Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२० ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v पूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंतचं कर्ज माफ तसंच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून देण्याचा
राज्य सरकारचा निर्णय
v अवीट संगीताच्या
गोडीचे ख्यातनाम संगीतकार
खय्याम यांचं निधन
v कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाची नोटीस
आणि
v विधान परिषदेच्या औरंगाबाद-
जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ९८ पूर्णांक ४८ टक्के मतदान; गुरूवारी मतमोजणी
****
सांगली आणि कोल्हापूरसह
राज्यातल्या पूरग्रस्त भागात एक हेक्टर शेतीच्या नुकसानीवर पूर्ण कर्ज माफ करण्यात येणार असून, कर्ज
न घेतलेल्या शेतकऱ्यांना तीन पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल जाहीर केला. मुंबईत काल वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस
यांनी सांगितलं की, पडलेली किंवा धोकादायक झालेली घरं, प्रधानमंत्री आवास योजनेतून
पूर्णपणे बांधून दिली जाणार असून, केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीव्यतिरिक्त राज्य सरकारकडूनही
एक लाख रुपये मदत दिली जाणार आहे. घर बांधून होईपर्यंत सुमारे वर्षभराच्या कालावधीसाठी
संबंधित कुटुंबांना घरभाडे दिले जाणार असून, ग्रामीण भागात २४ हजार रुपये तर शहरी भागात
३६ हजार रुपये घरभाड्यापोटी मिळतील, असं ते म्हणाले. घर बांधणीसाठी पाच ब्रास वाळू
आणि पाच ब्रास मुरुम मोफत दिला जाणार असून, बाधित कुटुंबांना पुढचे तीन महिने सरकारकडून
धान्य पुरवठा केला जाईल. या मदतीसाठी बाधित कुटुंबांकडून सध्या कागदपत्रांची अपेक्षा
केली जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले....
आता लोकांजवळ समजा
पाऊस नसल्यामुळे त्यांना जवळ फार कागदपत्रे
मागीतली तर ती देऊ शकणार नाही. म्हूणन आम्ही यासंदर्भात एक आयोग, अपेक्षा अशी आहे की,
कोणी बोगसपणा करू नये आणि कोणी जर केला तर त्याच्यावर जी कठोरातील कठोर कारवाई करण्यात
येईल.
छोट्या व्यापाऱ्यांना
पन्नास हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दुधाळ जनावरांच्या नुकसानाची भरपाई सरपंच तलाठी किंवा दूध संघांच्या शिफारशीवरून केली
जाईल, जनावरांच्या गोठ्यांसाठीही सरकारकडून अर्थसहाय्य केलं जाणार आहे. पूरग्रस्त भागात
सगळ्या विद्यार्थ्यांना बालभारती वह्या आणि पुस्तकं पुरवणार असल्याची माहिती त्यांनी
दिली.
****
अवीट गोडीच्या संगीतानं
रसिकांना रिझवणारे ख्यातनाम संगीतकार खय्याम यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं. ते
९२ वर्षांचे होते. फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळं गेल्या काही दिवसांपासून एका खाजगी
रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. महंमद जहूर हाश्मी असं मूळ नाव असलेल्या खय्याम
यांनी पंजाबमधल्या लुधियाना इथं वयाच्या १७ व्या वर्षी संगीत क्षेत्रातल्या कारकीर्दीला
सुरूवात केली. कभी कभी, पाकिजा, उमराव जान, थोडी सी बेवफाई, रझिया सुलतान, नूरी यांसारख्या
अनेक चित्रपटांना त्यांनी अजरामर संगीत दिलं. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी, फिल्मफेअर
अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आज त्यांच्या पार्थिवावर
शासकीय इतमामात अंतिम संस्कार
केले जाणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्यासह चित्रपट सृष्टीतल्या मान्यवरांनी खय्याम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त
केला आहे.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला काल औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठण इथून प्रारंभ झाला. पक्षाचे नेते अजित पवार, विधान परिषदेतले विरोधी
पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांनी, संत एकनाथ महाराज यांच्या समाधी स्थळाचं
दर्शन घेऊन या 'शिवस्वराज्य यात्रेची' सुरुवात केली. पुरात माणसांचे प्राण गेले आणि
यांचे मंत्री फोटो काढत फिरले, हे सरकार प्रचंड असंवेदनशील असल्याची टीका अजित पवार
यांनी केली. सरकार विरोधातल्या रागाचं मतांमध्ये परिवर्तन करून समाजपरिवर्तन करावं,
असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालय- ईडीनं कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी
नोटीस बजावली आहे. या प्रकरणी येत्या गुरुवारी २२ तारखेला ठाकरे यांना ईडीसमोर हजर
होण्यास सांगण्यात आलं आहे. ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार उन्मेश जोशी यांनाही ईडीनं
नोटीस बजावली असून, जोशी काल ईडीसमोर हजर झाले. जोशी आणि ठाकरे यांनी भागीदारीत सुरू
केलेल्या या व्यवसायातून ठाकरे बाहेर पडलेले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे
यांना राजकीय आकसापोटी ही नोटीस बजावण्यात आल्याचं, मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी
म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक काळात ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली
होती, विधानसभा निवडणुकांच्या काळात हे टाळण्यासाठी ही नोटीस बजावली गेल्याची टीका,
देशपांडे यांनी केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत
केलं जात आहे.
