Friday, 16 August 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.08.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
कृषी निर्यात अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कृषी परिवर्तन उच्चाधिकार समितीची आज मुंबईत दुसरी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसंच प्रतिनिधी उपस्थित होते. तेलबियांच्या उत्पादनासाठी जनुक सुधारित बियाण्यांच्या वापरावर विचार केला जाणार असल्याचं, फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन, त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले जेटली यांच्यावर, अस्वस्थपणा तसंच श्वसनाच्या तक्रारीनंतर गेल्या शुक्रवारपासून दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्र - एम्समध्ये उपचार सुरू आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही जेटली यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती, ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं, नायडू यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं, एम्सकडून मात्र जेटली यांच्या प्रकृतीबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही.
****
काश्मिर हे भारताचा अविभाज्य घटक असून, कलम ३७० हटवणं हा एक महत्त्वाचा निर्णय असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. हरियाणात जींद इथं एका सभेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात हे करणं शक्य झालं असून, काश्मिरचा विशेष दर्जा हटवल्यानं त्या प्रदेशाचा विकास होणार असल्याचा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
****
क्रीडा क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठीत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी आशियाई तसंच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. पुनियाला हा पुरस्कार मिळाल्यास कुस्तीपटू सुशिलकुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांच्या नंतर हा पुरस्कार मिळवणारा बजरंग पुनिया हा चौथा कुस्तीपटू ठरेल. राष्ट्रीय क्रीडा दिनी राष्ट्रपती भवनात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. 
****
लोकसंखेवर नियंत्रण ठेवणाऱ्यांचा सन्मान आणि एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकविरोधात लोकचळवळ राबवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचं काँग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदंबरम यांनी स्वागत केलं आहे. प्लास्टीक पिशव्यांवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा असं आवाहन  मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून केलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यात स्वयंसिद्धा उपक्रमातून सुमारे एक लाख मुलींना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. मुलींनी कणखर व्हावं तसंच त्यांना स्वतःचं रक्षण करता यावं, म्हणून यापुढेही हा उपक्रम सातत्यानं राबवण्यात येणार आहे. तसंच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीही प्रयत्न बचत गटांच्या माध्यमातून होत असल्याचं कृषी आणि पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज अमरावतीमधे सांगितलं.
****
राज्यस्तरीय सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गंत धुळे शहरासाठी मंजर कामांमध्ये अल्पसंख्याक समाजाचं प्राबल्य असलेल्या प्रभागामधे एकही काम केलं गेलं नसल्याचा आरोप करत, त्याच्या निषेधार्थ धुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेते साबीर खान यांच्यासह मुस्लीम नगरसेवकांनी नगरोत्थानच्या कामांबाबत हरकत घेतली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
युवा आणि क्रडा मंत्रालयाच्या वतीनं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच जयंत २० ऑगस्ट हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर हा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यात विविध धर्मांच्या आणि अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृद्धींगत करणं आणि हिंसाचार टाळण्यासाठी राज्यात हा सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यात येतो. बुलडाणा जिल्ह्यात या पंधरवड्याचं आयोजन करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात गायी - म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्व समावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामधे दुधाळ जनावराचे कृत्रिम रेतन केल्यानंतर जन्मलेल्या कालवडींच्या संगोपनासाठी ५ हजार रूपये आणि नर वासराला २५ हजार रूपये अनुदान देण्यात येतं. वर्ष २०१९-२० या वर्षासाठी या योजनेमध्ये पशुपालकांनी सहभाग घेवून आपल्या दुधाळ जनावरांची नोंद जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात करावी, असं आवाहन बुलढाणा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ पी.जी.बोरकर यांनी केलं आहे.
****
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे दुहेरीकरणाच्या कामामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. नांदेड - पनवेल नांदेड ही गाडी उद्या तर पनवेल - नांदेड ही गाडी परवा तर नागपूर - कोल्हापूर ही गाडी उद्या आणि मंगळवारी पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. तर मुंबई - भुवनेश्वर मुंबई ही गाडी उद्या आणि २३ ऑगस्टला मनमाड, औरंगाबाद, मार्गे धावेल.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...