Saturday, 17 August 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 17.08.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
सरकार आयुष्यमान भारत आणि इतर योजनांच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज वर्ध्यातल्या सेवाग्राम इथं महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या जीवनापासून नीतिमूल्य, दया, पददलितांची आणि मानवतेची सेवा आणि सन्मान करण्याची तत्वं घेण्याचं आवाहन केलं. तत्पूर्वी राष्ट्रपती कोविंद यांनी सेवाग्राममध्ये बापूकुटीला भेट देऊन आदरांजली वाहिली. 
****
संविधान कर्त्यांनी सामान्य माणसावर विश्वास दाखवल्यामुळे गेल्या ७३ वर्षांत भारत एक सशक्त लोकशाही बनू शकला असं कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. प्रसाद यांच्या हस्ते आज नागपूर इथं राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या १७ व्या अखिल भारतीय संमेलनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. १० वर्ष जुने फौजदारी खटले शीघ्र गतीनं निकाली काढण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. देशातली ८० टक्के जनता मोफत न्यायिक सल्ल्याला पात्र आहे. मात्र, फार कमी लोक न्यायालयाकडे न्यायिक मदत मागतात. या बाबतीत अजून जागृती होण गरजेचं असल्याचं मत न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी व्यक्त केलं. ‘न्याय सर्वांसाठी’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवण हा या दीड दिवस चालणाऱ्या या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. समाजातल्या आर्थिक दुर्बल घटकांना किंवा इतर कारणामुळे न्यायापासून वंचित असणाऱ्यांना मोफत आणि सक्षम कायद्याच्या सेवा पुरवण हा विधी सेवा प्राधिकरणाचा उद्देश आहे.
****
जम्मू-काश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर इथं अंदाधुंद गोळीबार करत, पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. आज सकाळी साडे सहाच्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं, भारतीय लष्कराच्या चौक्या आणि नागरी भागात उखळी तोफा आणि बाँबचा मारा सुरु केला. मात्र अत्यंत दक्ष असलेल्या भारतीय सैन्यानं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं.
****
दूरदर्शनच्या वरिष्ठ वृत्तनिवेदिका नीलम शर्मा यांचं आज निधन झालं. २०१८ च्या नारी शक्ती या पुरस्काराच्या त्या मानकरी होत.
****
समाजमाध्यमं अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी पुरक असल्याचं मत मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत पहिल्या मराठी सोशल मिडिया संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी आज ते बोलत होते. माहिती आणि ज्ञानाचं विकेंद्रकरण करण्यात या माध्यमानं महत्वाची भूमिका बजावली आहे. तसंच या माध्यमांमुळे जगभरातले मराठी बांधव एका व्यासपीठावर आले आहेत, त्यांची मराठीशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली आहे असंही तावडे यावेळी म्हणाले.
****
कोल्हापूर आणि सांगली इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मदतीची तीन वाहनं काल पाठवली. सीलबंद पिण्याचं पाणी, ब्लिचिंग पावडर, फिनाइल लिक्विड, हातमोजे, नोज मास्क, अन्नाची पाकिटं यांचा यात समावेश आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न तसंच औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून ही वाहनं पूरग्रस्त भागांकडे रवाना केली.
पूरग्रस्तांना मदत आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शासन सर्व उपाययोजना करीत आहे. लोकांनीही पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे यावं, असं आवाहन रावल यांनी यावेळी केलं.
****
कोल्हापूरमधून पर्यटनासाठी आलेल्या तीन जणांचा रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे इथं समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. यात २ तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे. आज सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह देखील सापडला. मूळचे कर्नाटकातल्या हुबळीचे रहिवासी असलेले हे पर्यटक सध्या कोल्हापूरच्या कसबा बावडा इथं राहत होते. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी चार पर्यटकांना स्थानिक सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षकांनी वाचवलं आहे.
****
‘मराठवाडा साहित्य परिषदे’चा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार निवृत्त न्यायमूर्ती नरेंद चपळगावकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचं वितरण ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते उद्या संध्याकाळी सहा वाजता परिषदेच्या डॉ.ना.गो. नांदापूरकर सभागृहात करण्यात येणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दरम्यान, साहित्य अकादमी आणि परिषदेच्या वतीनं कार्ल मार्क्सच्या द्विजन्म शताब्दीच्या निमित्तानं मार्क्सच्या मराठी साहित्यावर झालेल्या परिणामांचा विश्लेषक लेखाजोखा मांडणारं दोन दिवसांचं चर्चासत्रही २४ आणि २५ ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं घेण्यात येणार आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...