आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ सप्टेंबर २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
गेल्या चोवीस तासांत मराठवाड्याच्या अनेक
तालुक्यांत पावसाचं दमदार पुनरागमन झालं आहे. विभागात सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात
पाऊस झाला असून, आतापर्यंत तीनशे त्रेचाळीस मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, लातूर
जिल्ह्यांत काल पाऊस झाला. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई
शहर आणि परिसरातही काल रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
****
आजपासून संपूर्ण सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय
पोषण महिना म्हणून साजरा केला जाणार आहे. पूरक आहार - ही या कार्यक्रमाची, या वर्षाची
संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात 'मन की बात' कार्यक्रमात
कुपोषणाचा उल्लेख केला होता. तसंच कुपोषणाची समस्या २०२२ पर्यंत सोडवण्यात येईल, असंही
नमूद केलं होतं. या पोषण आहार अभियानामध्ये विविध मंत्रालयांचाही सहभाग असणार आहे.
****
सातवाहनांचा काळ हा भारताचा सुवर्णकाळ
होता, कारण त्या काळात निर्माण झालेली विविध शिल्पं, साहित्य, स्थापत्यरुपी वैभव हे
आपल्यावर ऋण असल्याचं ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक लक्ष्मीकांत धोंड यांनी म्हटलं
आहे. काल औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या दोन दिवसीय न. शे. पोहनेरकर
व्याख्यानमालेत ‘सातवाहनांचा सुवर्णकाळ’ या विषयावर धोंड बोलत होते. या व्याख्यानमालेत
आज धोंड यांचं, ‘हाल सातवाहनाची गाथा सप्तशती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या वतीनं परभणी जिल्ह्यातल्या
विधानसभेच्या चारही जागांसाठी काल इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. चार जागांसाठी
५२ जणांनी मुलाखती दिल्या. पक्षाच्या वतीनं राज्यमंत्री संजय भेगडे यांनी मुलाखती घेतल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड शहरात काल सेव्ह मेरीट सेव्ह नेशन
या चळवळीत गुणवत्ता बचावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. अतिआरक्षणामुळे
खुल्या वर्गातल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. यामुळे येणारी पिढी
नैराश्याच्या दिशेनं जात आहे, ही बाब लक्षात घेऊन पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षण पूर्णपणे
बंद करण्याच्या मागणीसह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.
*****
***
No comments:
Post a Comment