Monday, 19 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.08.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१९ ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

       जम्मू काश्मीर मधली परिस्थिती हळूहळू निवळत आहे. श्रीनगर जिल्ह्यातल्या एकशे नव्वद प्राथमिक शाळा आज पुन्हा सुरू झाल्या. काश्मीर खोऱ्यातल्या पन्नास पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातले निर्बंध कालपासून शिथील करण्यात आले असून, या भागात काहीही अप्रिय घटना घडली नसल्याचं, शासकीय प्रवक्ते रोहित कंसल यांनी सांगितलं. श्रीनगर शहरात अनेक भागात दूरध्वनी सेवा बहाल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
****

 विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. एकूण सहाशे सत्तावन्न मतदारांपैकी सकाळी दहा वाजेपर्यंत सतरा मतदारांनी मतदान केलं. शिवसेना भाजप युतीकडून अंबादास दानवे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णी या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत होत आहे.
****

 धुळे जिल्ह्यात शहाद्याजवळ काल रात्री झालेल्या अपघातातल्या तीसहून अधिक जखमींची मंत्री जयकुमार रावल यांनी भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. औरंगाबादहून शहाद्याकडे जाणाऱ्या  बसची काल रात्री विरुद्ध दिशेनं येणाऱ्या कंटेनरशी धडक होऊन, तेरा जण ठार झाले. काल रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला.
****

 बी डब्ल्यू एफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून स्वित्झर्लंड मध्ये सुरुवात होत आहे. आज भारताच्या साईप्रणीतचा सामना कॅनडाच्या जेसन अँथनी याच्याशी तर एच एस प्रणॉयचा सामना फिनलँडच्या ईटू एन्टी ओस्करी हायनो याच्याशी होणार आहे. महिला एकेरीत पी व्ही सिंधूला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.
****

जपानमध्ये सुरु असलेल्या हॉकी ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत काल भारताच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेला सामना दोन-दोन अशा बरोबरीत सुटला तर, भारताच्या पुरुष संघाला काल न्यूझीलंडनं दोन एकनं पराभूत केलं. देशाच्या दोन्ही संघांनी पहिल्या फेरीतील आपापला प्रत्येकी एक एक सामना जिंकला असून भारतीय महिला संघाचा उद्या चीनसोबत सामना होणार आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...