****
विधान परिषदेच्या औरंगाबाद-
जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काल ९८ पूर्णांक ४८ टक्के मतदान झालं.
एकूण ६५७ मतदारांपैकी ६४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, जालन्यात काँग्रेसच्या
सहा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्यानं मतदान केलं नसल्याचं निवडणूक विभागानं
कळवलं आहे. शिवसेना भाजप युतीकडून अंबादास दानवे तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसकडून
बाबुराव कुलकर्णी या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत आहे. मतमोजणी येत्या गुरुवारी
२२ तारखेला होणार आहे.
****
२०२२पर्यंत प्रधानमंत्री
आवास योजनेच्या माध्यमातून बीड शहरातल्या प्रत्येक बेघर व्यक्तीचं स्वतःच्या हक्काचं
घरकुलाचं स्वप्न पूर्ण होईल, असं राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री जयदत्त
क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. बीड नगरपरिषदेच्या सभागृहात काल प्रधानमंत्री आवास योजनेच्या
लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करताना ते बोलत होते. अधिक घरकुलं तयार करण्यासाठी विविध
शासकीय जमिनी तसंच गायरान जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या पुरग्रस्तांना
मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथल्या रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय
सेवा योजना विभागानं काल शहरातून मदत फेरी
काढून दहा हजार ३९६ रुपये निधी संकलित केला.
****
आकाशवाणीच्या क्षेत्रीय कार्यक्रम समन्वय समितीच्या
औरंगाबाद इथं कालपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय बैठकीचं उदघाटन आकाशवाणीच्या पश्चिम
विभागाचे अतिरीक्त महानिदेशक नीरज अग्रवाल
यांच्या हस्ते झालं. या दोन दिवसाच्या बैठकीसाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातल्या
आकाशवाणीचे अधिकारी उपस्थित आहेत. बैठकीत विविध कार्यक्रमाच्या नियोजन आणि निर्मिती
संदर्भात चर्चा केली जाते.
****
विधानसभेच्या सर्व २८८
जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय राष्ट्रीय मराठा पक्षानं घेतला असल्याचं पक्षाचे अध्यक्ष
अंकुशराव पाटील यांनी सांगितलं. उमेदवारांची निवड करण्यासाठी पक्षाचा जनसंपर्क दौरा
लवकरच सुरू होणार असल्याचंही ते म्हणाले. येत्या १ सप्टेंबर पर्यंत इच्छुकांनी आपले
उमेदवारी अर्ज पक्षाच्या पुणे इथल्या कार्यालयात
पाठवावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल काही संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या.
यामध्ये उपाध्यक्षपदी खा. डॉ. सुभाष भामरे, प्रवीण पोटे पाटील, किरीट सोमय्या, योगेश
गोगावले आणि अशोक कांडलकर यांची नियुक्ती केली आहे.
याशिवाय जालना जिल्हाध्यक्षपदी
आमदार. संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्षपदी गिरीश पालवे आणि यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नितीन
भुतडा यांची नियुक्ती केली आहे.
त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष
मंगलप्रभात लोढा, आर. सी. पाटील आणि रमेश कुथे, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, अल्पसंख्यांक
मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी, कामगार आघाडी
संयोजक संजय केणेकर आणि व्यापारी आघाडी दिलीप कंदकुर्ते यांना पदमुक्त केलं आहे.
****
तिसऱ्या श्रावण सोमवार
निमित्त बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथाचं काल अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतलं. हिंगोली
जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ, औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळच्या घृष्णेश्वर आणि नाशिकच्या
त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी देखील काल भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
****
भटक्या विमुक्त
चळवळीचे नेते प्रा.मोतीराज राठोड यांच काल औरंगाबाद इथं अल्पशा आजारानं निधन झालं.
ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राठोड यांना त्यांच्या कार्यासाठी दलित अस्मिता पुरस्कार, ग्रंथतुला पुरस्कार, बिरसा
मुंडा सामाजिक सेवा सन्मान पुरस्कार, आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक पुरस्कार, तसंच
भाषा सन्मान या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
****
लातूर इथले भारतीय जनता
पक्षाचे नगरसेवक आणि युवा उद्योजक शिवकुमार अंबादास गवळी यांचं काल पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. ते ३८ वर्षांचे होते. राजकारणापेक्षा
समाजकारणावर भर देत त्यांनी प्रभागात सक्रियपणे विविध कामं केली होती. काल दुपारी त्यांच्या
पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
लातूर जिल्ह्याच्या औसा
तालुक्यातल्या भूमीअभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले उप अधीक्षक आनंद कुलकर्णी यांना
काल लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एक हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ
अटक केली. शेतीच्या मोजणीसाठी फी भरलेली असतांनाही मोजणीची तारीख लवकर मिळवून देण्यासाठी
कुलकर्णी यांनी एक हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यात
बिडकीन इथं अवैध कीटकनाशकाच्या कारखान्यावर छापा मारून एक गोदाम बंद करण्यात आलं आहे.
कृषी विभागानं काल ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार
यांनी दिली.
****
औरंगाबाद इथल्या डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या लोककवी वामन कर्डक अध्यासन केंद्रातर्फे
कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रख्यात कवी डॉ रविचंद्र हडसणकर हे 'वामनदादा
कर्डक : व्यक्ती आणि कार्य' या विषयावर आज व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या
महात्मा फुले सभागृहात सकाळी ११ वाजता हे व्याख्यान होईल.
*****
***
No comments:
Post a Comment