Sunday, 1 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रस्तावित विलीनीकरणातून बॅंक कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची शक्यता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी फेटाळून लावली आहे. बँकांच्या विलीनीकरणानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याला हटवलं जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी चेन्नई इथं पत्रकारांशी बोलताना दिली. देशातल्या दहा सार्वजनिक बँकांचं विलीनीकरण करण्यात येणार असून, त्यातून चार बँका स्थापन केल्या जातील, असं सांगत अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी ही मोठी योजना जाहीर केली आहे.
****
दादरा आणि नगर हवेलीचं मुख्यालय असलेल्या सिल्वासा इथं अनेक विकास प्रकल्पांचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. ६१ कोटी रुपये खर्चून झंडा चौक आणि टोकरखाडा इथं उभारण्यात येणाऱ्या शिक्षण केंद्राची पायाभरणी त्यांनी केली. त्याशिवाय शालेय मुलांना माध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या मोबाईल व्हॅनला त्यांनी हिरवा झेंडा दाखविला.
श्रमयोगी प्रसाद योजनेचाही प्रारंभ यावेळी करण्यात आला. या योजनेत उद्योग आणि बांधकाम क्षेत्रातल्या कामगारांना कामाच्या ठिकाणी पौष्टिक नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. अक्षयपात्र फाऊंडेशनतर्फे ही कामे करण्यात येणार आहेत.
****
निर्यात वाढवून जास्तीत जास्त परकीय चलन मिळविण्यासाठी उद्योगांना चालना देण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष आर्थिक क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, तेथील उद्योगांचं कामकाज, कार्यप्रणालीतला सुटसुटीतपणा, निर्यातवाढीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, रोजगार निर्मिती अशा विविध बाबींचा आढावा त्यांनी मुंबईत एका बैठकीत घेतला. महसुल आणि अर्थमंत्रालयाशी विचार विनिमय करून आवश्यक वाटल्यास सेझ नियमात उद्योगस्नेही बदल करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेचं निलंगा इथं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि खासदार रूपा पाटील निलंगेकर यावेळी उपस्थित होते. देवणी परिसरातून रेल्वेमार्ग जाण्यासाठी मंजुरी मिळवून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
युतीचं सरकार येण्यापूर्वी राज्यात तीन लाख महिला बचत गट होते. या बचत गटांची संख्या आता ४० लाखांवर गेली आहे. बचत गटांना राज्य सरकारनं शून्य टक्के व्याजदरानं निधी दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाधिक कामगारांची नोंदणी करण्याचे निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज अमरावती इथं दिले. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे झालेल्या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगांव जामोद इथं बांधकाम कामगारांना विविध लाभ वितरण कार्यक्रमही आज पार पडला.
****
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बाल नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्था, शाळांनी ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
१७ व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ डिसेंबरपासून राज्यातल्या विविध केंद्रांवर होणार असून, द्वितीय दिव्यांग बालनाटय स्पर्धेची अंतिम फेरी जानेवारी २०२० मध्ये एका केंद्रावर होणार आहे. शासनाच्या www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर यासंबंधीची माहिती आणि प्रवेशिका उपलब्ध आहेत, अशी माहिती प्रभारी संचालक मीनल जोगळेकर यांनी दिली आहे.
****
दरवर्षी प्रमाणेच यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवाला उद्यापासून सुरवात होत आहे. सार्वजनिक रस्त्यांवर अगर परिसरात शांतता भंग होऊ नये यासाठी, मेळावे, मिरवणुकीत भाग घेणाऱ्या लोकांच्या नियमनासाठी मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ३३, ३७ आणि ४० प्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत. १२ सप्टेंबर, म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून लेखी परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास मनाई घालण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

No comments: