Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 August 2019
Time 1.00 to
1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा.
****
सशस्त्र दलांच्या कार्यान्वयन क्षमतेत वाढ होण्यासाठी
स्वदेशी बनावटीच्या संरक्षण साहित्याची आवश्यकता संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त
केली आहे, आज नवी दिल्लीत वायूसेनेचं आधुनिकीकरण आणि स्वदेशीकरण योजनांसंदर्भात घेण्यात
आलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते. संरक्षण साहित्याच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी
करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली. संरक्षण साहित्य निर्मिती क्षेत्रात
विदेशी गुंतवणुकीसाठी विदेशी कंपन्यांना आमंत्रित केलं असून, मेक इन इंडियाच्या माध्यमातून
खासगी क्षेत्रालाही यात सहभागी करून घेणार असल्याचं, संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं.
****
केंद्रीय सशस्त्र पोलीस
दलांमधे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचं वय आता साठ वर्षच राहणार आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमासुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस दल आणि सशस्त्र सीमा
दलातल्या कॉन्स्टेबल ते कमांडंट या स्तरांमधल्या कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय ५७ वर्ष
होतं, तर उपमहानिरीक्षक ते महासंचालक पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांसाठी निवृत्ती वय ६०
वर्ष होतं. हा भेदभाव दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा आदेश केंद्रीय
गृहमंत्रालयानं जारी केला आहे.
****
अयोध्येतल्या रामजन्मभुमी-बाबरी
मशीद प्रकरणी आज सलग आठव्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. वादग्रस्त
जागेवर मशीदीचे बांधकाम करण्यासाठी मंदिर पाडले गेल्याचा युक्तीवाद रामलल्ला पक्षाचे
वकील सी एस वैद्यनाथन यांनी आजच्या सुनावणीदरम्यान केला. पुरातत्व विभागाचा अहवाल या
युक्तिवादाला बळकटी देत असल्याचं मतही विधीज्ञ वैद्यनाथन यांनी यावेळी न्यायालयाच्या
निदर्शनास आणून दिलं. या प्रकरणी नेमलेली मध्यस्थता समिती, या प्रकरणी कोणत्याही निष्कर्षापर्यंत
न पोहोचल्यामुळे मागील सलग आठ दिवसापासून या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात
चालू आहे. अयोध्येतली सुमारे पावणे तीन एकर जागा सुन्नी वक्फ मंडळ, निर्मोही आखाडा
तसंच रामलल्ला विराजमान या तीन पक्षांमध्ये समान वाटून देण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च
न्यायालयानं दिला होता, या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात
दाखल आहेत. त्यावर ही सुनावणी सुरू आहे.
****
चांद्रयान दोन या मोहिमे
अंतर्गत चंद्रयानाने आज सकाळी साडेनऊ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. भारतीय
अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख डॉक्टर के सिवन यांनी ही माहिती दिली. चंद्राच्या पृष्ठभागावर
उतरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी हे चंद्रयान चंद्राभोवती फेऱ्या मारेल, त्याचा
वेग कमी करण्यासाठी त्यातलं द्रव इंधनावर चालणारं इंजिन प्रज्वलित केलं जाणार आहे.
२२ जुलै रोजी जीएसएलव्ही मार्क थ्री एम वन या प्रक्षेपकाच्या साहाय्यानं चांद्रयान
दोनच प्रक्षेपण झालं असून, येत्या सात सप्टेंबरला हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर
उतरणार आहे.
****
कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. आज
सकाळी बंगळुरू इथं राजभवनात राज्यपाल वजुभाई वाला यांनी सतरा मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची
शपथ दिली. या नवनियुक्त मंत्र्यांमध्ये जॉली शशिकला अण्णासाहेब या एकमेव महिला आहेत.
गेल्या २६ जुलैला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येडियुरप्पा यांनी प्रथमच मंत्रिमंडळ
विस्तार केला आहे.
****
वाढतं शहरीकरणं आणि भूजलाचा अनियंत्रित उपसा यामुळे
पाण्याचे साठे झपाट्यानं कमी होत असल्याचं, केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत
यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात राष्ट्रीय जल अकादमीत, केंद्रीय जल अभियानाच्या नवनियुक्त
अधिकाऱ्यांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. जल व्यवस्थापन क्षेत्रातल्या
संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी या अधिकाऱ्यांना जल अकादमीत २४ आठवड्यांचं प्रशिक्षण
दिलं जात आहे.
****
सांगली इथं पुरग्रस्तांना
मदतीचे वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी दोन तास कोंडून ठेवल्याची घटना
काल सांगली येथे घडली. एका बहुमजली इमारतीत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर
राहणाऱ्या नागरिकांना मदत देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त लोकांनी या कर्मचाऱ्यांना
कोंडून ठेवले. प्रांताधिकारी विकास खरात यांनी मध्यस्थता केल्यानंतर या कर्मचाऱ्यांची
सुटका करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अधिकारी आणि कर्मचारी यांचं आरोग्य सदृढ राहिल्यास
जनतेला अधिक प्रभावीपणे सेवा देता येईल असं, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अशोक काकडे यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने
सर्व पदाधिकारी, अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या आरोग्य तपासणी तसंच समुपदेशन शिबिरात ते बोलत होते.
ज्या कर्मचाऱ्यांच्या रक्तात हिमाग्लोबन कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना
गुळ शेंगदाण्याचे लाडू देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतलं.
*****
***
No comments:
Post a Comment