार रुपये दंड, मद्यपान करुन गाडी चालवल्यास ६ महिने
तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर आजपासून रेल्वेच्या
ऑनलाईन तिकीट नोंदणी शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीही भवितव्य दिसत
नसल्यामुळे, त्या पक्षातून अनेक नेते तसंच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात येत असल्याचं,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं पत्रकारांशी बोलत
होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांपुरताच
मर्यादित राहिला असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं
आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात
निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा लातूर जिल्ह्यातून आज उस्मानाबाद इथं पोहोचत आहे.
नांदेड जिल्ह्यात सोनखेड तसंच लोहा इथं मुख्यमंत्र्यांनी
सभा घेतली. नांदेड शहरात रस्ते तसंच पूल बांधकामासाठी ३६० कोटी रुपये आणि इसापूर धरणाचे
पाणी नांदेड शहरात आणून नव्याने पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी २६० कोटी
रुपये निधी देण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
लातूर जिल्ह्यात उदगीर तसंच अहमदपूर इथं मुख्यमंत्र्यांनी
सभा घेतल्या. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
उदगीर इथल्या सभेत सांगितलं. ते म्हणाले.....
या विमा कंपन्याना आम्ही
सोडणार नाही, या ठिकाणी जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना देय असलेला पीक विमा मिळत नाही
तोपर्यंत त्याचा पाठपूरावा करू. ज्यांचा विमा
राहिला आहे तो त्याना मिळवून दिल्या शिवाय
आम्ही याठिकाणी थांबणार नाही.
उदगीर जवळच्या हत्तीबेटाच्या विकासासाठी दहा कोटी
रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले. अहमदपूरच्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नांदेड
लातूर रेल्वे मार्गासाठी पन्नास टक्के वाटा राज्य सरकार उचलेल असं जाहीर केलं. बहुजन
समाज पार्टीचे डॉ सिध्दार्थ सूर्यवंशी आणि त्यांच्या समर्थकांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ
नेते माजी मंत्री आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत
असल्याचं जाहीर केलं आहे. काल उस्मानाबाद इथं, परिवार संवाद या कार्यक्रमात जगजीतसिंह
पाटील यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले....
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी
आपल्या हक्काचं पाणी आणलं. युवकांना न्याय देण्यासाठी इथं उद्योग आणून रोजगार उपलब्ध
करून देणं, आणि हे सर्व आपल्याला करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यायचंय, अडीअडचणी दूर
करायच्यात. आपलं सामर्थ्य वाढवायचंय. आणि हे करण्यासाठी आपण सर्वजण मिळून भारतीय जनता
पार्टीमध्ये प्रवेश करू.
माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष
नेताजी पाटील यांच्यासह जिल्ह्यातून पाटील यांचे समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार
भाऊसाहेब कांबळे यांनीही काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला
आहे. कांबळे यांनी काल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर हा निर्णय
घेतला असून, त्यांनी काल विधानसभा अध्यक्ष
हरीभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठवाडा विकास मंडळाच्या
वतीनं काल औरंगाबाद इथं, ‘मानव विकास निर्देशांक’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात
आलं. उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी या चर्चासत्राचं उद्घाटन केलं. मराठवाडा विकास
मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, माजी सनदी अधिकारी भास्कर मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते. जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड या जिल्ह्यातल्या तीस
तालुक्यांमधला मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि उत्पन्न वाढीसाठी
प्रयत्न करावे लागणार असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान
किंगस्टन इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट
सामन्यात कालच्या दुसऱ्या दिवस अखेर वेस्ट इंडिजच्या सात बाद
८७ धावा झाल्या. भारताचा पहिला डाव ४१६
धावांवर संपुष्टात आला, सध्या भारत ३२९ धावांनी आघाडीवर
आहे.
****
राज्यात सुरु
होणाऱ्या पोषण आहार अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांचं महत्वाचं योगदान
राहणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी
म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि
मदतनिस महासंघाच्या ऋणनिर्देश आणि सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.
****
त्र्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
येत्या जानेवारी महिन्यात उस्मानाबाद इथं होणार आहे. या संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचं,
काल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा प्रशासनाच्या
प्रमुख या नात्याने सर्व पातळीवर मदत करण्यास आपण तयार असल्याचं दीपा मुधोळ मुंडे यांनी
यावेळी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात वाई गोरखनाथ
इथं काल महापोळा साजरा झाला. मराठवाड्यासह विदर्भातूनही आलेल्या शेकडो बैलजोड्यांनी
गोरखनाथाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातली.
****
उस्मानाबाद बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचं भूमीपूजन
काल करण्यात आलं. परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री तानाजी सावंत, खासदार ओमराजे
निंबाळकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रवाशांचा एसटी प्रवास सुखकर
होण्यासाठी परिवहन मंत्री या नात्याने आपण कटिबद्ध असल्याचं, रावते म्हणाले
*****
***
No comments:
Post a Comment